Advertisment
Jalna Districtजालना जिल्हाराज्य

दोघांच्या भांडणात 300 विद्यार्थ्यांचे नुकसान; अधिकाऱ्यांच्या तोंडी आदेशाचा परिणाम

जालना; आत्तापर्यंत दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा हे माहीत होतं परंतु दोघांच्या भांडणांमध्ये तिसऱ्यांचेही नुकसान आणि ते देखील तब्बल 300 विद्यार्थ्यांचं! हे घडलं आहे केवळ तहसीलदारांच्या तोंडी आदेशामुळे आणि ते पाहायचं असेल तर जालना तालुक्यातील मजरेवाडी या गावची परिस्थिती पहावी लागेल.

झालं असं की, जालना तालुक्यातील मजरेवाडी येथील काही कुटुंबांनी गावठाणा मध्ये अतिक्रमण केले होते ते इथे राहत होते. यासंदर्भात अब्दुल जुम्मा परसुवाले यांनी 2015 मध्ये गावठाणात केलेले अतिक्रमण काढावे म्हणून न्यायालयात दावा दाखल केला होता आणि त्या अनुषंगाने न्यायालयाने दिनांक 20 मार्च 2024 रोजी आदेश देऊन जिल्हा प्रशासनाला दिनांक 16 एप्रिल 2024 पूर्वी हे अतिक्रमण काढावे असे सांगितले. या आदेशाचे पालन करण्यासाठी जालनाच्या तहसीलदार श्रीमती छाया पवार यांनी दिनांक 12 एप्रिल 2024 रोजी पोलिसांच्या फौजफाट्यासह सकाळीच मजरेवाडी गाठली आणि हे अतिक्रमण काढले. निष्काशीत केलेल्या या घरांना गावात कुठेही स्वतःची जागा नाही, घर नाही, अशा परिस्थितीमध्ये या कुटुंबांनी राहण्यासाठी जागा मागितली .त्यावेळी बाजूलाच असलेली जिल्हा परिषदेची शाळा तहसीलदारांना दिसली आणि पुढील व्यवस्था होईपर्यंत तिथे राहण्यास सांगितले. गावातील लोकांनी देखील माणुसकीची  आणि तहसीलदारांच्या सूचना यामुळे लगेच या खोल्या या कुटुंबासाठी उपलब्ध करून दिल्या. एप्रिलचा महिना असल्यामुळे शाळेलाही सुट्ट्या होत्या आणि खोल्या देखील रिकाम्याच होत्या. त्यामुळे याची कोणालाच अडचण झाली नाही. परंतु आता शाळा सुरू होऊन दोन महिने होत आले आजही या खोल्या अतिक्रमणधारकांच्या ताब्यात आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. या संदर्भात तहसीलदार श्रीमती छाया पवार यांना विचारले असता त्या म्हणाल्या” अतिक्रमण शाळेत झालेला आहे. त्यामुळे शाळेने पत्र देऊन पोलीस बंदोबस्त मागवावा आणि अतिक्रमण काढून घ्यावे. पोलीस बंदोबस्त देण्यासाठी मी तयार आहे. परंतु प्रश्न असा आहे की अतिक्रमण काढले महसूल विभागाने मग जिल्हा परिषदेची शाळा त्यांना देण्याचे कारणच काय? खरे तर त्यांची पर्यायी व्यवस्था करणे हे महसूल विभागाचे काम आहे परंतु आपली जबाबदारी झटकून त्यांनी सर्वांच्याच अडचणीत वाढ केली आहे. शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक म्हणतात यामध्ये आमचा काय दोष? आम्ही का पोलीस बंदोबस्त मागायचा? तरीदेखील विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन आत्तापर्यंत चार निवेदने जिल्हाधिकारी आणि गटविकास अधिकाऱ्यांना दिली आहेत. शाळा आमची आहे तिथे राहण्यासाठी परवानगी तहसीलदारांनी दिली आहे त्यामुळे ती रिकामी करून देण्याचे काम तहसीलदारांचे आहे. ज्यांनी अतिक्रमण केलं आहे आजही ते कुटुंब या शाळेत राहत आहेत ते म्हणतात आम्हाला इथे राहण्याची हौस नाही, परंतु तहसीलदार मॅडम यांनी घरकुलाची व्यवस्था होईपर्यंत तात्पुरते इथे राहा असे सांगितले होते. परंतु अद्याप पर्यंत आम्हाला घरकुल मिळालेले नाही मग आम्ही जायचे कुठे? गावचे ग्रामपंचायत सदस्य म्हणतात की ज्यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे त्यांनीच तो सोडवावा. या सर्वांच्या टोलवाटोलवी आणि चालढकलपणामुळे गावातील 300 विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. जागा कोरडी असेल तर किमान शाळेसमोर असलेल्या पटांगणात तरी जसे जमेल तसे शिक्षक या विद्यार्थ्यांना शिकवतात परंतु सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पाऊस पडला तर शाळेला अघोषित सुट्टीच असते. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना देखील चुकीची माहिती दिल्या जात आहे.  या खोल्या रिकाम्या केल्या असल्याचे जिल्हाधिकारी देखील सांगत आहेत. परंतु आजही या शाळेतील तीन खोल्यांमध्ये या निष्कांशितांचे घरातले  साहित्य आहे आणि त्याला कुलूप ही लावलेले आहे.

