यावर्षी लागणार पाणी टंचाईच्या झळा; प्रशासनाचा 10 कोटी 94 लाख रुपयांचा आराखडा तयार
जालना-सुमारे चार वर्षाच्या कालखंडानंतर जालनेकरांना यावर्षी पाणीटंचाईच्या झळा लागण्याची शक्यताआहे. पाणीटंचाई होणार आहे हे गृहीत धरून प्रशासनाने टंचाई आराखडा तयार केला आहे. दरम्यान या आराखड्यामध्ये जालना जिल्ह्यातील एकाही नागरी भागामध्ये म्हणजेच नगरपंचायत आणि नगरपालिका हद्दीत पाणीटंचाई होणार नसल्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे. त्यामुळे या आराखड्यात त्यांचा समावेश करण्यात आलेला नाही.
मागील चार वर्षांमध्ये पावसाची सरासरी चांगली होती त्यामध्ये दोन वर्षे कोविड असल्यामुळे कदाचित प्रदूषण कमी झाल्यामुळे पाऊस पडला असल्याचा अंदाज वर्तविला जात होता. अंदाज काही असला तरी पाण्याचे प्रमाण मात्र भरपूर होते. मागील वर्षी अवघे 44 टँकर पाणी शासनाने टंचाई भागात पुरवले होते. परंतु यावर्षी प्रशासनाने पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेऊन जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यामध्ये ग्रामीण भागासाठी पाणीटंचाई निवारणार्थ आराखडा तयार केला आहे. त्यासाठी जानेवारी ते मार्च दरम्यान चार कोटी 50 लाख 28 हजार रुपये तर एप्रिल ते जून दरम्यान सहा कोटी 44 लाख दोन हजार रुपये, अशी एकूण दहा कोटी 94 लाख 30हजार रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविलेला आहे.
दरम्यान मार्च महिन्यात पहिल्या तीन महिन्यातील कृती आराखड्यामध्ये एप्रिल मे मध्ये करावयाच्या संभाव्य तयारीसाठी हा निधी आहे आणि एप्रिल ते मे यादरम्यान टँकर आणि विहीर अधिग्रहित करण्यासाठीचा हा निधी आहे .या तरतुदीनुसार जालना तालुक्यासाठी एकूण एक कोटी 94 लाख 24 हजार, बदनापूर एक कोटी 34 लाख 22 हजार, अंबड 80 लाख 12 हजार, घनसावंगी एक कोटी 17 लाख 36 हजार ,परतुरला दुसऱ्या टप्प्यासाठी निधीची गरज नाही त्यामुळे पहिल्या टप्प्यातील कामांनाच एक कोटी 25 लाख रुपये, मंठयासाठी एक कोटी 64 लाख 2 हजार रुपये, भोकरदन साठी एक कोटी 22 लाख 84 हजार रुपये, जाफराबाद साठी एक कोटी 56 लाख 50 हजार रुपये अशा एकूण 514 प्रस्तावित गावे आणि दोन वाड्यांसाठी दोन्ही टप्पे मिळून दहा कोटी 94 लाख 30 हजार रुपयांचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने शासनाकडे पाठविलेला आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठयाच्या कार्यकारी अभियंता आणि ग्रामीण पाणीपुरवठा यंत्रणा जिल्हा परिषदेचे सहाय्यक भूवैज्ञानिक यांनी हा आराखडा तयार केलेला आहे. दरम्यान जालना जिल्ह्यामध्ये असलेल्या जालना अंबड परतूर भोकरदन या शहरी भागासाठी तर नगरपंचायत असलेल्या जाफराबाद मंठा बदनापूर घनसावंगी तीर्थपुरी या साठी आराखड्यामध्ये तरतूद करण्यात आलेली नाही. ग्रामीण भागाच्या तरतुदीमध्ये एक कोटी 56 लाख 42 हजार रुपये हे खाजगी विहीर अधिग्रहित करण्यासाठी तर चार कोटी 87 लाख 50 हजार रुपये हे बैलगाडी किंवा टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेआहेत. या दोनच माध्यमातून दुसऱ्या टप्प्यामध्ये निधी खर्च होणार आहे.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com