संभाषण कौशल्यामध्ये शब्दकोश नव्हे तर भावना महत्त्वाची-किशन वतनी
जालना-यश बुद्धांकामुळे नव्हे तर भावनिक बुद्धिमत्तेमुळे मिळते असे मत प्रेरणादायी वक्ते (मोटिवेशनल स्पीकर) किशन वतनी यांनी व्यक्त केले. लघुउद्योग भारतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानामध्ये “भावनिक बुद्धिमत्ता आणि पारिवारिक परिसंवाद” या विषयावर ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाचा प्रारंभ लघुउद्योग भारतीचे मराठवाडा अध्यक्ष अशोक राठी कोषाध्यक्ष, अविनाश देशपांडे, जालनाचे जिल्हाध्यक्ष अमर लाहोटी, सचिव किशोर देविदान यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आला.
माणसाला यश मिळवण्यामध्ये बुद्ध्यांकाचा नव्हे तर भावनिक बुद्धिमत्तेचा वाटा जास्त आहे ,यशस्वी लोकांमध्ये भावनिक बुद्धिमत्ता जास्त असते त्यामुळेच ते पुढे जातात असे सांगत असतानाच श्री .वतनी म्हणाले, की भावनेशिवाय निर्णय घेता येत नाही. त्यामुळे भावना महत्त्वाच्या आहेत, आणि निवड प्रक्रियेमध्ये भावनांचा मोठा वाटा आहे. सध्याच्या परिस्थितीत सर्वत्र यशाचे शिखर गाठण्यासाठी संभाषण कौशल्य चांगले असणे गरजेचे आहे, यशामध्ये संभाषण कौशल्याचा मोठा वाटा आहे असे सांगितले जाते आणि त्यावरच भर दिला जातो. परंतु प्रत्यक्षात मात्र यशामध्ये संभाषण कौशल्याला फक्त सात टक्के महत्त्व आहे. उर्वरित टक्केवारी मध्ये 38% महत्त्व हे तुमच्या चेहऱ्यावरच्या हावभावाला आणि आवाजातील चढउताराला आहे आणि उर्वरित टक्केवारी ही तुमच्या शरीराच्या हालचाली म्हणजेच बॉडी लँग्वेज वर अवलंबून आहेत. हे सर्व चढउतार हावभाव ही तुमची भावना ठरवते शब्दकोश नाही. असेही ते म्हणाले.
दरम्यान शब्दाला तुम्ही कोणती भावना दिली ते महत्त्वाचे आहे ,तुमच्या अंगातील संभाषण कौशल्य वाढविण्यासाठी शब्दकोश वाढवणे महत्त्वाचे नाही तर भावना वाढवणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्यामध्ये असलेल्या भावनेमुळे आपल्याला ऊर्जा मिळते .त्यामुळे एखाद्या सोबत आपण बोलताना किंवा काम करताना भावनेमुळे आपण भाऊक झालो तर समोरच्या व्यक्तीला आपली तळमळ कळते तसेच एखाद्या वेळी आपल्या भावनेमध्ये राग व्यक्त केला किंवा करणार असू तर अशावेळी दहा लोकांसोबत भांडण्याची ताकदही मिळते आणि हा प्रकार केवळ भावनेमुळेच घडतो. त्यामुळे यशस्वी होण्यासाठी बुद्ध्यांक नाही तर भावनिक बुद्धिमत्ता आवश्यक असल्याचेही त्यांनी किशन वतनी यांनी सांगितले.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com