Advertisment
Jalna Districtजालना जिल्हा

आज जागतिक हिवताप दिन; तीन वर्षात साडेसात लाख जनतेची तपासणी; सापडले फक्त दोन रुग्ण

जालना-जागतिक स्तरावर गेल्या काही दशकात हिवतापावर मात करण्यासाठी जे काही सर्वस्तरावर प्रयत्न केले गेले. त्याची आठवण म्हणून   २५ एप्रिल हा” जागतिक हिवताप दिन “म्हणून साजरा केला जातो. हिवतापावर मात करावयाची असेल तर सरकारी आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नाबरोबरच जनतेचा सहभाग व ईतर सरकारी यंत्रणेचे सहकार्य तितकेच महत्त्वाचे आहे. सर्वांनी एकाच वेळी एक दिलाने प्रयत्न केले तर हिवतापाच्या लढाईत हिवतापाचा पराभव होईल. या दृष्टीने जागतिक आरोग्य संघटनेने २५ एप्रिल हा दिवस ” जागतिक हिवताप दिन ” म्हणून घोषित केलेले आहे. भविष्यात या आजाराचा उद्रेक होवू नये म्हणून वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना आहेत. पूर्वी नेहमीच हिवतापाची साथ यायला लागायची त्यामुळे शासनाने एक वेगळाच विभाग यासाठी नियुक्त केला होता आणि या हिवतापाची भीतीही सर्वत्र निर्माण झाली होती डंक छोटा धोका मोठा असे म्हणत प्रत्येकाच्या मनात या हिवतापाची भीती होती परंतु शासकीय यंत्रणेने गप्पी मासे पाळा हिवताप टाळा म्हणत जनतेमध्ये जनजागृती केली आणि तेवढ्याच तत्परतेने जनतेने देखील साथ दिली त्यामुळेच की काय सन 2020 ते मार्च 2023 पर्यंत सात लाखापेक्षाही जास्त नागरिकांचे नमुने घेतल्यानंतरही केवळ दोनच हिवतापाचे रुग्ण आढळले आहेत त्यामुळे आता हा आजार नष्ट होण्याच्या मार्गावर आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही तरी देखील शासनाने 2030 पर्यंत या आजाराला हद्दपार करण्याचे ठरवले आहे. यासंदर्भात डॉ. एस. जी .गावंडे जिल्हा हिवताप अधिकारी यांनी यांनी देखील अधिक माहिती दिली आहे.

” जागतिक हिवताप दिन “ २५ एप्रिल यावर्षीचे घोष वाक्य.” Time to Deliver Zero Malaria: Invest, Innovate, Implement.”” शून्य मलेरिया वितरीत करण्याची वेळ: गुंतवणूक करा, नवीन करा, अंमलबजावणी करा ” या घोष वाक्यासह साजरा करण्यात येणार आहे. हिवताप या आजाराचा नायनाट करण्यासाठी कृतींना प्रोत्साहन देण्यासाठी, हिवताप विषयी जनतेमध्ये जनजागृती निर्माण करून व प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यासाठी त्यांचा सहभाग प्राप्त करून घेण्यासाठी दरवर्षी २५ एप्रिल हा दिवस ” जागतिक हिवताप दिन ” म्हणून साजरा करण्यात येतो.
हिवताप या आजाराचा प्रसार अँनाफिलस डासाच्या मादीमार्फत होतो. या डासाची उत्पत्ती स्वच्छ साठवून राहिलेल्या पाण्यात होते. उदा.भात शेती, स्वच्छ पाण्याची डबकी, नाले, नदी पाण्याच्या टाक्या, कालवे ईत्यादी मध्ये होते. या आजाराचे लक्षणे थंडी वाजून ताप येणे, ताप हा सततचा असू शकतो किंवा एक दिवस आड येवू शकतो, ताप नंतर घाम येवून अंग गार पडणे, डोके दुखणे व बऱ्याच वेळा उलट्या होतात. या आजाराचे निदान हे प्रयोगशाळेत रक्त नमुना तपासणी करून करता येते. तात्काळ निदान पध्दती आर.डी.के. (Rapid Dignostic Kit) apt) द्वारे स्पॉटवर रक्त नमुना घेऊन पी.एफ./ पी.व्ही. हिवतापाचे त्वरीत निदान करता येते. कोणताही ताप हा हिवताप असू शकतो. म्हणून प्रत्येक ताप रुग्णाने आपला रक्तनमुना नजिकच्या ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रात जावून तपासून घ्यावे. हिवताप दुषित रक्तनमुना आढळून आल्यास वैद्यकीय अधिकारी यांच्या सल्ल्याने दिल्या जाणाऱ्या क्लोरोक्विन व प्रायमाक्विन गोळयाचा औषधौपचार घ्यावा.
भविष्यात हिवताप आजाराचे उद्रेक होवू नये म्हणून आरोग्य विभागाकडून सर्व प्रकारचे नियोजन करण्यात आलेले असून हिवताप आजारावर मात मिळवण्यासाठी गावातील सर्व नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे. त्याकरिता पुढील साधे व सोपे प्रतिबंधात्मक उपाययोजना जनतेने राबविणे गरजेचे आहे.राज्यांच्या सततच्या आणि सामूहिक प्रयत्नांमुळे, देशान हिवताप प्रकरणे आणि मृत्यूंमध्ये लक्षणीय घट केली आहे.

