ICT: लोकसभेत भाजपाच्या झालेल्या पराभवानंतर आय. सी. टी. चे गुऱ्हाळ पुन्हा सुरू,पहा सविस्तर बातमी

जालना- सन 2017- 18 मध्ये केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जालन्यामध्ये अनेक विकासाची कामे केली. त्यामध्ये महत्त्वाची आणि मैलाचा दगड ठरणारी कामे म्हणजे रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण, रेल्वेची विकास कामे ,ही सर्वसामान्यांसाठी जिव्हाळ्याची विषय ठरली.
त्यासोबत उद्योजकांना खुश करण्यासाठी त्यांच्यासाठी जालना शहरात ड्रायपोर्ट म्हणजेच रेल्वेचे बंदर ही एक संकल्पना आणि त्याला जोडूनच आयसीटी म्हणजेच रसायन तंत्रज्ञान संस्था हे दोन मोठे विषय मतदारांसमोर मांडले .यामध्ये मोठा फायदा होणार होता तो उद्योजकांना ! 2017 मध्ये या घोषणा झाल्या आणि 2018 मध्ये याचे कामही सुरू झाले. या कामाच्या जोरावर 2019 मध्ये भारतीय जनता पक्षाचे लोकसभेचे उमेदवार रावसाहेब पाटील दानवे यांना जनतेने निवडूनही दिले .परंतु निवडून आल्यानंतर रेल्वे स्थानकाच्या कामाशिवाय उद्योजकांच्या विकासात भर घालणाऱ्या आयसीटी आणि ड्रायपोर्ट या दोन्ही संस्थांची कामे रखडलेलीच आहेत .त्यामुळेच की काय 2024 च्या निवडणुकीमध्ये उद्योजकांनी रावसाहेब दानवे यांना दिलेला पाठिंबा काढून घेतला आणि पर्यायाने दानवे यांचा पराभव झाला. कदाचित हा पराभव पुन्हा भारतीय जनता पक्षाला विधानसभेत बसू नये म्हणून की काय पुन्हा एकदा आता या दोन्ही कामांना गती देण्याचे गुऱ्हाळ सुरू झाले आहे. या संदर्भात गुरुवार दिनांक 29 रोजी रसायन तंत्रज्ञान संस्था जालना येथे एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते .निमित्य होतं आयसीटी मराठवाडा जालना कॅम्पसचे नवीन संचालक प्रा.डॉ. शशांक मस्के यांच्या स्वागताचे!.
परंतु यामध्ये स्वागत तर बाजूलाच राहिले आणि समोर आली ती या संस्थेची घाई गडबडीत केलेली सुरुवात आणि त्यानंतर त्यांच्याकडे फिरवलेली पाठ. यातूनच आता पुन्हा ही संस्था बंद होते की काय अशी शक्यताच जणू कालच्या या चर्चासत्रातून उघड झाली आहे .या कार्यक्रमात आयसीटी मुंबईचे कुलगुरू प्रा. डॉ. अनिरुद्ध पंडित यांनी ऑनलाईन सहभाग घेतला होता. आजची सविस्तर परिस्थिती त्यांनी विशद केली. याच्यावर पर्याय काढण्यासाठी माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पर्याय सुचवले. इमारत बांधण्यासाठी आलेल्या 9 कोटी रुपयांच्या निधीवर करोडो रुपयांची इमारत कशी उभी राहणार याविषयी वास्तु विशारद अजय कुलकर्णी यांनी सादरीकरण केले. या संस्थेचे अधिकारी बी. जे. खोसे उद्योजक सुनील रायठठा यांची देखील व्यासपीठावर उपस्थिती होती.
*चर्चेतील महत्त्वाचे मुद्दे* सन 2017 ला मान्यता मिळाली, 2018 मध्ये वर्ग सुरू झाले, सहा वर्षानंतर दोन बॅचेस बाहेर पडल्या.* आत्तापर्यंत शासनाने एकूण 23 कोटी रुपये दिले त्यामध्ये प्रयोगशाळेचे साहित्य आणि इतर अत्यावश्यक गोष्टींची खरेदी झाली* कर्मचारी आणि प्राध्यापकांच्या पगारासाठी शासनाने पैसाच दिला नाही, त्यामुळे आयसीटी रसायन तंत्रज्ञान संस्थेने स्वतःच्या खिशातून 31 कोटी रुपये खर्च केले आहेत .इमारतीच्या बांधकामासाठी 55 कोटी रुपयांना परवानगी दिली आहे परंतु अद्याप फक्त साडेनऊ कोटीच रुपये दिले आहेत ,आणि त्यापैकी साडेतीन कोटी रुपये हे इमारतीच्या संरक्षण भिंतीच्या कामावर खर्च करणे सुरू आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे तो या जागेवर असलेल्या अतिक्रमणांचा! ही अतिक्रमणे काढायची कोणी? नेत्यांनी? जिल्हाधिकाऱ्यांनी? का तहसीलदारांनी यामध्ये या जागेचे काम रखडले आहे. संस्थेचे अधिकारी पत्रव्यवहार आणि बैठका घेऊन थकले आहेत. परंतु त्यांची ताकद कमी पडत आहे. शासनाकडून ना निधी मिळत आहे ना जागेवरील अतिक्रमण हटत आहे. त्यामुळे इथे असलेल्या प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये संस्था उभी राहील की नाही? याबद्दल आता शंका व्यक्त केली जात आहे .त्यासोबत या कर्मचाऱ्यांना अजून कायमस्वरूपी देखील केलेले नाही पर्यायाने हे कर्मचारी इतर चांगल्या संस्थांमध्ये नोकरी शोधू शकतात! एकंदरीत काय तर 2019 ची निवडणूक जिंकून देणाऱ्या या आयसीटी आणि ड्रायपोर्टच्या विकास कामाकडे दुर्लक्ष केल्यामुळे उद्योजकांनी आणि जालनेकारांनी कदाचित माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना पराभूत केले असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. कारण आयसीटी ही एक संस्था तिथे भारतातील वेगवेगळ्या राज्याचे विद्यार्थी शिक्षणासाठी येऊन उद्योजकांना चांगले अभियंते, शहराचे नावलौकिक आणि इतर उद्योगांना देखील चालना मिळाली असती. कार्यक्रमासाठी उद्योजक घनश्यामजी गोयल, जेईएस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश अग्निहोत्री ,सुनील बियाणी ,अरुण अग्रवाल आदींची उपस्थिती होती.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172