Advertisment
Jalna Districtजालना जिल्हा

मानवता हाच सर्वश्रेष्ठ धर्म:श्रीक्षेत्र आनंदगडावर सर्वधर्म संमेलनातील सूर 

जालना -मानवतावादी विचार हेच  जगातल्या सर्व धर्माचे सार आहे. तथापि, प्रत्येक धर्माने प्रेम, बंधुभाव, एकता, अखंडता, शांतता यासारख्या मानवतावादी विचारांचीच शिकवण दिलेली आहे. धर्म आणि राजकारण या दोन भिन्न गोष्टी आहेत.राजकारणात धर्मनीती असली पाहिजे; मात्र धर्मात राजकारण होता कामा नये. कारण धर्म माणसांना जोडण्याचे काम करतो, तोडण्याचे नाही. म्हणूनच आज जगाला युद्धाची नव्हे तर बुद्धाची गरज आहे.डॉ.आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून एकसंघ केले. सीमेवर लढणारा जवान कोणत्याही जातीधर्माचा असला तरी सर्व देशवावासीयांच्या रक्षणासाठी प्राणपणाने लढतो. याचाच अर्थ आपणा सर्वांचे गंतव्य एकच आहे.आपण सर्व एकाच ईश्वराचे अंश आहोत. त्यामुळे मानवता हाच जगताला सर्वश्रेष्ठ धर्म असून सर्वांनी मानवता धर्माचे पालन केले पाहिजे, असा मानवतावादी सूर रविवारी ( दि .9)  श्रीक्षेत्र आनंदगड येथे आयोजित सर्वधम संमेलन अर्थात सत्संग मित्र मेळाव्यात निघाला.

   जालना शहरापासून जवळच असलेल्या श्रीक्षेत्र आनंदगड,( ता.जालना  ) येथे हभप डॉ.भगवानबाबा आनंदगडकर महाराजांच्या संकल्पनेतून रविवारी ( दि.9 ) दुपारी 3 वाजता हा सत्संग मित्र मेळावा संपन्न झाला. या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी सर्वधर्मांचे धर्मगुरूंची उपस्थिती होती. यावेळी हभप डॉ.भगवानबाबा आनंदगडकर महाराज, साखरखेर्डा येथील मठाधिपती सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज, गिरोली ( जि. बुलडाणा ) येथील महानुभाव आश्रमाचे महंत राघवेंद्र शास्त्री, नागेवाडी येथील बुद्धीविहाराचे भन्ते शिवली अंगुलीमाल शाक्यपुत्र, छत्रपती संभाजीनगर येथील गुरुद्वारा नानक धर्मशाळाचे खडकसिंग ग्रंथी,जमील अतुल उलमाचे मराठवाडा अध्यक्ष मौलाना सोहेल नदवी,इंडेवाडी येथील चर्चचे फादर भाकरे गुरुजी, सोलगव्हान येथील शिवदीक्षा आश्रमातील सद्गुरू सुर्यकांतेश्वर महाराज,फोकरा सदर मोती चौक ,खुलताबाद येथील गुलाब सुलतान शहा, छत्रपती संभाजीनगर येथील प्राप्तिकर विभागाचे आयुक्त प्रवीण पांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.


भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन धर्मगुरूंच्या हस्ते करण्यात आल्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात झाली.यावेळी बोलताना खडकसिंग ग्रंथीजी म्हणाले की,ईश्वराचे नामस्मरण करणे हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे. ‘ज्योत से ज्योत जगाते चलो,प्रेम की गंगा बहाते चलो’, उक्तिप्रमाणे सर्वांनी मिळून मिसळून राहिले पाहिजे आणि प्रेम, बंधुता,एकात्मता जोपासली पाहिजे.
यावेळी मौलाना सोहेल नदवी म्हणाले, प्रत्येक माणसाला देवाने निर्माण केलेले असून सर्वांचे रक्त एकाच रंगाचे आहे, नाक, कान, डोळे इत्यादी अवयव सारखेच आहे. त्यामुळे सर्वांनी एकमेकांना भेटल्यावर   सुहास्याने भेटले पाहिजे, बोलले पाहिजे,प्रेम घेतले पाहिजे आणि प्रेम दिले पाहिजे.इतरांना फायदा होईल अशी वर्तणूक ठेवणे ही एकप्रकारे ईश्वराची खरी ईबादत ( सेवा किंवा भक्ती ) आहे. अशी भक्ती मानव श्रेष्ठ आहे.
मानवता धर्म हा जगातला सर्वात श्रेष्ठ धर्म आहे.सर्व स्त्री पुरुष समान आहेत, ही शिकवण भगवान गौतम बुद्धांनी दिली.त्यामुळे फक्त बुद्धांना भगवान विष्णूचा अवतार म्हणून उपयोग नाही तर बुद्ध प्रत्येकाच्या आचरणात आला पाहिजे.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध आचरणात आणला आणि भारताला सर्वगुणसंपन्न संपन्न मानवतावादी धर्माची खरी शिकवण देणारे संविधान आपल्याला दिले. डॉ.आंबेडकरांनी सर्वांना एकत्र आणण्याचे काम केले.त्यामुळे आपण सर्वांनी ,सर्वधर्म गुरूंनी एकत्र येऊन एकता, अखंडता, शांतता आणि प्रेमभावना रुजवली पाहिजे. यावेळी माजी ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख भास्करराव आंबेकर यांनीही मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार मनोज कोलते पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद काळे यांनी केले. यावेळी भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


सर्वांचे गंतव्य एकच; सर्व एका ईश्वराचे अंश –  सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज -सर्व मानवजात एकसमान आहे. सर्व धर्मांचे भक्तीमार्ग भलेही भिन्नभिन्न असतील; मात्र अंतिम ध्येय एकच आहे, ते म्हणजे ईश्वर.जसे आज आपण आनंदगडावर सर्वजण भलेही वेगवेगळ्या मार्गांनी आणि ठिकाणांहून आलेलो असलो तरी आपले सर्वांचे ध्येय एकच होते ते म्हणजे ‘आनंदगड’! पावसाच्या पाण्याचे थेंब अनेक ठिकाणी पडतात.नाली,ओढा, नदीच्या माध्यमातून ते सर्व थेंब समुद्रात मिळसतात. तसंच आपण सर्व भलेही वेगवेगळ्या जाती – धर्मांचे आचरण करत असलो तरी सर्वांचे गंतव्य एकच आहे. यामुळे या जगात वाईट कोणीच नाही, कोणताही धर्म नाही, वाईट काही असेल तर ती आपली वृत्ती. ती निर्मळ करण्यासाठी अशा आध्यत्मिक ऊर्जेची गरज आहे, असे विचार सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज यांनी यावेळी मांडले.

सर्वांभूती एकच परमेश्वर – डॉ . आनंदगडकर महाराज  या भुतलावर आपण सर्वांनी जन्म घेतला  तेव्हा प्रत्येकाचा धर्म भलेही वेगवेगळा असेल, जाती, पंथ – संप्रदाय भिन्नभिन्न असतील. प्रत्येकाच्या प्रार्थना, पूजापाठ, उपासनेच्या विधी वेगवेगळ्या असतील.पेहराव, बोलीभाषा ,राहणीमान भिन्न असेल. तरीही आपण सर्वजण ही एकाच परमेश्वराची लेकरे आहोत, हे कोणीही विसरता कामा नये.जगद्गुरु तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे ‘जगमित्र होई सकळाचा, अशुभ न बोलावी वाचा’,. प्रत्येकाने प्रत्येकाचा मित्र बनून राहावे आणि एकमेकांच्या प्रति अशुभ, वाईट चिंतन किंवा बोलायला नको. प्रत्येक मानवामध्ये परमेश्वराचा अंश आहे. मानवता हाच खरा धर्म असून मानवता हाच सर्व धर्मांचा सार आहे.म्हणून आपण सर्वांभूती परमेश्वराला पाहिले पाहिजे,असे मौलिक विचार हभप डॉ.भगवानबाबा आनंदगडकर महाराज यांनी यावेळी व्यक्त केले.

दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button