शाळा फसली,अनधिकृत सुरू असलेली “नारायणा ई -टेक्नो स्कूल” बंद करून दंड ठोठावण्याचे शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश
जालना-छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात सुरू असलेली नारायणा एज्युकेशन ट्रस्ट द्वारा संचलित नारायणा ई- टेक्नो स्कूल ही अनधिकृत असून ती तात्काळ बंद करावी. असा आदेश जि.प. प्राथमिक शिक्षणाधिकारी कैलास दातखीळ यांनी गटशिक्षणाधिकारी जालना यांना दिनांक 27 फेब्रुवारी 2023 रोजी काढला आहे .त्या अनुषंगाने ही शाळा बंद करण्यासाठी शासन स्तरावरून हालचाली सुरू झाल्या आहेत.
जिल्हा परिषद जालना जावक क्रमांक 667 प्राथमिक विभाग यांनी दिनांक 27 फेब्रुवारी 2023 रोजी गटशिक्षणाधिकारी जालना यांना दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, “राज्यातील अनाधिकृत शाळांवर शिक्षण हक्क कायद्यांतर्गत तरतुदीनुसार कारवाई करणे बाबत कळविण्यात आलेले असून याबाबतचा अहवाल मागविण्यात आलेला आहे. त्यानुसार अहवाल प्राप्त झालेला असून त्यामध्ये नारायणा एज्युकेशन ट्रस्ट द्वारा संचलित नारायणा ई-टेक्नो स्कूल छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, जालना. ही शाळा शासन मान्यता नसतानाही अनाधिकृत सुरू असल्याबाबत अहवाल या कार्यालयास प्राप्त झालेला आहे. ज्याद्वारे सदर शाळेत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत वर्ग सुरू असून शाळेची एकूण हजेरी पत्रकावरून पटसंख्या 424 असून 38 शिक्षक कार्यरत आहेत, मात्र संबंधित शाळेकडे शाळा सुरू करण्याबाबतचे शासनाचे मान्यता आदेश पत्र नसल्याचे चौकशीत आढळून आलेले आहे. त्यामुळे सदर शाळा ही अनधिकृत सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे. अनाधिकृत शाळा सुरू असल्यास बालकांचा मोफत शक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 मधील कलम 18( 5) च्या तरतुदीनुसार संबंधित अनाधिकृत शाळेच्या व्यवस्थापनास रुपये एक लाख इतका दंड व सूचना देऊनही शाळा बंद न केल्यास रुपये दहा हजार प्रति दिवस इतका दंड ठोठावण्यात यावा. याबाबत निर्देश आहेत तेव्हा या द्वारे आपणास सक्त ताकीद देऊन कळविण्यात येते की, शासन मान्यता नसतानाही सुरू असलेली नारायणा एज्युकेशन ट्रस्ट द्वारा संचलित नारायण ई-टेक्नो स्कूल जालना, या शाळेतील विद्यार्थ्यांचे जवळच्या शाळेत समायोजन करून सदरील अनाधिकृत शाळा तात्काळ बंद करण्यात यावी. शाळा बंद न केल्यास माननीय शिक्षण उपसंचालक औरंगाबाद, विभाग औरंगाबाद यांचे पत्र क्रमांक जावक क्रमांक 4423 दिनांक 27 मे 2022 मधील निर्देशानुसार व्यवस्थापनास दंड आकारण्यात यावा व तसा अहवाल या कार्यालयास सादर करावा.” दरम्यान या संदर्भात बोलताना प्राथमिक शिक्षणाधिकारी कैलास दातखिळ यांनी सांगितले की मराठवाड्यामध्ये आणखी दोन जिल्ह्यांमध्ये अशाच प्रमाणे ही शाळा सुरू आहे त्यांच्यावर देखील कार्यवाही होऊ शकते.
मान्यताप्राप्त शाळेला असतो UDISE नंबर म्हणजे काय?
जिल्हा शैक्षणिक माहिती प्रणाली भारत सरकार मार्फत ऑनलाइन पद्धतीने कार्यान्वित करण्यात आलेली आहे. पहिली ते बारावी पर्यंतच्या राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या, माध्यमांच्या, अभ्यासक्रमाच्या, अधिकृत मान्यता नसलेल्या शाळांची माहिती संकलित करून संगणीकृत करण्यात येते. जमा केलेली माहिती जिल्हास्तरावरून प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद यांच्यामार्फत शिक्षण परिषद (MPSP)यांना सादर केली जाते. विविध योजना राबविताना शासनाकडून अनुदान वाटप करण्यात येते त्या योजना राबवणे, अनुदान वाटप करणे, हे सुलभ व्हावे म्हणून शाळांची सविस्तर माहिती एकत्रित उपलब्ध व्हावी यासाठी यु-डायस ही प्रणाली कार्यान्वित केली आहे. या प्रणालीमध्ये एक 11 अंकी क्रमांक दिल्या जातो या क्रमांकामध्ये पाच टप्पे केले आहेत. प्रत्येक दोन आकड्यांचा वेगळा अर्थ निघतो. अगोदर राज्याचे नाव येतं त्यानंतर जिल्हा, तालुका, शाळा, गाव, शाळेची संख्या, असे त्या आकड्यांचे महत्त्व आहे. जोपर्यंत हा नंबर मिळत नाही तोपर्यंत ती शाळा अधिकृत होत नाही.
दरम्यान यासंदर्भात शाळेच्या प्राचार्याश्रीमती वेस्लि जॉन कोसी यांची प्रतिक्रिया घेतली असता त्या म्हणाल्या की,” ऑनलाईन सादरीकरण केले आहे, आणि आता ऑफलाईन सादरीकरण करणार आहोत, यु-डायस नंबर मिळालेला नाही तो मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com