लोकसभेला OBC, VJNT चा उमेदवार कशासाठी? घराणेशाही आणि गुत्तेदारीच्या विरोधात? अशोक पांगारकरांना डावल्या जात असल्यामुळे?

जालना- भाजप, काँग्रेस आणि वंचित या तीनही पक्षाने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. दरम्यानच्या काळात भाजपामध्ये भाजपाच्या ओबीसी सेलचे नेते तेली समाजाचे नेतृत्व करणाऱ्या माजी नगरसेवक अशोक पांगारकर यांना डावलले जात असल्याची खंत ओबीसी मधून व्यक्त केली जात होती . यासंदर्भात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना लेखी निवेदनही देण्यात आले होते .त्यानंतर देखील भाजपाची अशोक पांगारकर यांच्यासोबत वागण्याची पद्धत बदलली नाही म्हणून की काय? आता ओबीसी आणि व्हीजेएनटी समाजानेच आपली वेगळी चूल मांडली आहे, आणि या दोन्ही प्रवर्गाच्या वतीने दीपक भीमराव बोऱ्हाडे यांना उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे. यासंदर्भात आज स्वतः श्री बोऱ्हाडे यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर घराणेशाही आणि गुत्तेदारीचे आरोप काही नवीन नाहीत, यापूर्वी त्यांनी त्यांच्या पत्नीलाही आमदारकीला उभे केले होते, कन्या जिल्हा परिषद सदस्य होत्या, चिरंजीव विद्यमान आमदार आहेत त्यासोबतच ते भाजपाचे जिल्हाध्यक्ष हे आहेत, भाऊ कॉन्ट्रॅक्टर आहेत अशा सर्वच बाजूंनी घराणेशाही आणि गुत्तेदारीचे आरोप त्यांच्यावर वारंवार होत आलेले आहेत. यासोबत त्यांचे अनेक नातेवाईकही राजकारणात आहेत त्यामुळे त्यांची “दादा”गिरी चालते असा आरोप आज दीपक बोऱ्हाडे यांनी पत्रकार परिषदेत केला.
ओबीसी आणि व्हीजेएनटी हा प्रवर्ग मोठ्या प्रमाणात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासोबत आहे हीच बाब हेरून वंचित बहुजन आघाडीने देखील धनगर समाजाच्या प्रभाकर बकले यांना जालना जिल्ह्यातून लोकसभेची उमेदवारी दिली. बकले यांनी देखील आपल्याला धनगर समाजाचा पाठिंबा आहे त्यामुळे कोणीही उमेदवार उभा राहणार नाही अशी ग्वाही पत्रकार परिषदेत दिली होती .परंतु आता याच समाजाच्या दीपक बोऱ्हाडे यांनी वेगळी चूल मांडल्यामुळे धनगर समाजाच्या मतांचे विभाजन होईल यात काही शंका नाही. परंतु नेमके मतदान करायचे कोणाला? एक उमेदवार अधिकृत आहे ,तर दुसरा उमेदवार समाजाने उभा केला आहे, तिसरा “दादा” आहे मग मतदान करायचे कोणाला.?
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172