“अमृतवन”ची अवस्था बिकट; बाटलीने पाणी घालून झाडे जगविण्यासाठी नागरिकांचा खटाटोप
जालना -जालना शहरातील एक निसर्गरम्य ठिकाण म्हणून उदयास येत असलेल्या “अमृतवन” ची अवस्था आता बिकट होत चालली आहे खरं तर हे वन जालनेकारांसाठी एक वरदान ठरणार आहे. या अमृतवनावर भरपूर खर्चही करण्यात आला होता. सध्या देखील मोती तलावाच्या काठावर हे अमृतवन असल्यामुळे पाणी देखील उपलब्ध आहे. तलावाच्या काठावर असलेली झाडे आजही सुस्थितीत आहेत. मात्र दुसऱ्या बाजूची मुरमाड जमिनीवरची झाडे शेवटच्या घटका मोजत आहेत. त्यामुळे हे वन भविष्यात “अमृत” राहील का “मृत” होईल अशी शंका वाटायला लागली आहे.
दरम्यान झाडांची ही दुरावस्था पाहवत नसल्यामुळे काही सुज्ञ नागरिकांनी बाटलीने पाणी घालून या झाडांना जगविण्याचा खटाटोप सुरू केला आहे.
शहरातील मोती तलावाच्या काठावर शासकीय निवासस्थाने आहेत. त्यामध्ये जिल्हा परिषद अध्यक्षांचेही निवासस्थान आहे. त्याच बाजूने रेल्वे जाते आणि दुसऱ्या बाजूला जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, न्यायमूर्ती ,यांच्या निवासस्थानाकडे जाणारा रस्ता आहे. हे सर्व जिल्हास्तरावर वरिष्ठ अधिकारी आहेत यांच्यावर जिल्ह्यात तरी कोणतेही अधिकारी नाहीत. असे असतानाही जालन्याच्या या वैभवाची अशी दुरावस्था ही अनेकांना खटकणारी बाब आहे. खरंतर 11 जुलै 1994 ला तत्कालीन जिल्हाधिकारी भालचंद्र विर यांनी सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या याच ठिकाणी “स्मृती उद्यान”चे उद्घाटन केले होते .तब्बल 17 वर्षानंतर पुन्हा त्याच ठिकाणी दिनांक 22 ऑगस्ट 2021 रोजी स्मृती वनाचे नाव गायब झाले आणि तिथे नगरपालिकेचे “अमृतवन” म्हणून शीला फलक लागला. या फलकावर जुना कोणताही इतिहास किंवा सामाजिक वनीकरणाचे नावही लिहिण्याचे कष्ट घेतले गेले नाही. याचे लोकार्पण तत्कालीन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री राजेश टोपे, आ. कैलास गोरंट्याल, नगराध्यक्ष सौ. संगीता गोरंट्याल आणि जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले.
या अमृतवणामध्ये अनेक वैद्यकीय औषधी वनस्पती, सुशोभीकरणाची झाडे ,घनवन प्रकल्प अंतर्गत पिंपळ, वड, लिंब, अशी दीर्घकाळ टिकणारी झाडेही लावण्यात आलेले आहेत. परंतु या झाडांना पाणीच मिळत नसल्यामुळे झाडांनी माना टाकायला सुरुवात केली आहे. निसर्गरम्य आणि प्रदूषणापासून मुक्त असलेला हा परिसर असल्यामुळे पहाटेच्या वेळी अनेक नागरिक इथे प्रभात फेरीसाठी येतात परंतु इकडे येणाऱ्या रस्त्यावर अनेक घरे उभी राहिल्यामुळे हा रस्ता अरुंद झाला आहे. आणि पर्यायी इकडे फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना या भागात साप, धामीन, यासारखे सरपटणारे प्राणी फिरत असल्याची भीतीही दाखवली जात आहे.
प्रत्यक्षात मात्र या या अमृत वनाचे प्रवेशद्वारही गायब झाले आहे त्यामुळे म्हशीसारखे पाळीव प्राणी इथे मुक्त संचार करत हिरवळीवर ताव मारत आहेत. भीती घालण्याच्या प्रकारांना न जुमानता काही नागरिक आजही इथे प्रभात फेरीला येतात, आणि झाडांची दुरावस्था न पहावल्यामुळे बाटलीने झाडांना पाणी घालण्याचा घालून त्यांना जगवण्याचा खटाटोप करत आहेत. यामध्ये यामध्ये संतोष रेगुडे, दत्ता शहाणे, गिरीश दशरथ, आणि अन्य काही नागरिकांचा समावेश आहे.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com