मी पत्ता कोबी बोलते! असा झाला माझा जीवन प्रवास
जालना– शेतामध्ये राबराब राबवून रक्ताचं पाणी करून आता चार पैसे मिळतील अशा अपेक्षेने भाजीपाला विक्रीसाठी शेतकरी बांधव बाजारात नेतो . तिथे त्याच्या पदरात काय पडते ?ती हकीकत रेखाटण्याचा प्रयत्न धारकल्याण येथील शेतकरी अरुण इंगोले यांनी केला आहे. जणूकाही त्यांच्यासोबत पत्ता कोबीच बोलत आहे असाही भास होत आहे.
मी पत्तागोबी बोलते . माझे मालक अरुण अंबादास इंगोले धारकल्याण ता. जि . जालना . ( म ) . मो .97 65 33 68 06. यांनी मला शेतात लागवड करण्यासाठी चिखली येथून आणले . एक एकर जमिन लावण्यासाठी त्यांनी 26 हजार रुपयांची रोपे लावली . एक एकर ठिबक साठी त्यांनी 18 हजार रुपयांचे खर्च केले ,आणि माझी प्रत चांगली राहावी म्हणून एक एकरला तीन ट्रॉल्या अठरा हजार रुपयांचा शेणखत टाकलं .तीन वेळेस डीएपी अमोनियम सल्फेट असं 7000 रुपयांचे रसायन खते टाकले . तीन वेळेस खुरपणी केली त्यासाठी त्यांनी जवळपास 6000 हजार रुपये खर्च केले . पाच वेळेस चांगल्या प्रतीची औषधी फवारली . त्यासाठी त्यांना 5000 हजार रुपये लागले. माझ्या मालकाबरोबर भारतीय शेतकऱ्यांची प्रगती व्हावी शेतकऱ्यांना दिवसा शेतात काम करता यावे म्हणून शासनाने रात्री साडेअकरा वाजता लाईन दिली तर ते मला दर तिसऱ्या दिवशी रात्री साडेअकरा वाजता पाणी द्यायचे. अशा पद्धतीने जवळपास तीन महिन्यांमध्ये मी भारतीय ग्राहकांच्या खाण्यासाठी बाजारात जाण्यासाठी झाले. मग मला त्यांनी काढण्यासाठी सुरुवात केली.माझी पहिली ट्रीप काढली तेव्हा एक पिकप भरून काढण्याचा खर्च त्यांना पन्नीसहसह( साधारण 20 किलोचा ट्रे) 2000 रुपये लागला .आणि माझे मालक मला जालना ,अंबड, परतूर, मंठा ,औरंगाबाद अशा ठिकाणी विक्रीसाठी घेऊन गेले .एक ट्रिप नेण्यासाठी त्यांना 2500 रुपये खर्च होऊ लागला . ग्राहकांच्या सेवेसाठी मी एक पन्नी म्हणजे 20 किलोचे कॅरेट कधी 20 रुपये ,कधी 30 रुपये असा भाव मिळू लागला .एक वेळेस तर त्यांनी मला औरंगाबादला नेलं औरंगाबादच्या प्रिय ग्राहकांसाठी मी फुकट मार्केटमध्ये 2 दिवस बसले . 2 दिवसात एक कॅरेट सुद्धा कोणी विकत घेतलं नाही.शेवटी मी औरंगाबादच्या मार्केट मधे सडून गेले.त्या एका ट्रिपचा त्यांचा खर्च 5000 रुपये एवढा झाला.जालन्यातही मी फक्त गायी आणि शेळ्यांच्याच उपयोगी पडले.अशा पद्धतीने माझा एक एकरचा खर्च साधारण 80 हजार रुपये झाला .आणि मला विकून माझ्या मालकाच्या पदरात केवळ 5000 हजार रुपये पडले. अशा माझ्या जन्मापासून ची, माझ्या मालकाने जीवाचं रान केल्याची, आणि मी बाजारात कसे सडले याची कहाणी तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. आता तरी मला चांगला भाव देऊन जीवदान द्या!
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com