त्याच पुढे काय?GDCC प्रकरण; सौ.खरात यांचा अटकपूर्व जामीन मंजूर;
जालना- तालुका पोलीस ठाण्यात 16 जानेवारीला GDCC म्हणजेच ग्लोबल डिजिटल कॅश कॉइन च्या व्यवहारा प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. 4 फेब्रुवारीपासून खरा तपास सुरू झाला. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चार संशयित आरोपींना ताब्यातही घेतले होते, आणि पुढील पंधरा दिवस याचा तपास वेगामध्ये सुरू होता. परंतु 18 फेब्रुवारी नंतर या तपासातीची गतिमंदावली आरोपींची पोलीस कोठडी संपली आणि न्यायालयाने आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली.
यादरम्यान फरार असलेले मुख्य आरोपी खरात दांपत्य यांचाही तपास पोलिसांना अद्याप लागलेला नाही. दरम्यान खरात दांपत्याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आणि न्यायालयीन कोठडीत असलेल्या पुणे येथील चौघांचे जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावले आहेत. त्यामुळे आता ही लढाई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुरू आहे आणि त्यातील मुख्य आरोपी असलेल्या सौ दीप्ती किराण खरात यांना काल दि.14 रोजी अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. आरोपींना अटक करून तीन महिने होत आले. तपासात प्रगती नसल्यामुळे अजूनही त्यांच्यावर दोषारोप पत्र दाखल झाले नाही. त्यामुळे भादवि कलम 409 लावून दोषारोप पत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ मिळवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला आणि त्यामध्ये ते यशस्वी देखील झाले आहेत. त्यामुळे अन्य वेळी 60 दिवसात जे आरोप पत्र दाखल करावे लागते ते आता 90 दिवसात करावे लागणार आहे. पोलीस, न्यायालय आणि आरोपी यांच्यामध्ये ही लढाई सुरू आहे.
दुसरीकडे ज्या ग्लोबल डिजिटल कॅश कॉईन मुळे एवढा सर्व खटाटोप झाला, त्या कॅश कॉइन ची आज बऱ्यापैकी स्थिती असल्याचे समोर येत आहे. कारण ज्या वेबसाईट आणि प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून हा सर्व व्यवहार केला जातो ती सर्व यंत्रणा आजही सुरळीत सुरू आहे. 27 जानेवारीला जीडीसीसी एल बँक वर लिस्ट झाला ( एल बँक म्हणजे जिथे या कॉइनची अधिकृत खरेदी विक्री करता येऊ शकते) त्यानंतर बिटमार्ट & कॉइन W ह्या एक्सचेंर्स वर देखील GDC कॉइन चे लिस्टिंग झाले आहे. तसेच आवश्यक असणारे बाकीचे टप्पे पार करत ” कॉईन मार्केट कॅप” इथे देखील या जीडीसीसी ची नोंद झाली आहे. त्यामुळे आता या GDCC मधील उलाढाल सुरू आहे . फरक एवढाच आहे की या कॉइन चा भाव कधी कमी होतो तर कधी जास्त होतो .कदाचित हा चढउतार गुंतवणूकदारांच्या लक्षात आल्यामुळेच की काय पहिल्या पंधरा दिवसात जेवढ्या तक्रारी आल्या त्याच्यानंतर पोलिसांकडे तक्रारी येणे बंद झाले आहे. कदाचित या काळामध्ये ज्या गुंतवणूकदारांनी किरकोळ रक्कम गुंतवली आहे त्यांचा परतावा देखील त्यांना मिळाला असावा म्हणून देखील या तक्रारी आल्या नसल्याचे सांगण्यात येत आहे.
गुंतवणूकदारांना हे आहेत पर्याय
ज्या गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक जीडीसीसी मध्ये केलेली आहे त्यांची गुंतवणूक आजही जशाला तशी आहे. बाजारभावातील चढउतारामुळे गुंतवणूकदारांसमोर तीन पर्याय आहेत पहिला पर्याय म्हणजे जेवढी गुंतवणूक केली होती ती गुंतवणूक आज भाव कमी असो अथवा जास्त ती काढून घेणे. भाव उतरले असतील तर निश्चितच नुकसान होईल परंतु भविष्यामध्ये गुंतवणूक परत मिळेल का? का ? बुडीत खात्यावर टाकावी लागेल! ही टांगती तलवार राहणार नाही.
दुसरा पर्याय म्हणजे या कॉइनचा ट्रेडिंग रेट वाढला की ते विकून टाका आणि तुम्ही तुमचा पैसा आणि नफा कमवून मोकळे व्हा. तिसरा एक पर्याय आहे तो म्हणजे एव्हरेज करा. सध्या असलेल्या गुंतवणुकीमध्ये आणखी थोडी गुंतवणूक करून वाढलेला भाव आणि मागील झालेले नुकसान एकत्रित करून तिचे ट्रेडिंग करा.या प्रकरणातील संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात असताना देखील आजही या कॅश कॉइनचे व्यवहार सुरू आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांनी संयम बाळगला तर भविष्यात त्यांची रक्कम परत मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com