अर्भकाला काटेरी झुडपात सोडून मातेचे पलायन
जालना-नवजात अर्भकाला काटेरी झुडपात सोडून आईने पलायन केल्याची घटना आज सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
अंबड येथे असलेल्या उपजिल्हा रुग्णालयाच्या बाजूलाच हा प्रकार घडला आहे. लालवाडी येथील रहिवासी मारुती देवराव शिंदे यांचे अंबड येथे उपजिल्हा रुग्णालयाच्या बाजूला हॉटेल आहे. सकाळी सात वाजेच्या सुमारास हे हॉटेल उघडण्यासाठी गेल्यानंतर त्यांना जवळच असलेल्या झुडपांमधून बाळ रडत असल्याचा आवाज आला, त्यामुळे त्यांनी तिथे जाऊन पाहिल्यानंतर काटेरी झुडपात चारी बाजूने दगड लावून एक अर्भक रडत असल्याचे दिसले. त्यांनी काशीराम लांडे आणि महादेव कांबळे यांच्या मदतीने आजूबाजूला या बाळाच्या आईचा तपास घेतला मात्र कोणीच समोर आले नाही. त्यानंतर या बाळाला अंबड येथील रुग्णालयात भरती केले आणि बालकल्याण समितीला माहिती दिली .दरम्यानच्या काळात चाइल्ड हेल्पलाइन चे समन्वयक संतोष दाभाडे यांनी देखील बालकल्याण समितीचे अध्यक्ष एकनाथ राऊत यांच्याशी संपर्क साधला आणि या बाळाला जालना येथील महिला व बाल रुग्णालयात भरती केले आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार 24 तासापूर्वी जन्मलेले हे बाळ पुरुष जातीचे असून दोन किलो वजनाचे आहे. सामान्य बाळाप्रमाणे हे बाळ सुदृढ आहे आणि त्याच्यावर योग्य उपचारही केल्या जात आहेत .या बाळा विषयीचा निर्णय बालकल्याण समिती घेणार आहे.
बालकल्याण समितीचे अध्यक्ष एकनाथ राऊत ॲड. कैलास जारे, सुरेखा सातपुते, योगिता माटे, यांच्यासह संतोष दाभाडे, सचिन लांडगे आदी पदाधिकाऱ्यांनी या बाळाला वाचविण्यासाठी प्रयत्न केले.–
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com