ते दोघेही पं.स.कंत्राटी कर्मचारी; अडकले लाचेच्या जाळ्यात
भोकरदन दिनांक 17- भोकरदन येथील पंचायत समिती कार्यालयात कंत्राटी पदावर काम करत असलेले दोन कंत्राटी कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने टाकलेल्या छाप्यामध्ये जाळ्यात सापडले आहेत. त्यांच्याकडून रोख रक्कम सात हजार रुपये जप्त करण्यात आली आहे.
तालुक्यातील दावतपूर येथे सन 2021 मध्ये सार्वजनिक विहीर मंजूर झालेली होती. या मंजूर विहिरीच्या खोदकामाचे अकुशल मजूर यांचे थकीत मस्टर काढण्यासाठी या प्रकरणातील तक्रारदार ग्रामपंचायत सदस्याने भोकरदन पंचायत समिती कार्यालयात वारंवार संपर्क केला. मात्र काम होत नव्हते. शेवटी हे काम करून देण्यासाठी या कार्यालयातील कंत्राटी तांत्रिक सहाय्यक प्रशांत रामेश्वर दहातोंडे व 39 वर्ष यांनी सात हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली, तसेच कंत्राटी संगणक परिचालक सतीश रामचंद्र बुरांगे व 29 वर्ष यांनी तीन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जालना येथे संपर्क साधला आणि आज दुपारी पंचा समक्ष सात हजार रुपयांची लाच घेताना प्रशांत दहातोंडे याला रंगेहात पकडण्यात आले. त्याच्याकडून सात हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. याच वेळी संगणक परिचालक सतीश बुरांगे यांनी मात्र लाच घेतली नव्हती परंतु पंचा समक्ष लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने या दोघांनाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. भोकरदन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक किरण बिडवे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
ताज्या बातम्या पाहण्यासाठी http://www.edtvjalna.com https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv दिलीप पोहनेरकर,9422219172