संगीता लाहोटी खून खटल्याची सुनावणी सुरू; विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी मांडली बाजू
जालना- शहरात पोस्ट ऑफिस भागात राहणाऱ्या योग प्रशिक्षिका संगीता अलोक लाहोटी यांचा दिनांक 14 डिसेंबर 2021 रोजी सकाळी नऊ वाजता खून झाला होता. याप्रकरणी हर्षवर्धन अभय लाहोटी यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्या अनुषंगाने पोलिसांनी आरोपी भीमराव निवृत्ती धांडे, राहणार मंमादेवी नगर अंबड रोड जालना या 57 वर्षीय व्यक्तीविरुद्ध भादवि कलम 302 अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला होता. दरम्यान हा गुन्हा केल्यानंतर आरोपी धांडे यांनी देखील घटनास्थळीच विष पिऊन आत्महत्याचा प्रयत्न केला होता, परंतु वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील दुर्घटना टळली. फिर्यादी पक्षाच्या वतीने हा खटला चालवण्यासाठी सरकारकडे विशेष सरकारी वकील देण्याची मागणी केली होती. त्यानुसार सरकारने ही मागणी मान्य करत विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती केली आहे. आज दिनांक 10 जुलैपासून या खटल्याची सुनावली सुरू झाली आहे. त्यासाठी उज्वल निकम हे स्वतः आज प्रमुख जिल्हा व सत्र न्यायमूर्ती श्रीमती वर्षा मोहिते यांच्या न्यायालयात युक्तिवाद करण्यासाठी हजर झाले होते .आज पहिल्या दिवशी जितेंन नाथांनी आणि या प्रकरणातील तक्रारदार हर्षवर्धन लाहोटी यांच्या साक्षी घेण्यात आल्या.
मागील बातमी वाचण्यासाठी खालील लिंकला copy paste करा.…त्याने संगीता लाहोटी यांचा खून करून स्वतःही पिले विष https://edtvjalna.com/2021/4511/
आजच्या युक्तिवादामधील काही ठळक मुद्दे
न्यायालयासमोर हर्षवर्धन लाहोटी यांना हजर केले असता त्यांनी घडलेला सविस्तर वृत्तांत न्यायालयासमोर कथन केला “त्यामध्ये आपण काकांच्या घरी पोहोचल्यानंतर दुसरे अरुण काका एका मिनिटात पोहोचले, ते आल्यानंतर सर्वजण पाच मिनिटांनी घराबाहेर पडलो, त्यानंतर सदर बाजार पोलीस ठाण्यात गेलो, तिथे भीमराव धांडे उपस्थित होते, आम्ही गेल्यानंतर आठ ते दहा मिनिटांनी धांडे हे पोलीस स्टेशनच्या बाहेर पडले, पोलीस ठाण्यात आम्ही अर्धा तास होतो. या अर्ध्या तासामध्ये तक्रार देण्याबद्दल चर्चा चालू होती परंतु काकांचा तक्रार देण्यास विरोध होता कारण, तो आपल्याच घरातला जुना माणूस आहे असे त्यांचे म्हणणे होते, आणि त्याने माफी ही मागितली आहे आणि पुढच्या वेळी असे करणार नाही असेही त्याने सांगितले होते. म्हणून काकांचा तक्रार देण्यास विरोध होता. या सर्व माहिती नंतर घटनास्थळाबद्दल विचारले असता हर्षवर्धन यांनी दिलेल्या जबाब मध्ये म्हटले आहे की, एक मूठ नसलेला चाकू संगीता लाहोटी यांच्या छातीमध्ये होता आणि एक मूठ असलेला चाकू संगीता लाहोटी यांच्या पोटामध्ये होता .”हे दोन्ही चाकू फिर्यादीला दाखवल्यानंतर त्यांनी ते ओळखलेले आहेत.
घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज देखील न्यायालयात सादर करण्यात आले .त्यावेळी जप्त केलेला डीव्हीआर पोलिसांनी डीव्हीआर मधील काढलेले फुटेज आणि फॉरेन्सिक लॅबमधून तपासून आलेले फुटेज या सर्व पुराव्यांची न्यायालयाने स्वतः पाहणी केली आहे. सुनावणी दरम्यान न्यायालयाने घर किती मजल्याचे आहे? कोणत्या मजल्यावर किती खोल्या आहेत? किती कॅमेरे आहेत? कुठे कुठे लावलेले आहेत? या सर्व बारीक-सारीक गोष्टींची दखल घेतली आहे. हे सर्व पुरावे विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी प्रभारी जिल्हा सरकारी वकील बाबासाहेब इंगळे, तपासिक अधिकारी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले यांचीही उपस्थिती होती.
ताज्या बातम्या पाहण्यासाठी http://www.edtvjalna.com https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv