घटस्फोटासाठी बसलेली बैठक लग्नाच्या खर्चावरून फिस्कटली; दोन गटात हाणामारी
जालना- सून नांदायला येत नसल्यामुळे वधू-वर पक्षाची बोलणी करायला बसलेली बैठक लग्नाच्या खर्चावरून फिस्कटली आणि कार्यालयातच हाणामारी सुरू झाली. याप्रकरणी दोन्ही पक्षाच्या वतीने मंठा पोलीस ठाण्यामध्ये परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मंठा तालुक्यातील शिरपूर येथे राहणाऱ्या मनोहर प्रकाश शिरसाट यांची सून नांदायला येत नसल्यामुळे तिच्याकडून फारकत घेण्यासाठी दोन्ही पक्षाची बैठक मंठा येथील सरस्वती मंगल कार्यालयात काल दिनांक 24 रोजी सायंकाळी पाच वाजता बसली होती. दरम्यान ही बैठक सुरू असतानाच वधू पक्षाकडील तुकाराम गंगाराम राजबिंडे हे मधेच उठले आणि आमची मुलगी नांदावयास पाठवायची नाही लग्नामध्ये सात ते आठ लाख रुपये खर्च झाला तो आत्ताच आम्हाला द्या व फारकत घ्या, असे म्हणाले. याचवेळी या प्रकरणातील तक्रारदार मनोहर शिरसाट यांनी, दोन्ही बाजूचा खर्च आम्हीच केला आहे त्यामुळे तुम्हाला पैसे कशाचे द्यायचे? असे म्हणताच मुरलीधर गंगाधर राजबिंडे तुकाराम ,गंगाधर राजबिंडे, गंगाधर राजबिंडे व इतर 15 ते 20 लोकांनी मनोहर शिरसाठ यांच्या चार चाकी वाहनावर दगडफेक करून त्यांना मारहाण केली, आणि सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान केले. तसेच ज्ञानेश्वर उगले व मधुकर काकडे राहणार कन्हेरवाडी तालुका सेलू यांनी जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. मनोहर शिरसाट यांनी दिलेल्या तक्रारीवरून मंठा पोलीस ठाण्यात भादवि कलम 504 506 324 323 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या पक्षाच्या वतीने तक्रारदार मुरलीधर गंगाधर राजबिंडे राहणार श्रीधर जवळा, तालुका परतुर यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, मनोहर प्रकाश शिरसाट, गणेश अंबादास कींगरे ,सिद्धेश्वर शिरसाट यांनी मुलीच्या फारकती संदर्भात आपण बसून बैठक घेऊ आणि त्यामध्ये तोडगा काढू असे म्हणून बैठक बोलावली आणि रीतसर बोलली न करता अरेरावीची भाषा केली, आणि मारहाण केली. या प्रकरणी मनोहर शिरसाट, आकाश मनोहर, शिरसाट आदींसह, भादवि कलम 504, 506 ,324 323 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com