तपासलेले नमुने सन 2020 तपासले दोन लाख 14 हजार 61 एक रुग्ण, सन 2021 एक लाख 92 हजार 381 ,एकही रुग्ण नाही. सन 2022 तपासले दोन लाख 59 हजार 504 एक रुग्ण .मार्च 2023 अखेर 72 हजार 131 एकही रुग्ण नाही.सर्वसाधारण माहिती 
हिवताप हा प्लाझमोडीयम या परोपजीवी जंतूपासून होतो. जगामध्ये दरवर्षी सर्वसाधारणपणे ३०० ते ५०० दशलक्ष लोकांना हिवताप होतो. हिवतापाच्या जंतूचे फॅल्सीफरम व व्हायव्हाँक्स हे दोन प्रकार प्रामुख्याने आढळून येतात. हिवतापाचा प्रसार अँनाफिलीस डासाच्या मादीमार्फत होतो. हिवतापाचा अधिशयन काळ हा १० ते १२ दिवसाचा आहे.
लक्षणे :-
थंडी वाजून ताप येणे.ताप हा सततचा असू शकतो किंवा एक दिवसाआड येऊ शकतो.नंतर घाम येऊन अंग गार पडते.ताप आल्यानंतर डोके दुखते.बऱ्याच वेळा उलट्याही होतात.
(2) मेंदूचा हिवताप ( Cerebral Malaria) :-
फॅल्सीफेरम प्रकारच्या हिवतापात वेळेवर योग्य उपचार न मिळाल्यास मेंदूचा हिवताप होऊ शकतो.लक्षणे तीव्र तापतीव्र डोकेदुखी / व उलट्या होणे.मान ताठ होणे.झटके येणेबेशुद्ध होणे. रोगनिदान १) प्रयोगशाळेत रक्त नमुना तपासणी करून घेणे.२) तत्काळ निदान पद्धती ( Rapid Diagnostic Kit) हिवतापाचे खात्रीशीर निदान हे रुग्णाचा रक्तनमुना तपासून करता येते.वरील रोगाची लक्षणे असलेल्या व्यक्तीच्या अशा रक्त नमुन्यात हिवतापाचे जंतु आढळून येतात.

रोगजंतूची माहिती 
रोग प्रसार कसा होतो हिवतापाचा प्रसार अँनाफिलीस जातीच्या मादी डासांमार्फत होतो. या डासांची उत्पत्ती स्वच्छ साठून राहिलेल्या उदा. स्वच्छ पाण्याची डबकी, भात शेती, नाले , नदी, पाण्याच्या टाक्या इ. मध्ये होते.डास हिवताप रुग्णास चावतो त्यावेळेस रक्ताबरोबर हिवतापाचे जंतू डासाच्या पोटात जातात. तेथे वाढ होऊन ते जंतु डासाच्या लाळेवाटे निरोगी मनुष्याच्या शरीरात सोडले जातात. मनुष्याच्या शरीरात हे जंतू लिहर मध्ये जातात तेथे त्यांची वाढ होऊन १० ते १२ दिवसांनी मनुष्याला थंडीवाजुन ताप येतो. प्रतिबंधात्मक उपाययोजना हिवताप प्रसारक अँनाफिलीस डासांची उत्पत्ती स्वच्छ पाण्यात होते. डास स्वच्छ पाण्यात सुमारे १५० – २०० अंडी घालतात. अंडी, अळ्या, कोष, प्रौढ डास हे डासाचे जीवन चक्र आठ ते दहा दिवसात पूर्ण होते. म्हणून डास उत्पत्ती थांबवण्यासाठी नागरिकांनी खालील उपाय योजना केल्या पाहिजेत.
• पाणी साठविण्याची भांडी घट्ट झाकून ठेवा. आठवड्यातून एकदा सर्व पाणी साठे आतून घासून-पुसून कोरडे करा व दुसऱ्यादिवशी पाणी भरा.
• नारळाच्या करवंट्या, टायर, बाटल्या व प्लास्टिक डबे नष्ट करा व यामध्ये पाणी साठा होऊ देऊ नका.
• झोपताना मच्छरदाणीचा वापर करा किंवा डासांना पळून लावणाऱ्या अगरबत्या, मँटचा वापर करा.
• घराभोवतीचा परिसर स्वच्छ ठेवा. सांडपाण्याची विल्हेवाट शोषखड्यातून लावा. परसबाग फुलवा.
• घराच्या परिसरातील डबकी बुजवा किंवा वाहती करा.
• घराच्या खिडक्यांना जाळ्या बसवा.
• मोठ्या पाणीसाठ्‌यामध्ये गप्पी मासे सोडा.
• सेप्टी टँक च्या व्हेटपाईपला वरच्या बाजूला नायलॉन जाळी बसून घ्या व डास उत्पत्ती थांबवा.
• नेहमी पूर्ण बाह्याचे कपडे घालावेत.
• आपल्या घराभोवताली पाणी साचू देऊ नका.
• घरातील पाण्याचे सर्व साठे दर शनिवारी किंवा आपल्या सोयीनुसार आठवडयातून एक वार निश्चित करून रिकामे करावेत या साठयातील आतील बाजू व तळ घासून पुसून कोरड्या करून पुन्हा वापराव्यात व पाण्याचे साठे घट्ट झाकनाने झाकून ठेवावेत.
• आंगन व परिसरातील खड्डे बुजवावेत त्यात पाणी साचणार नाही याची खबरदारी घ्यावी.
• झोपतांना पुर्ण अंगभर कपडे घालावे, पांघरून घेऊन झोपावे.
• संध्याकाळी ६ ते ८ दरम्यान दारे खिडक्या बंद कराव्यात, खिडक्यांना जाळया बसवाव्यात, झोपतांना भारीत मच्छरदाणीचा वापर करावा.
• आपल्या घरी किटकनाशक औषधीचे फवारणी पथक आल्यास आपले घर संपूर्ण फवारून घ्यावे.फवारलेले घर किमान २ ते २.५ महिने सारवू (रंगरंगोटी) करू नये.
• घराच्या छतावरील फुटके डब्बे, टाकाऊ टायर्स, कप , मडकी, ईत्यादी ची वेळीच विल्हेवाट लावा, संडासच्या व्हेट पाईपला वरच्या टोकाला जाळी किंवा पातळ कपडा नेहमी बांधावा, तर आठवडयाला नाल्यामध्ये रॉकेल किंवा टाकाऊ ऑईल टाकावे.

वरील सर्व उपाय योजनांचा अवलंब केल्यास डासामार्फत प्रसार होणारे हिवताप, डेंग्यू , हत्तीरोग, चिकनगुनिया, झिका, जपानी मेंदूज्वर या आजारापासून आपण मुक्त होऊन व आपल्या भावी पिढ्यांना आरोग्यदायी जीवनाचा अमूल्य ठेवा देऊ.तसेच वरील सर्व रोगाची तपासणी व उपचार सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय व जिल्हा रुग्णालयात मोफत उपलब्ध आहे.वरील दक्षता प्रत्येकाने घेतल्यास डासाची उत्पत्ती होणार नाही व डास चावणार नाही. म्हणजे योग्य काळजी व वेळीच केलेला उपचार तुम्हाला होणाऱ्या आजारापासून दुर ठेवील त्यासाठी किटकजन्य आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वांनी हातभार लावावा असे आवाहन आरोग्य खात्याकडून करण्यात येत आहे. जालना जिल्हा हिवताप कार्यालयातील कर्मचारी महेंद्र वाघमारे ,शिवराज वाडेकर, नितीन सोनकर, अरुण गोरवाडकर ,रामेश्वर मंडळ, श्रीनिवास दुसाने.

सौजन्य–महेंद्र दि.वाघमारे,आरोग्य कर्मचारी
जिल्हा हिवताप कर्यालय जालना.

दिलीप पोहनेरकर,9422219172
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button