स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण सुरू असतानाच जिल्हा परिषदेत आत्मदहनाचा थरार
जालना -एकीकडे संपूर्ण भारत देश स्वातंत्र्याचा जल्लोष साजरा करत असताना दुसरीकडे मात्र जालना जिल्हा परिषदेच्या कारभारामुळे शेतकऱ्यांना आत्मदहन करण्याची वेळ आली आहे. ती देखील जो विभाग शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देतो त्याच विभागाच्या तक्रारीमुळे. जालना जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर गेल्या तीन दिवसांपासून अंबड तालुक्यातील ताड हादगाव येथील 80 वर्षांचे कुंडलिक हरिश्चंद्र हे आजोबा उपोषणाला बसले आहेत, तर आज एकीकडे झेंडावंदन होत असताना दुसरीकडे परतुर तालुक्यातील कराळा येथील शेतकरी सोपान गंगाधर सोळंके यांनी अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने वेळीच पोलीस आल्यामुळे पुढील दुर्घटना टळली आहे.
ताड हादगाव येथे लघुपाटबंधारे विभागाचा तलाव आहे आणि या तलावाच्या सांडव्यावरच गावातील काही लोकांनी प्लॉटिंग करून ती विक्रीही केली आहे. त्यामुळे तलावाचा सांडवा बंद झाला आहे आणि हे पाणी शेजारच्या शेतामध्ये आणि घरांमध्ये जात आहे या प्रकरणाची चौकशी करावी आणि हे अतिक्रमण हटवून सांडवा पूर्वत करावा या मागणीसाठी कुंडलिक हरिश्चंद्र हे गेल्या दोन वर्षांपासून जिल्हा परिषदेत चकरा मारत आहेत, त्यांना न्याय न मिळाल्याने तीन दिवसांपासून त्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारात उपोषणाचे हत्यार उपसून ठाण मांडले आहे .याच विभागाचे दुसरे प्रकरण हे परतूर तालुक्यातील कराळा येथील आहे. गावच्या कोल्हापुरी बंधाऱ्यामध्ये कंत्राटदाराने नियमानुसार साहित्य न वापरता दगडाचा भरमसाठ वापर केला आहे आणि त्यामुळे या कोल्हापुरी बंधाऱ्याचे काम निकृष्ट झाले असल्याची तक्रार या गावातील शेतकरी सोपान गंगाधर सोळंके यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी केली आहे .यासंदर्भात 12 जानेवारीला पहिली तक्रार दिली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी समिती गेली आणि ती तक्रारदाराशी चर्चा न करताच परत आली. आणि वरिष्ठांना आपला अहवाल दिला. या चुकीच्या अहवालामुळे तक्रारदाराने पुन्हा जिल्हा परिषदेला आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन 15 जुलैला जिल्हा परिषदेसमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. एवढेच नव्हे तर या निवेदनामध्ये जर तक्रार खोटी ठरली तर बंधाराचा पूर्ण खर्च नुकसान भरपाई म्हणून आपण देण्यास तयार असल्याचेही सांगितले होते. त्यानंतरही या विभागाकडून कुठलीच कारवाई झाली नाही. त्यामुळे सोपान सोळंके हे आज स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सकाळी साडेआठ वाजता जालना जिल्हा परिषदेमध्ये आले आणि एकीकडे ध्वजारोहण होत असताना दुसरीकडे अंगावर पेट्रोल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न करू लागले. परंतु त्याचवेळी उपस्थित असलेल्या कदीम जालना पोलिसांनी मात्र सोळंके यांना झटापट करून ताब्यात घेतले आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा मीना यांच्यासमोर उभे केले. शेतकऱ्याने आतापर्यंत झालेली सर्व घटना श्रीमती मीना यांना सांगितली. त्याच वेळी तिथे उपस्थित असलेल्या या विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी खोटी माहिती देऊन मला आत्ताच प्रकरण समजले आहे असे सांगितले .परंतु प्रत्यक्षात मात्र कुंडलिक हरिश्चंद्र यांच्याकडे गेला दोन वर्षांपासून जिल्हा परिषदेला दिलेल्या निवेदनांची पोचपावती आहे तर सोपान सोळंके यांच्याकडे देखील 12 जानेवारी 2024 पासून आतापर्यंत केलेल्या सर्व पत्र व्यवहाराची पोहोच पावती आहे. असे असतानाही सर्व जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांसमोर या अधिकाऱ्याने शेतकऱ्याला खोटे ठरवले ठरवले आहे. दरम्यान श्रीमती मीना यांनी” मी लक्ष घालते” असे सांगून तूर्तास सोपान सोळंके यांचे आत्मदन थांबवले आहे. परंतु भविष्यात जर या दोन्ही तक्रारींचा निपटारा झाला नाही तर उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172