न्यायालयाचा “जैसे थे” आदेश,तरीही उपविभागीय अधिकारी म्हणतात द्या ताबा!
जालना- जालना तालुक्यातील मोतीगव्हाण येथील गट क्रमांक 169 शेतकऱ्याला रस्ता देण्यासंदर्भात सुरुवातीला तहसीलदार नंतर उपविभागीय अधिकारी त्यादरम्यान चौथे सह दिवाणी न्यायाधीश असे सर्व प्रकरण चालू असताना चौथ्या सह दिवाणी न्यायाधीशांनी दिनांक 18 डिसेंबर 2023 रोजी अंतिम निर्णय येईपर्यंत ही परिस्थिती “जैसे थे ठेवा” असा आदेश दिला.असे असताना देखील जालन्याच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी समोरच्या पक्षाला या रस्त्याचा ताबा द्यावा असे आदेश पारित केले आहेत. त्या अनुषंगाने मंडलाधिकारी गुरुवारी सकाळीच दहा वाजता संबंधित शेतकऱ्याच्या बांधावर गेल्यानंतर न्यायालयाचा आदेश आणणाऱ्या पक्षाने हा आदेश मंडल अधिकाराच्या हातात ठेवल्यानंतर कुठलीही कारवाई न करता या अधिकाऱ्याला परत फिरण्याची नामुष्की आली आहे. विशेष म्हणजे न्यायालयाचा आदेश आहे हे उपविभागीय अधिकाऱ्यांना माहीत असताना देखील असे आदेश काढलेच कसे ?असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मोती गव्हाण येथे कारभारी शिवराम मोहिते, परमेश्वर नारायण मोहिते यांनी आपला रस्ता अडवला आहे अशी तक्रार श्रीमंत कारभारी मोहिते, नामदेव कारभारी मोहिते यांनी जालन्याच्या तहसीलदारांकडे दिली होती. तहसीलदारांनी कारभारी मोहिते यांच्या बाजूने निकाल दिला त्यानंतर या निकालाच्या विरोधात नामदेव कारभारी मोहिते यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे अपील केले या अपीलाची सुनावणी सुरू असतानाच प्रतिवादी कारभारी शिवराम मोहिते यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला, आणि दिनांक 18 डिसेंबर रोजी चौथे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर जालना यांनी पुढील आदेशापर्यंत ही परिस्थिती “जैसे थे” ठेवण्याचे आदेश दिले .असे असताना देखील जालन्याचे उपविभागीय अधिकारी श्रीमंत हरकळ यांनी नामदेव कारभारी मोहिते आणि राजेंद्र श्रीमंत मोहिते यांच्या बाजूने दिनांक 15 मार्च रोजी निकाल दिला.तसेच तहसीलदारांना आदेश देऊन नामदेव कारभारी मोहिते आणि श्रीमंत कारभारी मोहिते यांना रस्त्याचा ताबा द्यावा असे आदेश पारित केले आणि आवश्यकता भासल्यास पोलीस बळ ही उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार विरेगाव विभागाचे मंडल अधिकारी पी.डी. हजारे आणि मोतीगव्हाण सजाचे तलाठी ए.जे. हिवाळे हे दिनांक चार रोजी सकाळी दहा वाजताच शेतकऱ्याच्या बांधावर हजर झाले.शेतकऱ्यांच्या दोन्ही पक्षांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली धमक्याही दिल्या गेल्या, परंतु परमेश्वर नारायण मोहिते आणि कारभारी शिवराम मोहिते यांनी कनिष्ठ स्तर न्यायालयाचा “जैसे थे”चा आदेश मंडळ अधिकाऱ्यांच्या हातात ठेवल्यानंतर या अधिकाऱ्याने तेथून काढता पाय घेतला आहे. न्यायालयाचा आदेश असताना उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशामुळे शेतकरी संभ्रमात आहेत.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172