प्राणघातक हल्ला; आठ आरोपींना सात वर्ष कारावास ,आणि दहा हजार रुपये दंड
जालना-घराच्या वादातून झालेल्या हल्ल्यामध्ये तक्रारदार आणि साक्षीदारांना केलेल्या मारहाण प्रकरणी आरोपींना सात वर्ष शस्त्रम कारावास आणि प्रत्येकी दहा हजार रुपयांचा दंड तिसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश के. एम. जैस्वाल यांनी सुनावला आहे.
शहरातील सुवर्णकार नगर भागात राहत असलेल्या या प्रकरणातील तक्रारदार वत्सलाबाई मुख्यदल, आरोपी तुकाराम जाधव व आशाबाई जाधव यांच्या घराचा वाद सुरू होता. दिनांक एक फेब्रुवारी 2014 रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास या प्रकरणातील आरोपी श्रीकांत ताडपकर हा गच्चीवर जात असताना वत्सलाबाई यांनी त्याला हटकले होते ,त्यावेळी दोघांमध्ये वाद सुरू झाला आणि त्यानंतर इतरही आरोपींनी हातामध्ये लोखंडी रॉड,तलवार आणि इतर साहित्य घेऊन तक्रारदारावर हल्ला केला. यामध्ये वत्सलाबाई व त्यांचा मुलगा राजू मुख्यदल, सुचित्रा मुख्यदल, संजय मुख्यदल व अनिता मुख्यादल यांना गंभीर मारहाण करून जखमी केले. या मारहाणी मध्ये राज मुख्यदल याच्या डाव्या हाताच्या करंगळीचे दोन कांडे तुटली, त्यानंतर या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात आरोपी जावेद हमीद पठाण ,किरण भुजंगराव कड, शेरू अफसर खान, आशाबाई तुकाराम जाधव, तुकाराम जाधव ,श्रीकांत ऋषी कुमार ताडपकर, अक्कू उर्फ शेख हकीम शेख रहीम, आणि अजय श्री सुंदर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात झाल्यानंतर न्यायालयाने दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतले आणि साक्षीदारांनी दिलेल्या साक्षीनुसार वरील आठ जणांना सात वर्षे सश्रम कारावास, दहा हजार रुपये दंड ,दंड न भरल्यास एक वर्ष साधा कारावास यासह इतर कलमान्वये आणखी काही शिक्षा सुनावली आहे .या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियंता ए डी मध्ये व बीके खांडेकर यांनी काम पाहिले.