Advertisment
Jalna Districtजालना जिल्हाराज्य

कार्यालया ऐवजी बंगल्यावर काम? चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याला फुटला घाम, बिघडले मानसिक संतुलन?

जालना- नियुक्ती एका ठिकाणी आणि काम दुसऱ्याच ठिकाणी हे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत असलेला अलिखित नियमच आहे ,मग तो खाजगी संस्था चालकांना आणि वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांना देखील अपवाद नाही. पर्याय नसतो आणि नोकरी घालवायची नसते किंवा बदली नको म्हणून हे चतुर्थश्रेणी कर्मचारी नीमुटपणे हा त्रास सहन करतात. परंतु बंगल्यावरील कामाचा अतिरिक्त ताण किंवा अनावश्यक कामे ही कधीकधी मानसिक संतुलन बिघडण्यासाठी देखील कारणीभूत ठरतात. असाच एक प्रकार काल रात्री घडल्याची जिल्हा परिषद परिसरात चर्चा आहे. जिल्हा परिषदेतील सामान्य प्रशासनाच्या आस्थापनेवर एक शिपाई कार्यरत आहे त्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनाला जोडलेला आहे. इथे दोन शिपाई आहेत मात्र सध्या एकच शिपाई कार्यरत आहे आणि एक शिपाई बंगल्यावर कार्यरत आहे. रात्री उशिरा बंगल्यावरून येताना या शिपायाचे मानसिक संतुलन बिघडले ,घाम फुटला आणि सर्वच जिल्हा परिषदेचे कर्मचारी हादरले. संतुलन  कशामुळे बिघडले ? याचे कारण डॉक्टर शोधत आहेत. तूर्तास तरी या शिपायाने पंधरा दिवसांची अर्जित रजा घेऊन आराम करण्याचे ठरवले आहे. दरम्यान शिपायांच्या नियुक्ती संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्याला विचारले असता त्याने सांगितले की नियुक्ती देण्याचे काम आमचे आहे परंतु त्याच्याकडून काय काम करून घ्यायचे आणि कसे करून घ्यायचे हे तो अधिकारी ठरवतो. त्यामुळे  या कर्मचाऱ्याला काय काम होते आणि काय नाही ते आम्हाला सांगता येणार नाही.

या कर्मचाऱ्यांचे मानसिक संतुलन बिघडल्याची चर्चा सर्वत्र पसरली आणि जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सामान्य प्रशासनाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेऊन घडलेला सर्व प्रकार सांगितला. परंतु या अधिकाऱ्यांनी जोपर्यंत लेखी काही येत नाही तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाहीत असे सांगून हात झटकले आहेत. तर जिल्हा परिषदेच्या एका कर्मचारी संघटनेने हाच झटकून या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी वेगळी संघटना आहे आमचा संबंध नाही असेही उत्तर दिले.

खरंतर शासनाने एक सप्टेंबर 1986 रोजी एक परिपत्रक काढले होते. याचीच दुसरी आवृत्ती पुन्हा दोन जून 2019 रोजी महाराष्ट्र शासनाचे सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव सु.वी. कोळेकर यांनी काढले आहे.  या परिपत्रकात स्पष्ट म्हटले आहे की “शासकीय अधिकाऱ्यांनी खाजगी आणि वैयक्तिक कामासाठी चतुर्थ श्रेणी शासकीय कर्मचारी व इतर कनिष्ठ शासकीय कर्मचारी यांच्या सेवेचा वापर न करण्याबाबत उपरोक्त परिपत्रकान्वये सूचना देण्यात आले आहेत. तथापि या सूचनांचे अनुपालन होत नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे .याची शासनाने गंभीर दखल घेतली असून परिपत्रकाद्वारे पुन्हा अशा सूचना देण्यात येत आहेत की, शासकीय अधिकाऱ्यांनी चतुर्थ श्रेणी कर्मचारी व कनिष्ठ शासकीय कर्मचारी यांच्याकडून त्यांच्या मर्जी विरुद्ध खाजगी अथवा वैयक्तिक काम करून घेण्याचे कटाक्षाने टाळावे”. अशा स्पष्ट सूचना असताना देखील अधिकारी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना आपल्या बंगल्यावरील कामे करायला लावत आहेत. खरंतर ही कामे करत असताना या कर्मचाऱ्यांचा देखील नकार नसतो परंतु वारंवार मिळणारी अपमानास्पद वागणूक, आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी असल्याची करून दिला जाणारी जाणीव ही त्याच्या मनाला खाते, त्यामुळेच की काय गेल्या दोन वर्षांमध्ये जिल्हा परिषदेच्या सुमारे दहा बारा चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना हा अपमान सहन करावा लागला आहे. वारंवार होत असलेल्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या या अपमानाबद्दल आता कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र राज्य जागृत झाला आहे आणि अशा पिळवणुकीला आळा घालण्यासाठी त्यांनी जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आज दिनांक पाच नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकाची आठवण करून देणारे निवेदन दिले आहे .त्याचसोबत शासनाने विहित केलेला जॉब चार्टनुसारच चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना कामे सांगावीत असेही नमूद केले आहे. या निवेदनावर या संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद भगत यांची स्वाक्षरी आहे.

सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.या बातम्या आपण फेसबुक,इन्स्टाग्राम,व्हाट्सएप चॅनलवर देखील पाहू शकता.
-दिलीप पोहनेरकर-9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button