खून केल्याबद्दल दहा वर्ष तर खुनाच्या प्रयत्नासाठी तीन वर्ष सक्त मजुरीची शिक्षा
जालना -खून केल्याबद्दल दहा वर्षे सक्त मजुरी आणि खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल तीन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्ग एकच्या न्यायमूर्ती श्रीमती बी. एस .गारे यांनी आज सुनावली आहे .4 सप्टेंबर 2020 मध्ये हसनाबाद पोलीस ठाणे अंतर्गत रामदास जोशी यांचा खून करण्यात आला होता त्या खटल्याचा निकाल आज लागला आहे.
शेतीच्या जुन्या वादातून रामदास मिसाळ ,विलास मिसाळ, प्रल्हाद मिसाळ, मारुती मिसाळ ,भगवान मिसाळ, समाधान मिसाळ आणि गणेश मिसाळ या सात जणांनी मिळून योगेश जोशी यांना मारहाण केली होती. विलास मिसाळ याने योगेश जोशी यांच्या अंगावर ट्रॅक्टर घातल्यामुळे योगेश जोशी गंभीर जखमी झाले होते, तर प्रल्हाद मिसाळ याने या प्रकरणात उपचारादरम्यान मृत झालेल्या रामदास जोशी यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केले होते. याप्रकरणी चंद्रकला जोशी यांनी हसनाबाद पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंदविला होता. उपचारादरम्यान रामदास जोशी यांचा मृत्यू झाल्यामुळे भादवि कलम 302 अन्वये खुनाचा गुन्हा वाढविण्यात आला होता. या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान नऊ साक्षीदार तपासण्यात आल्या त्यामध्ये तपासी अंमलदार पोलीस उपनिरीक्षक जी. एन .पठाण यांची साक्ष महत्त्वाची ठरली .दोन्ही पक्षाचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायमूर्ती श्रीमती गारे यांनी आरोपी प्रल्हाद रामदास मिसाळ याला सदोष मनुष्य वध प्रकरणी दहा वर्षे सक्तमजुरी व चार हजार रुपये दंड तर आरोपी विलास रामदास मिसाळ याला खून करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी तीन वर्ष सक्त मजुरी व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. उर्वरित आरोपींची सबळ पुराव्या अभावी मुक्तता करण्यात आली आहे. सरकारी पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी अभियोक्ता बाबासाहेब इंगळे यांनी काम पाहिले.
सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.
दिलीप पोहनेरकर-9422219172