DHO च्या खुर्चीकडे अधिकारी का फिरवीत आहेत पाठ?
जालना- आघाडी सरकारचे सत्तांतर झाल्यानंतर जालना जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खदगावकर यांच्यावर बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांनी गंडांतर आणले, आणि डॉ. खतगावकर निलंबित झाले. त्याच्यानंतर जालन्याचा जिल्हा आरोग्य अधिकारी पदाचा पदभार इतरांकडे सोपविण्यात आला आणि दरम्यानच्याच काळात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीही बदलले. आणि सर्व कार्यक्रम नवा गडी नवा राज प्रमाणे सुरू झाले.
जिल्हा एकात्मिक महिला व बालविकास संगोपन अधिकारी डॉ. जयश्री भुसारे यांची या पदावर प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून वर्णी लागली आणि जिल्ह्याचा कारभार पुन्हा एकदा नव्या जोमाने सुरू झाला. एवढ्या मोठ्या पदाची जबाबदारी सांभाळत असताना किरकोळ गोष्टींमुळे वरिष्ठांची मर्जी सांभाळणे शक्य होत नाही त्यामुळेच की काय? सध्या जालना जिल्हा परिषद आरोग्य विभागात वर्ग एक श्रेणीचे तीन अधिकारी असताना देखील जिल्हा आरोग्य अधिकारी हे पद श्रेणी दोनच्या अधिकाऱ्याकडे देणे भाग पडले असल्याची चर्चा सध्या जिल्हा परिषद वर्तुळात सुरू आहे. कदाचित एखाद्या अधिकाऱ्याच्या सन्मानाला ठेच पोहोचल्यामुळेच हा सर्व प्रकार सुरू असल्याचे समजते.
डॉ. खतगावकर यांचे निलंबन झाल्यानंतर जिल्हा एकात्मिक महिला व बालसंगोपन अधिकारी डॉ. जयश्री भुसारे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सलमा इराणी , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गजानन मस्के या तिघांची या पदावर वर्णी लागण्याची क्षमता होती, परंतु पद एक असल्यामुळे डॉ. भुसारे यांची वर्णी लागली. दरम्यानच्या काळात आरोग्य उपसंचालकांच्या बैठकीदरम्यान काही विषयांवर चर्चा होत असताना अधिकाऱ्यांमध्ये मतभेद झाले असल्याचे सांगण्यात येत आहे आणि त्यातूनच डॉ. जयश्री भुसारे यांनी हा पदभार सोडला असल्याचे समजते. त्यासोबतच डॉ. सलमा इराणी आणि डॉ. गजानन म्हस्के यांनी देखील या पदामध्ये जास्त रस न दाखविल्यामुळे जिल्हा साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. परशुराम नादरवाड यांच्याकडे सध्या जिल्हा आरोग्य अधिकारी पदाचा प्रभारी पदभार देण्यात आला आहे .खरे तर हे पद श्रेणी एकचे आहे मात्र तीन अधिकारी असताना देखील श्रेणी दोनच्या अधिकाऱ्याकडे हा पदभार का द्यावा लागला? याविषयी जिल्हा परिषद वर्तुळात तर्क वितर्क सुरू आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी हे पद शासनाकडून भरल्या जाते आणि त्यांची अधिकृत नियुक्ती केल्यानंतर अधिकारांमध्ये फरक पडतो जरी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अखत्यारीत हे पद असले तरी निर्णय घेण्याच्या क्षमतेमध्ये आरोग्य अधिकारी सक्षमपणे निर्णय घेऊ शकतात. प्रभारी पदांमध्ये प्रत्येक गोष्टीवर वरिष्ठांच्या निर्णयावर अवलंबून राहावे लागते. कदाचित आता या प्रकारामुळे वरील तीन पैकी कोणतेही अधिकारी आरोग्य संचालनालयाकडून अधिकृतपणे नियुक्ती आणण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे झाल्यास हे पद कोणाला द्यायचे किंवा या खुर्चीवर कोणाला बसवायचे याचा अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना नसतो.
दिलीप पोहनेरकर,9422219172
,www.edtvjalna.com,you tube edtv jalna