भारतीय स्त्रियांमध्ये जातीच्या भिंती ओलांडण्याची क्षमता – सारिका उबाळे
जालना-पुरुषांप्रमाणे भारतीय स्त्री सुध्दा जाती-जातीत विभागल्या गेलेली असली तरी जातीच्या भिंती ओलांडण्याची क्षमता स्त्रियांमध्ये आहे,
धर्म, परंपरा, श्रद्धा -अंधश्रद्धा नाकारुन संविधानाचे पालन केले तर स्त्रियांचे जगणे अधिक सुसह्य होईल, असे प्रतिपादन अमरावती येथील साहित्यिक सारिका उबाळे यांनी येथे केले.
जालना शहरात सुरू असलेल्या 47 व्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेचे चौथे पुष्प गुंफतांना त्या बोलत होत्या. माजी नगराध्यक्ष भास्करराव अंबेकर हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी ज्येष्ठ कवयित्री भारती हेरकर, सामाजिक कार्यकर्त्या ॲड. रीमा संदीप खरात, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्ष रिंकल तायड आदींची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.
‘ स्त्रियांची भाषा’ या विषयावर विचार मांडतांना सारिका उबाळे म्हणाल्या की, स्त्री शिक्षणाची दारे ज्यांनी खुली केली असे महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीदिनी एक स्त्री म्हणून विचारमंचवरुन बोलणे ही बाब आपल्यासाठी अभिमानास्पद आहे. स्त्री-पुरुष मिळूनच समाज बनतो, स्त्रियांची भाषा म्हणजे अर्ध्या समाजाची भाषा आहे. स्त्रियांची भाषा हा विचार करत असताना भाषेच्या उगमाकडे जावे लागते. मानवी उत्पत्तीनंतर व्यक्त होण्याचे साधन म्हणून भाषा तयार झाली. मौखिक स्वरूपातून लिखित स्वरूपात आली. आणि कालांतराने जशी जशी समाजात पुरुषी सत्ता वाढत गेली, तशी तशी स्त्रियांची भाषा बदलत गेली. खरेतर भाषा ही स्त्री आणि पुरुष अशी भेदाची न राहता ती एकच असायला हवी होती. परंतु इथल्या व्यवस्थेत स्त्रियांच्या जगण्यावर त्यांच्या बोलण्यावर, चालण्यावर राहणीमानावर जी बंधने आहेत त्याचा भाषेवर खूप जास्त परिणाम दिसून येतो.जात आणि संस्कृती ही स्त्रियांच्या आडून टिकवली जाते. म्हणून ही जात नावाची गोष्ट आधी स्त्रियांनी नाकारायला हवी. तरच जाती-धर्मातला विद्वेष टळेल. राजकारण, सत्ता आणि सरकार ही जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचे कारण बनत आहे. राजकारणी नेते आणि सत्ताधाऱ्यांकडून जेंव्हा -जेंव्हा संधी मिळेल तेंव्हा स्त्रियांविषयी विकृत आणि अपमानित अशी भाषा वापरली जाते. नुकतेच मुनगंटीवार यांनी केलेले व्यक्तव्य हे याचा पुरावा आहे. भारतीय पुरुषांप्रमाणे भारतीय स्त्री सुध्दा जाती-जातीत विभागल्या गेलेली असली तरी जातीच्या भिंती ओलांडण्याची क्षमता स्त्रियात आहे.
धर्म, परंपरा, श्रद्धा -अंधश्रद्धा नाकारुन संविधानाचे पालन केले तर स्त्रियांचा जगणं अधिक सुसह्य होईल, असेही उबाळे म्हणाल्या.
प्रारंभी सारिका उबाळे व इतर मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. व्याख्यानमालेचे अध्यक्ष आण्णासाहेब चित्तेकर, सचिव संजय हेरकर, उपाध्यक्ष रवी खरात यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.
या चौथ्या पुष्पाचे संचलन प्रमोदकुमार डोंगरदिवे यांनी केले तर सतीश वाहुळे यांनी आभार मानले.
यावेळी ज्येष्ठ सामाजिक नेते ॲड. बी. एम. साळवे, ॲड. ब्रह्मानंद चव्हाण,कामगार नेते अण्णा सावंत, सुभाष गाडगे, सुनील साळवे, गयाबाई साळवे, अरूण मगरे,भास्कर घेवंदे,प्रभाकर घेवंदे, मिलिंद कांबळे,बाला परदेशी, घनश्याम खाकीवाले, दीपक रननवरे,सुहास साळवे, विनोद रत्नपारखे, अशोक घोडे ,अनुराधा हेरकर,वंदना इंगळे,यांच्यासह आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, नागरीक- महिला उपस्थित होत्या.#####
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172