छ.संभाजी म.उद्यानात दीडशे फूट उंचीचा राष्ट्रध्वज; “त्या” भागात डीजेला बंदी घालावी -आ.गोरंट्याल

जालना- छत्रपती संभाजी महाराज उद्यानात दीडशे फूट उंचीचा राष्ट्रध्वज उभारणे आणि मोती तलाव चौपाटीवर सामान्य जनतेला पाहण्यासाठी जुने रेल्वे इंजिन बसवणे, या दोन्ही कामांचा भूमिपूजन समारंभ आज दिनांक एक जून रोजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमाला आ. कैलास गोरंट्याल, उद्योगपती घनश्यामजी गोयल, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड उपविभागीय अधिकारी श्रीमंत हरकळ, नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
छत्रपती संभाजी महाराज उद्यान आणि त्याला लागूनच असलेला मोती तलाव, तलावाच्या काठावर असलेली चौपाटी आणि चौपाटीच्या बाजूने जाणारा महामार्ग ही निसर्ग रम्य दृश्य एकत्र येत असल्यामुळे या ठिकाणी हा दीडशे फूट उंचीचा राष्ट्रध्वज सर्वसामान्यांच्या मनामध्ये राष्ट्रप्रेम जागवेल, तसेच चौपाटीवर येणाऱ्या नागरिकांसाठी जुन्या रेल्वेचे इंजिन बसवण्यामागे काहीतरी नवीन सुशोभीकरण केल्यासारखे वाटावे आणि लोकांना विरंगुळा व्हावा, जुन्या आठवणी ताज्या व्हाव्यात हा त्यामागचा उद्देश आहे, अशी माहिती उद्घाटक रावसाहेब दानवे यांनी दिली. दरम्यान मोती तलावाच्या बाजूने मुलांसाठी रेल्वेचेही प्रयोजन केले होते मात्र जागे अभावी ते होऊ शकले नसल्याचे त्यांनी सांगितले.
सायलेंट झोन जाहीर करा- आ.गोरंट्याल शहराच्या मध्यवस्तीत असलेले गांधी चमन येथील स्त्री रुग्णालयात अनेक नवजात बालकांचा रोज जन्म होतो. या बालकांना परिसरात वाजणाऱ्या डीजेमुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. स्त्री रुग्णालयाच्या बाजूनेच मुख्य रस्ते गेले असल्यामुळे वाहनांचा कर्णकरकश्य आवाजासोबतच शुभ कार्यामध्ये वाजणाऱ्या डिजेचा आवाज या बालकांना सहन होत नाही, त्यामुळे त्यांच्या शरीरावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आ. गोरंट्याल यांनी वर्तवली आहे. या परिसरामध्ये सायलेंट झोन जाहीर करावा अशी मागणी ही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी केले.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com