बीएसएनएलची फोर जी -फाईव्ह जी सेवा लवकरच ;मुख्य महाप्रबंधक रोहित शर्मा
जालना- बीएसएनएलची फोर जी व फाईव्ह जी सेवा लवकरच कार्यान्वित होणार असल्याची माहिती बीएसएनएलच्या महाराष्ट्र परिमंडळाचे मुख्य महाप्रबंधक रोहित शर्मा यांनी आज रविवारी दिली.
जालना येथील बीएसएनएलच्या फोर जी व फाईव्ह जी सेवेच्या कामाचा आढावा घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. बीएसएनएलच्या महाराष्ट्र परिमंडळाचे महाप्रबंधक प्रशांत पी. सिंह, औरंगाबाद परिमंडळाचे महाप्रबंधक संजय केशरवानी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना शर्मा पुढे म्हणाले की,भारतात बीएसएनएलच्या फोर जी व फाईव्ह जी सेवेला गतवर्षी जुलै महिन्यात मंजुरी मिळाली होती. त्यानुसार
बीएसएनएलच्या फोर जी व फाईव्ह जी सेवेसाठी देशभरात २० हजार टाॅवर्स उभारले जात आहेत. ज्या गावात फोर जी सेवेचे सिंग्नल मिळत नाही अशा ३४ हजार गावात ही फोर जी सेवा उपलब्ध होणार आहे. बीएसएनएलच्या फोर जी व फाईव्ह जी सेवेचे तंत्रज्ञान हे भारतातच विकसित करण्यात आले आहे. हे तंत्रज्ञान विकसित करणारा भारत हा जगातील पाचवा देश ठरला आहे. हे तंत्रज्ञान सी. डाॅट व तेजसने विकसित केले आहे. याच्या प्राथमिक चाचण्या देखील झाल्या आहेत. महाराष्ट्र राज्यात फोर जी व फाईव्ह जी सेवा कार्यान्वित होण्यासाठी २८०० गावात नवीन टाॅवर्स उभारले जाणार असून त्यासाठी सरकारी जमीनीचे अधिग्रहण करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या दूरदृष्टीपणामुळे बीएसएनएल ही सेवा लवकरच सुरू करणार आहे. त्यामुळे बीएसएनएलला पूर्वीचे गतवैभव प्राप्त होण्यास कसलीही शंका नसल्याचे ते म्हणाले.
देशात सगळ्यात स्वस्त आणि किफायतशील सेवा फक्त आणि फक्त बीएसएनएल देऊ शकेल असा विश्वास सरकारला आहे. बदलत्या तंत्रज्ञानामुळे बीएसएनएल आता कमी मनुष्यबळाचा वापर करीत आहे, त्यामुळे दूरसंचार विभागाच्या इमारती रिकाम्या झाल्या आहेत. जालना येथील टेलीफोन भवनातील खालचा मजला रिकामा झाला असून तो आता किरायाने देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती शर्मा यांनी दिली. महाप्रबंधक संजय केशरवानी यांनी औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील बीएसएनएलच्या फोर जी व फाईव्ह जी सेवेसाठी नवीन टाॅवर्स उभारले जाणार असल्याचे सांगून वर्तमान सेवा अधिक चांगल्या प्रकारे कशी देता येईल, यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले.
यावेळी जालना येथील बीएसएनएलचे महाप्रबंधक किशोर वाढवे, गजानन जाधव, उज्वल पाटील , जी.आर.वावळे व बीएसएनएल अधिकारी उपस्थित होते.
Dilip Pohnerkar-9422219172