अवैध वाळू चोरी प्रतिबंधक पथकातील तलाठी परतला;पोलिसांची धावपळ थांबली
मंठा-जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यांतर्गत असलेल्या उसवद देवठाणा सज्जाचे तलाठी गायब झाल्यामुळे त्यांच्या पत्नीने, पती हरवल्याची तक्रार मंठा पोलीस ठाण्यात दिली होती. विशेष म्हणजे हे तलाठी,अवैध वाळू चोरी प्रतिबंधक पथकाचे सदस्य आहेत. त्यामुळे पोलिसांनी याचे गांभीर्य लक्षात घेता सर्व यंत्रणा सज्ज केली, सर्व पोलीस ठाण्यांना बिनतारी संदेश गेले, स्थानिक गुन्हा शाखेला ही माहिती दिली गेली.
आपल्या विरुद्ध तक्रार दाखल झाल्याचे कळताच तलाठी नितीन शेषराव चिंचोले हे दिनांक 13 रोजी संध्याकाळी आठ वाजेच्या सुमारास घरी हजर झाले,आणि पोलिसांची पुढील धावपळ टळली.
जिल्ह्यामध्ये अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि त्या-त्या तहसीलदारांनी या उपशावर नियंत्रण ठेवण्यासाठी भरारी पथकांची ही स्थापना केली आहे, त्यामुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे. वेळप्रसंगी ते या पथकावरच नव्हे तर पोलीस अधिकारी आणि महसूल अधिकाऱ्यांच्या अंगावरही वाहन घालण्यास मागे पुढे पाहत नाहीत. त्यामुळे हे तलाठी गायब झाल्यामुळे पोलिसांना धावाधाव करावी लागली.
मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात असलेल्या मालगणी येथील नितीन शेषराव चिंचोले वय वर्ष 40 हे सध्या मंठा तहसील अंतर्गत उसवद देवठाणा सजाचे तलाठी आहेत. मंठा शहरात ते शिवशक्ती नगर येथे राहतात. दरम्यान 12 तारखेला दुपारी तहसील कार्यालय मंठा येथे जातो असे सांगून ते घरातून निघाले ते 13 तारखेला दुपारी साडेबारा वाजेपर्यंत घरी पोहोचलेच नाहीत त्यामुळे त्यांची पत्नी रेखाबाई नितीन चिंचोले वय 38 वर्ष या काळजी करू लागल्या. कुठलाही संपर्क होत नव्हता त्यामुळे त्यांनी मंठा पोलीस ठाणे गाठले आणि पती हरवल्याची तक्रार दिली. एक शासकीय कर्मचारी आणि तो देखील अवैध वाळू चोरी प्रतिबंधक पथकामधील सदस्य असल्यामुळे पोलिसांनी याची गांभीर्याने दखल घेत सर्व यंत्रणा सज्ज केली, त्याच दरम्यान नितीन चिंचोले यांना आपल्या पत्नीने मंठा पोलीस ठाण्यात आपण हरवल्याची तक्रार दिली असल्याची माहिती समजली आणि 13 तारखेला संध्याकाळी आठ वाजता ते स्वतःहून घरी हजर झाले. दरम्यान 12 तारखेला आपण मंठा तहसील कार्यालयात गेलो होतो आणि तिथून वैयक्तिक कामानिमित्त जालना येथे गेलो आणि तिथे मुक्काम केला. परंतु सोबत भ्रमणध्वनी नसल्यामुळे घरच्यांशी संपर्क करता आला नाही असे कारण त्यांनी पोलिसांना दिलेल्या जबाब दिल्या आहे. मंठा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख कर्मचारी के.डी.हराळ यांनी नितीन शेषराव चिंचोले यांना त्यांची पत्नी रेखाबाई चिंचोले आणि त्यांच्या नातेवाईकांकडे सुपूर्द केले आहे.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com