अशी आहे शाळेची परिस्थिती मजरेवाडी येथे मराठी माध्यमचे पहिली ते आठवी आठ वर्ग आणि उर्दू माध्यम चे पहिले ते आठवी आठ वर्ग असे एकूण सोळा वर्ग आहेत. खरे तर 16 वर्ग आणि कार्यालयासाठी किमान एक असे सतरा वर्ग इथे असायला हवे होते परंतु केवळ अकराच वर्ग खोल्या इथे आहेत. या 11 वर्ग खोल्यांपैकी दोन वर्ग खोल्या या नादुरुस्त आहेत त्यामुळे त्या बंदच असतात .उरल्या नऊ वर्ग खोल्या नऊ वर्ग खोल्या त्यामध्ये दोन्ही माध्यमच्या कार्यालयासाठी दोन खोल्या, उरल्या सात वर्ग खोल्या, त्यापैकी दोन चांगल्या आणि एक नादुरुस्त खोली अशा एकूण तीन वर्ग खोल्या या अतिक्रमणधारकांच्या ताब्यात आहेत. त्यामुळे फक्त चार चांगल्या वर्ग खोल्यांमध्ये हे 16 वर्ग चालू आहेत. एक वर्ग हा मोकळा पटांगणात फक्त चार अँगल वर टाकलेल्या पत्राच्या खाली सुरू आहे. इथे सध्या पहिले ते आठवी उर्दू माध्यमाचे 192 आणि मराठी माध्यम चे 104 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मराठी माध्यम साठी पाच तर उर्दू माध्यम साठी सहा शिक्षक इथे नियुक्त आहेत. अशा अपुऱ्या व्यवस्थेमध्ये शिक्षक एकाच वर्गात तीन तीन वर्गाचे विद्यार्थी बसवत आहेत. मग शिक्षकांनी शिकवायचं कोणाला आणि विद्यार्थ्यांनी शिकायचं कोणत्या वर्गाचं ?असा प्रश्न उपस्थित होत आहे. याहीपेक्षा मोठा प्रश्न आहे तो जी खोली नादुरुस्त आहे आणि तिथेही निष्काशीत राहतात ती खोली जर उद्या पडली तर याला जबाबदार कोण? ज्यांनी राहण्याचे तोंडी आदेश दिले त्या तहसीलदार? खोली नादुरुस्त आहे हे माहीत असताना देखील उघडून देणारे शाळेचे मुख्याध्यापक आणि ग्रामपंचायत? का जिल्हाधिकाऱ्यांना अंधारात ठेवून सर्व काही अलबेल आहे असे सांगणारे अधिकारी? का शाळा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे आहे त्यामुळे शिक्षणाधिकारी?

https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button