कसा होता पदोन्नतीचा पहिला दिवस?
जालना -जालना नगरपालिकेच्या पदोन्नतीचा म्हणजेच जालन्याची नगरपालिका महानगरपालिकेमध्ये रूपांतरित झाल्याचा आदेश सोमवारी मिळाला,आणि जालना नगरपालिकेमध्ये सुशोभीकरणाची आनंदोत्सवाची लगबग सुरू झाली.एखाद्या शुभकार्याप्रमाणे मंगळवारी जालना महानगरपालिका सजली,नटली होती.
सोमवारी आदेश मिळाल्याबरोबर कधी नव्हे एवढे तातडीने नगरपालिकेने नवीन नावाचे म्हणजे महानगरपालिकेचे फलक तयार करायला दिले, असलेले पुष्पगुच्छ ,हार विद्युत रोषणाई या सर्वांच्या जबाबदाऱ्या वाटून दिल्या गेल्या .इमारतीचीही स्वच्छता झाली आणि पाहता -पाहता जालना महानगरपालिका नटली. पहिल्या दिवशी जालना नगरपालिका महानगरपालिका व्हावी म्हणून आपण प्रयत्न केला आणि त्याचे फळ मिळाले असा दावा करणारे माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर महानगरपालिकेत गेले. जालना महानगरपालिकेचे पहिले आयुक्त तथा प्रशासक म्हणून मान मिळालेल्या संतोष खांडेकर यांचा सत्कार केला .महानगरपालिकेला मिळालेल्या पदोन्नती सोबतच आपली ही पदोन्नती होईल वेतन वाढ मिळेल! याची जाणीव असलेल्या महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. पहिल्याच दिवशी परभणी महानगरपालिकेच्या आयुक्त तृप्ती सांडभोर आणि त्यांचे पती उमेश सांडभोर यांनी आयुक्त संतोष खांडेकर यांना महापालिकेत येऊन शुभेच्छा दिल्या. संध्याकाळी महानगरपालिकेवर सुंदर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. एकंदरीतच जालना नगरपालिका महानगरपालिकेमध्ये रूपांतरित झाल्यामुळे कर्मचारी अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या वाढल्या आहेत आणि त्यासोबत जालनेकारांनी आपण महानगरपालिकेच्या हद्दीत राहत आहोत याचे भान ठेवून आपले हक्क आणि कर्तव्याबाबत देखील जागरूक राहण्याचा गरजेचे झाले आहे.
edtv jalna news App on play store,
web-edtvjalna.com
you tube-edtvjalna
Dilip Pohnerkar-9422219172