जुन्या भांडणाच्या कारणावरून तरुणाला चाकूने भोसकले ;चार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
जालना- जुन्या भांडणाच्या कारणावरून वीस वर्षीय तरुणाला चाकूने भोसकल्याची घटना दिनांक चार रोजी सायंकाळी पाच वाजता नवीन जालना भागातील कालीकुर्ती भागामध्ये घडली. या प्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. दरम्यान भोसकलेल्या तरुणावर शहरातील निरामय हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत.
मुशर्रफ मझहर खान वय वीस वर्ष राहणार, काली कुर्ती भाग, यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आज सायंकाळी चार वाजेच्या सुमारास मुशरब खान व त्याचे मित्र अमीर शेख मतीन, अरबाज नवाब शहा, हे तिघेजण घराच्या पाठीमागे गंगा बिल्डिंग जवळील कचराकुंडी जवळ बोलत उभे होते. त्याचवेळी त्यांच्याजवळ मागील भांडणाच्या कारणावरून त्यांच्या ओळखीचा शिवा भुरेवाल स्कुटी वरून आला. त्याच्यासोबत आदित्य भुरेवाल, सागर मुळे हे देखील होते. जवळ आल्यानंतर शिवा भुरेवाल याने मागील भांडणाच्या कारणावरून शिवीगाळ सुरू केली आणि,” तू इथेच थांब, मी परत येतो” असे म्हणत तिघेजण निघून गेले आणि काही वेळातच ते परत आले. यावेळी या तिघांसोबत यश पहाडिया हा तरुण देखील पायी चालत येत होता. जवळ आल्यानंतर शिवा भुरेवाल याने मुशर्रफ खान याला मारहाण सुरू केली हे भांडण सोडविण्यासाठी अरबाज शहा, अमीर शेख, हे दोघे आले असता शिवा भुरेवाल याने त्याच्या खिशात असलेला चाकू अरबाज शहा यांच्या पोटात खूपसून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. तशाच परिस्थितीमध्ये अरबाज शहाला सदर बाजार पोलिस ठाण्यात आणण्यात आले आणि तेथून रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले. दरम्यान रस्त्यामध्ये अरबाज शहा ची तब्येत खालावल्यामुळे जवळच असलेल्या निरामय हॉस्पिटल येथे भरती करण्यात आले आहे. या प्रकरणी निरामय हॉस्पिटलचे डॉ पद्माकर सबनीस आणि डॉ. गोविंद पाटील यांनी लगेचच उपचार सुरू केले. त्यामुळे अरबाज शहा तूर्तास तरी धोक्याच्या बाहेर असल्याची माहिती डॉ. सबनीस यांनी दिली आहे. मुशर्रफ खान याने दिलेल्या तक्रारीवरून शिवाभुरेवाल, आदित्य भुरेवाल, सागर मुळे, आणि यश पहाडिया या चार तरुणांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये भादवि कलम ३०७, ३२६, ३२३,५०४,५०६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक काकरवाल हे करत आहेत. सदर बाजार पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस उपनिरीक्षक संपत चाटे, पोलीस उपनिरीक्षक मोईन खान आदींची उपस्थिती होती. या सर्व प्रकरणावर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. राहुल खाडे हे स्वतः लक्ष ठेवून आहेत आणि त्यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात येऊन परिस्थितीचा आढावाही घेतला आहे.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com