प्रासंगिक…. त्या काळचा पोळा-सुरेश मेहत्रे
आज बैलपोळा ग्रामीण भागात हा सण मोठ्या उत्साहात वाजत गाजत आनंदात साजरा केला जातो. परंतु शहरी भागात हा सण फारसा जाणवत नाही, आणि त्याचा उत्साह देखील कमी असतो . दिवसभर बैलांना ओढ्या नाल्यावर एवढेच नव्हे तर जिथे पाणी मिळेल तिथून, मिळेल ती साबण मग ती अंगाची असो अथवा कपड्याची ,नाहीच काही मिळालं तर डिटर्जंट पावडर लावून स्वच्छ धुऊन आणायचे, रंगरंगोटी करायची साज चढवायचा, झुली बांधायच्या, गळ्यामध्ये घुंगरमाळा, शिंगाला बाशिंग, नाकामध्ये नव्या कोऱ्या सुताची वेसण, तोंडाला मोरकी आणि हे सर्व झाल्यानंतर काड-काड आवाज करणारा चाबूक तो पोळा कसा होता हा सांगण्याचा प्रयत्न केला आहे सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा येथील सेवानिवृत्त आगार प्रमुख सुरेश गोपाळराव मेहत्रे यांनी.
त्या काळी-आम्ही सहा भाऊ, त्यापैकी तीन चुलत भाऊ त्यामध्ये वसंता, बबन आणि आणि मोठे छगन दादा. त्यामुळे कुठलेही काम माझ्या व माझे भाऊ किसन आणि अशोक यांच्याच वाट्याला यायचे. आमच्या बालपणी आजोबांच्या काळात चार बैल ,पाच गाई ,आणि दहा-बारा शेळ्या होत्या. बैलांची नावे म्हणाल तर शुक्रऱ्या,हौश्या ,नंद्या ,नांगऱ्या ,ही अशी नाना तऱ्हेची नावे असायची .आज जसा पाऊस पडतो तसाच पाऊस त्याकाळी म्हणजे 1966 ते 1976 च्या काळात पडायचा. जनावरांना चारण्यासाठी गायरान जमिनी असायच्या ज्या हिरव्यागार गवतांनी मखमली चादरी सारख्या दिसायच्या. खांदे मळणीला व पोळ्याच्या दिवशी बैलांना नदीवर नेऊन स्वच्छ वाहत्या पाण्यात अंघोळ घालायची. दिवसभर हिरवागार चारा खाऊ घालायचा आणि खांदे मळणीच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला घरी घेऊन यायचे .सकाळी आठ ते दहा पर्यंत गावातील मायमाऊल्या शेतात जाताना नदीवर धुणं धुवायच्या त्यावेळेस त्यांच्या कालच्या दिवसभरातील घडामोडींच्या आणि आजच्या दिवसभराची रूपरेषा यांच्या मस्त गप्पा रंगायांच्या. पोळ्याच्या दिवशी दुपारी बैलांना सजवून त्यांना वाजत गाजत साज चढवून मिरवणूक काढायची. गावात ऐटीत आपलेच बैल किती छान नटले आहेत हे सांगत फिरायचं आणि मिरवून आणलेल्या बैलांन घरच्या मालकिणीने पुरणपोळी खाऊ घालतानाचा जो आनंद आहे त्याची तुलना इतर आनंदासोबत होऊ शकत नाही. घरातील महिलां देखील उत्साहाने नटून- थटून हातामध्ये औक्षवनाचे ताट घेऊन दारामध्ये हजर असायच्या. आजोबांचं तर कामच न्याहारं होतं ,ते आमच्यापेक्षा सालगाड्यांना जास्त जीव लावायचे. सालगडी बैलांची खूप काळजी घ्यायचे, खरंतर मालक हे नावालाच होते परंतु बैलांचे खरे मालक सालगडीच असायचे .हे सालगडी आपापल्या बैल जोड्यांना वाजत गाजत मालकाच्या घरासमोर आणायचे आजही माझ्या डोळ्यासमोर ते चित्र उभे राहतं ज्यावेळेस सालगडी बैल जोड्या वाजत गाजत मिरवण आणायचा आणि या बैलांची बैलांची माझी आई ,काकू ,वहिनी या बैलांची पाय धुवून पूजा करायचे, यामध्ये मोठी गंमत म्हणजे दरवर्षी एक तरी बैल रुसायचाच! त्यामुळे तो पुरणपोळी खायचा नाही .परंतु एखाद्या मुलाला ज्याप्रमाणे लाडीगोडी लावून त्याचा रुसवा दूर करावा त्याप्रमाणे घरातील मंडळी या बैलांचा रुसवा दूर करत होती .अन्य वेळी पाऊस पडो अथवा ना पडो पोळ्याच्या पूर्वी पाऊस पडणारच आणि या पावसामध्ये झालेल्या चिखलापासून बैल तयार करताना भरणारे अंग याची कोणीही पर्वा करत नव्हतं.
दुसऱ्या दिवशी शिळा पोळा म्हणून कर असायची बरेच हौशी शेतकरी करीची मिरवणूक काढायचे .त्यात नाच गाणे असायचे ,सगळे गाव गोळा व्हायचे तेवढीच करमणूक व्हायची .कर झाली की सगळे शेतकरी, सालदार हे बैल जोड्या घेऊन इमाने इतबारे शेतीच्या कामाला पुन्हा वाहून घ्यायचे आणि हा एक दिवसाचा पोळा पुढील वर्षभरासाठी एक ऊर्जा निर्माण करायचा. अशा ह्या बैलपोळ्याचे सणाचे महत्त्व होते बैलांनी आमच्यावर केलेले उपकार हे न फिटणारे आहेत.
मालक आणि सालगडी त्या काळी गरीबी होती. त्यामुळे एखाद्या मध्यमवर्गीय माणसाकडे जनावरे असतील आणि त्याच्याकडे जर सालगडी म्हणून काम मिळालं तर एखादी सरकारी नोकरी लागल्याचा आनंद चेहऱ्यावर दिसायचा. सकाळी पाच वाजल्यापासून बैलांना चारा, वैरण, पाणी हे करून झाल्यानंतर सालगडी घरी जाऊन आपली आवर करून नऊ वाजेच्या सुमारास पुन्हा या जनावरांना चरण्यासाठी शेतामध्ये न्यायला हजर व्हायचे. तिन्ही सांजाच्या वेळी पुन्हा हे जनावरे घुंगुरमाळांचे आवाज करत वाड्यामध्ये हजर व्हायचे आणि काही वेळानेच धार(दूध) काढायला सुरुवात व्हायची. त्या ताज्या ताज्या आणि उष्ण दुधाची चव आजच्या पिढीला मिळणे दुर्मिळ झाले आहे.
edtv jalna news App on play store,
web-www.edtvjalna.com
you tube-edtvjalna
Dilip Pohnerkar-9422219172