आता नका झिजवू मंत्रालयात चपला! जालन्यातच सुरू झाला आहे मुख्यमंत्री सचिवालय कक्ष
जालना- नागरिकांच्या अनेक समस्या या थेट मंत्रालयाशी जोडलेल्या असतात आणि त्यासाठी नागरिक मंत्रालयात चकरा मारून मारून आपल्या चपला झिजवतात ,खिसाही रिकामा करतात. हे सर्व केल्यानंतर पदरी अपेक्षित निर्णय पडेलच असे नाही. त्यामुळे या सर्व बाबींना आळा घालण्यासाठी जिल्हास्तरावरच आता मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
जनतेच्या दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या तक्रारी आणि त्यामुळे होत असलेल्या दप्तर दिरंगाईला टाळण्यासाठी आणि स्थानिक नागरिकांचे प्रश्न स्थानिक स्तरावरच सोडविण्यासाठी तसेच शासकीय यंत्रणेमध्ये पारदर्शकता, गतिमानता, आणि लोकाभिमुखता आणण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातच मुख्यमंत्री सचिवालय कक्ष स्थापन करण्याच्या सूचना राज्याचे मुख्य सचिव मनू कुमार श्रीवास्तव यांनी दिनांक 16 डिसेंबर 2022 रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने जालना जिल्हा कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्ष म्हणजे (सीएमओ) कार्यालय स्थापन करण्यात आले आहे .या संदर्भात जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी आज सविस्तर माहिती दिली.
दरम्यान या कार्यालयात येणाऱ्या तक्रारी 15 दिवसांच्या आत स्थानिक स्तरावर निपटारा करण्याचा या कार्यालयाचा प्रयत्न असेल. जर धोरणात्मक निर्णयाची गरज असेल ते पुढे मंत्रालयाकडे पाठविला जाईल .आहे त्या कर्मचाऱ्यांमध्येच हे काम केलं जाणार आहे परंतु निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांवर या कक्षाची जबाबदारी देण्यात आली आहे. जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी पदसिद्ध विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. तर त्यांना एक नायब तहसीलदार आणि एक लिपिक हे सहकार्य करणार आहेत. दर महिन्याच्या दहा तारखेला मुख्यमंत्री सचिवालयात कक्षाची अद्यावत माहिती आणि अहवाल हा मुख्यमंत्री सचिवालयास सादर करण्यात यावा अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. आजच्या या पत्रकार परिषदेला निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांची उपस्थिती होती.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com