Advertisment
Jalna Districtजालना जिल्हाराज्य

बदली रद्द केल्याचा आनंद आला अंगलट ;गुन्हा दाखल ,निलंबन आणि बरच काही लागलं मागे

जालना- वरिष्ठांचे आदेश डावलून मंत्रालयात बसून बदली रद्द करून आणल्याच्या आनंदात महावितरण कंपनीच्या एका सहाय्यक अभियंत्याने वाजत गाजत मिरवणूक काढली. ही मिरवणूक या अभियंत्याच्या चांगलीच अंगलट आली आहे. विनापरवाना मिरवणूक ,वाहतुकीस अडथळा, याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा तर दाखल झालाच आहे .त्यासोबत शिरजोर्पणा, उरमटपणा, उद्धटपणा, असभ्यवर्तन, अशी विविध विशेषण लावून वरिष्ठांनी निलंबितही केलं आहे.

प्रकाश सकरू चव्हाण हे सहाय्यक अभियंता दिनांक 16 जुलै 2019 पासून ग्रामीण उपविभाग जालना अंतर्गत शाखा क्रमांक तीन येथे कार्यरत होते .त्यांची दिनांक 14 जुलै 2023 रोजी रत्नागिरी परिमंडळात बदली करण्यात आली .त्यानंतर ते हा बदली आदेश रद्द करण्यात यशस्वी झाले आणि औरंगाबाद परिमंडल कार्यालयाच्या आदेशान्वये त्यांची 18 ऑगस्ट 2023 रोजी जालना येथील ग्रामीण शाखा क्रमांक तीन येथे पदस्थापना करण्यात आली. ही बदली रद्द करण्याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी त्यांनी दिनांक 21 ऑगस्ट रोजी राजुर चौफुली ते महावितरण मंडल कार्यालय व त्यानंतर महावितरण विभाग क्रमांक एक जालनापर्यंत वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीचे अनेक वृत्तपत्रांमध्ये वृत्त छापून आले तसेच इलेक्ट्रॉनिक मीडियात देखील याचे चित्रीकरण प्रदर्शित झाले. त्यामुळे महावितरणला जनसामान्यांच्या टीकेला सामोरे जावे लागले होते. याची दखल घेत विभाग क्रमांक एक चे कार्यकारी अभियंता यांनी गोपनीय पत्रानुसार वरिष्ठांना हा सर्व प्रकार कळवला होता. त्याच दरम्यान दिनांक 23 ऑगस्ट रोजी प्रकाश चव्हाण यांच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये भादवि कलम 1860 अन्वये 283 143 188 महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये गुन्हाही नोंदविण्यात आला होता. त्यानंतर ही मिरवणूक आणि अभियंता दोघेही चर्चेत आले होते .परिणामी अभियंत्याच्या गैरप्रकारामुळे महावितरण ला चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला, आणि दिनांक 23 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता तथा सक्षम अधिकारी संजय प्रभाकर सरग यांनी सहाय्यक अभियंता प्रकाश चव्हाण यांच्या निलंबनाचे आदेश जारी केले आहेत .

या आदेशात म्हटले आहे की ,प्रकाश चव्हाण यांच्या गैरकत्यामुळे महावितरण कंपनीची प्रतिमा जनसामान्यांमध्ये मलीन झाली आहे ,तसेच वरिष्ठ कार्यालयाने केलेली बदली रद्द करून आणल्याबाबत आनंदोत्सव साजरा करणे म्हणजे यामधून आपला शिरजोर्पणा, उर्मटपणा, उद्धटपणा, तसेच असभ्यवर्तन स्पष्टपणे दिसून येते, तसेच वरिष्ठांबद्दल अनादर भाव, कामावर असताना बेबंध वर्तन केले असल्याचे स्पष्ट होते, यावरून असे निष्पन्न होते की आपणाकडून झालेली ही कृत्ये गंभीर स्वरूपाचे असून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी कर्मचारी सेवा नियम 2005 मधील क्रमांक 86 च्या अनुसूची “ख” मधील गैरवर्तणूक या सदरात मोडतात. ज्या पदावर आणि ज्या कार्यालयात आपण काम करत आहात त्या पदावर आणि त्या कार्यालयात आपली सेवा चालू ठेवल्यास कंपनीच्या कामकाजास व हितसंबंधास बाधा निर्माण होऊ शकते. निलंबन कालावधीत मध्ये दर आठवड्याच्या सोमवार बुधवार आणि शुक्रवार या कार्यालयीन कामाच्या दिवशी सकाळी दहा वाजता उपकार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी परतुर उपविभाग यांच्याकडे हजेरी द्यावी आणि त्यांच्या लेखी पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये. दरम्यान प्रकाश चव्हाण हे दिनांक 30 जून 2028 रोजी सेवानिवृत्त होणार आहेत.—–

सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.
दिलीप पोहनेरकर-9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button