कारागृहाच्या तीस फूट उंच भिंतीवरून कैदी पळाला ;मराठवाडा मुक्ती दिनी स्वतःचीही केली मुक्तता
जालना-जालना तालुक्यातील इंदेवाडी शिवारात असलेल्या जिल्हा कारागृहातून विविध गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेला कैदी तुळशीराम मुरलीधर काळे,रा. बाजार गल्ली, आष्टी,ता परतूर. हा भिंतीवरून उडी मारून पळून गेल्याने खळबळ उडाली आहे. 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती दिन होता या याच दिनाच्या दिवशी या कायद्याने स्वतःलाही जिल्हा कारागृहातून मुक्त करून घेतले आहे.
रविवारी सकाळी 6.15 वाजेच्या सुमारास जिल्हा कारागृहाच्या कारखाना विभागातील 18 कैद्यांना नेहमीप्रमाणे स्वयंपाकगृहाच्या विभागात कारागृह शिपाई रामआप्पा परळकर हे घेऊन गेले होते.तिथे
गेल्यानंतर कैद्यांची मोजणी केली असता, एक कैदी कमी असल्याचे लक्षात आले. त्यामुळे कारागृहातील कर्मचाऱ्यांमध्ये एकच धावपळ उडाली व त्यांनी शोधाशोध सुरू केली. कमी असलेला कैदी तुळशीराम काळे हा असल्याची खात्री पटल्यानंतर कर्मचाऱ्यांनी आधी कारागृहात सर्वत्र त्याला शोधले. परंतु तो कुठेही सापडला नाही.
तुळशीराम याला अंगावर घेण्यासाठी देण्यात आलेली एक चादर व एक कंबळ एकमेकांना बांधून ती कारागृहाच्या भिंतीच्या तटाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आली आणि या चादर व कंबळीच्या साहयानेच भिंतीवर चढून उडी मारून तो पळून गेल्याची खात्री कारागृह प्रशासनास पटली आहे.
पोलीस कॉन्स्टेबल रामअप्पा परळकर यांनी तालुका जालना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, आरोपी कैदी तुळशीराम काळे याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या 224 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील वर्षी देखील कारागृहातून दवाखाना आणि न्यायालयीन कामासाठी बाहेर आणलेला एक कैदी पळून गेला होता यासंदर्भात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल आहे आणि कारागृह प्रशासनाची देखील चौकशी सुरू आहे .हा तपास अर्धवट असतानाच पुन्हा एक कैदी पडून गेल्यामुळे जिल्हा कारागृह प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.
दिलीप पोहनेरकर-9422219172