न्यायालयाच्या सूचनांचे पालन करावे-आयजी डॉ.चव्हाण;’बटन’ गोळी ,पथदिवे,आणि खड्ड्यांचा बंदोबस्त करा- गणेश मंडळे
जालना- गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने रात्री बारा वाजेपर्यंत वाद्य वाजवण्यास परवानगी दिली आहे. गणेश मंडळांनी न्यायालयाने वाढवून दिलेली ही परवानगी लक्षात घेऊन बारा वाजेपर्यंतच वाद्य वाजवावेत ,असे आवाहन छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रचे पोलीस महानिरीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी केले आहे. दरम्यान पारंपारिक गणेशोत्सव उल्हासात आणि उत्साहात साजरा करावा, महिलांनी देखील हे देखावे पाहण्यासाठी यावेत असे नियोजन गणेश मंडळांनी करावे आणि म्हणूनच सर्वच गणेश मंडळांना आपला देखावा सर्वांसमोर सादर करता यावा म्हणून वेळेत मिरवणुका काढून वेळेत संपवाव्यात, त्यासोबत मानाच्या गणपतींनी आपल्या मागे देखील अनेक गणेश मंडळे आपल्यामुळे अडकून पडलेले असतात हे लक्षात ठेवून मोठेपणा दाखवावा आणि नेतृत्व करत कुठलेही विघ्न, बाधा न येऊ देता गणेश विसर्जन करावे असेही ते म्हणाले .शहरातील गणेश मंडळांची शोभा प्रकाश मंगल कार्यालयात उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली या बैठकीनंतर शहरातील महत्त्वाच्या आणि मानाच्या गणपतीच्या सदस्यांची बैठक पोलीस अधीक्षक कार्यालयातील सभागृहात पार पडली .या बैठकीत डॉ. चव्हाण यांच्यासह पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, नूतन अप्पर पोलीस अधिकारी ,उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे ,प्रशिक्षणार्थी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री .कदम, सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांची उपस्थिती होती.
पोलीस महानिरीक्षकांच्या आवाहनाला प्रतिसाद देत असतानाच गणेश मंडळांनी देखील काही तक्रारी आणि अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. त्यामध्ये महत्त्वाची तक्रार म्हणजे रस्त्यांवरील खड्डे ,वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा, रस्त्यावर पथदिवे नसणे, त्यातच रस्त्यावर लटकल असलेल्या तारा यामुळे अपघात होण्याची शक्यता वर्तविली आहे. महत्त्वाचा प्रश्न म्हणजे शहरातील अनेक औषधी दुकानांमध्ये “बटन” नावाची गोळी मिळते या गोळीचा बंदोबस्त करावा अशी मागणी ही यावेळी करण्यात आली.
काय आहे “बटन”
बटन या गोळीचे वैद्यकीय क्षेत्रामध्ये दुसरेच नाव आहे. मुख्यत्वे मनोरुग्णांसाठी या गोळीचा वापर करण्यात येतो आणि डॉक्टरांची चिठ्ठी असल्याशिवाय ही गोळी सहजासहजी मिळत नाही. असे असतानाही मागील महिन्यांमध्ये काही दुकानात या गोळ्या आढळून आल्या होत्या. त्यामुळे गणेश भक्तांनी या गोळ्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे. यासंदर्भात सविस्तर माहिती देताना अन्न व औषधी प्रशासनाच्या अधिकारी वर्ष महाजन म्हणाल्या की, ही गोळी मनोरुग्णांसाठी देण्यात येते. जिल्ह्यामध्ये तीनच ठोक विक्रेते आहेत आणि त्यांची सर्व तपासणी त्यांनी किरकोळ विक्रेत्यांना दिलेल्या गोळ्या आणि किरकोळ विक्रेत्यांनी विकलेल्या गोळ्या या सर्व प्रकाराची तपासणी केल्यानंतर फक्त दोन गोळ्यांचा हिशोब लागलेला नाही. दरम्यान या गोळींमुळे कोणतीही उत्तेजना न मिळता गुंगी येथे आणि झोप लागते. त्यामुळे काही अपायकारक मनो रुग्णांसाठी डॉक्टर ही गोळी झोप यावी म्हणून देतात. मागच्या महिन्यात उघडकीस आलेल्या या गोळी बद्दल सखोल चौकशी केली असता या गोळ्या विदर्भातून आणि जळगाव येथून आल्याचे समजते, या संदर्भात मागील महिन्यात तपासणी केलेली आहे आणि सहा औषधी विक्रेत्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली असल्याची माहिती वर्षा महाजन यांनी दिली.
सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.
दिलीप पोहनेरकर-9422219172