जि.प.अर्थसंकल्प; शिक्षण आणि आरोग्यावर बाईंचा भर; जि. प. च्या शाळेमध्ये घुमणार आता संगीताचे सूर आणि बरंच कांही…!

जालना- जालना जिल्हा परिषदेचा सन 2024- 25 चा अर्थसंकल्प जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ .वर्षा मीना यांनी सादर केला. दोन वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या निवडणुकानसल्यामुळे जिल्हा परिषद सदस्यांअभावी हा अर्थसंकल्प सादर केला जातो. विशेष म्हणजे सौ. मीना यांच्या काळात आणि सदस्य नसतांना सादर केलेला हा दुसरा अर्थसंकल्प आहे. त्यामुळे ना कोणाची ओरड ,ना कोणाचा हस्तक्षेप, ना कोणाचे आरोप, ना कोणाचे धन्यवाद!, आणि कोणत्याही प्रकारचा गदारोळ न होता केवळ जिल्हा परिषदेच्या विभाग प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये अवघ्या दहा मिनिटांमध्ये हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. विशेष म्हणजे या अर्थसंकल्पात सौ .मीना यांनी शिक्षणासाठी भरीव तरतूद करून त्याच्या पाठोपाठ आरोग्यालाही प्राधान्य दिले आहे. दोन्ही योजनांसाठी नाविन्यपूर्ण योजनेमधून एक कोटी एक लक्ष रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा दर्जा वाढेल अशी अपेक्षा व्यक्त होत असतानाच शाळांमधून संगीत आणि गायनाचे सूर देखील ऐकायला मिळणार आहेत, आरोग्याच्या क्षेत्रात गरजू लाभार्थ्यांना वैद्यकीय उपकरण खरेदीसाठी देखील अनुदान दिले जाणार आहे.
कै. यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. वर्षा मीना यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा वित्त अधिकारी, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी( सामान्य प्रशासन) उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) यांच्या उपस्थितीत हा अर्थसंकल्प सादर केला. सन 2024- 25 या वित्तीय वर्षामध्ये जिल्हा परिषदेमध्ये नाविन्यपूर्ण योजनेत सहा योजनांचा समावेश करण्यात आला आहे. त्यापैकी पाच योजना या शिक्षण विभागासाठी तर एक योजना ही आरोग्य विभागासाठी आहे .शिक्षण विभागासाठी करण्यात आलेल्या योजनांमध्ये जिल्हा परिषद अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी संगीत आणि गायनाचे प्रशिक्षण देण्यासाठी 15 लाख रुपये, या निधीमधून शाळेत संगीत शिक्षक नियुक्त करण्यासाठी संगीत विद्यालयांसोबत करार करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद अंतर्गत शाळा तपासणीसाठी पाच लक्ष रुपये, जि.प. अंतर्गत शाळा उपयोगी साहित्य खरेदीसाठी 40 लाख रुपये, विद्यार्थ्यांसाठी मराठी वर्तमानपत्र सुरू करण्यासाठी तीन लक्ष रुपये ,शिष्यवृत्ती परीक्षा फीस तरतूद तीन लाख रुपये. अशा एकूण 66 लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, आरोग्य विभागासाठी गरजू लाभार्थ्यांना वैद्यकीय उपकरणे खरेदीसाठी 35 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. नाविन्यपूर्ण योजनेतून एक कोटी एक लक्ष रुपयांची ही तरतूद आहे.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172