सीएमच्या सभेसाठी लाभार्थ्यांना आणून गर्दी वाढवा- केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांचे फर्मान
जालना -“शासन आपल्या दारी” या कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिनांक 25 रोजी जालन्यात येत आहेत. “मुख्यमंत्री आपल्या दारी” येत असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या सभेला गर्दी व्हावी म्हणून कर्मचाऱ्यांनी शासकीय योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांची गर्दी वाढवावी, असे फर्मान केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज सोडले आहे.
शासन आपल्या दारी या योजनेच्या आढाव्यासाठी जालना जिल्हा परिषदेच्या सभागृहात आज विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मंत्री रावसाहेब दानवे यांची उपस्थिती होती. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, विभाग प्रमुख उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जिल्हा शल्यचिकित्सक या शासनाचे अन्य काही विभागाचे अधिकारी हजर होते. त्यामुळे सभागृहात पाय ठेवायलाही जागा नव्हती.
शासनाच्या रमाई आवास घरकुल, फलोत्पादन, दुग्ध व्यवसाय, संजय गांधी निराधार योजना, कृषी संजीवनी योजना, पशुसंवर्धन महिला बचत गट ,अशा अनेक योजनांच्या माध्यमातून जनतेला मदत केल्या जाते किंवा अनुदान दिले जाते. ज्यांनी या योजनांचा लाभ घेतला आहे अशा सर्व लाभार्थ्यांना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे फर्मान श्री.दानवे यांनी सोडले आहे. विशेष म्हणजे जास्तीत जास्त जबाबदारी ही तलाठी, ग्रामसेवक, आणि कृषी विभागावर देण्यात आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या सभेला गर्दी तर दिसेल मात्र ते लाभार्थी आहेत का मतदार हे ठरवणे कठीण आहे. दरम्यान ही गर्दी जमवण्यासाठी जरी फर्मान सुटले असले तरी या लाभार्थ्यांच्या जाण्या- येण्याचा विषय मात्र सुटलेला नाही. कदाचित “घरूनच खाऊन या, आणि इथे पाणी प्या” असेही असण्याची शक्यता आहे.
शासनाची आणि लोकप्रतिनिधींची संपूर्ण ताकद 25 तारखेच्या सभेसाठी लावली जात आहे. दिव्यांगांसाठी घरपोच प्रमाणपत्र योजना हा कार्यक्रम नुकताच हाती घेण्यात आला होता परंतु अद्याप पर्यंत दिव्यांगांच्या घरी प्रमाणपत्र गेलेले नाही त्यामुळे दोन दिवसात ही कामे मार्गी लावा अशा सूचनाही जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिल्या आहेत.
अधिक माहितीसाठी डाऊनलोड करा,
App on play store- edtv jalna
www.edtvjalna.com
दिलीप पोहनेरकर ,942221972