मुख्य संपादिका
सौ.मेघा दिलीप पोहनेरकर
============
आनंद या जीवनाचा ! दिवाळी म्हणजे
‘ तिमिरातूनी तेजाकडे ‘ घेवून जाणारा प्रकाशाचा सण असतो. सध्याचे जग हे अत्याधुनिकरण आणि डिजिटल तंत्रज्ञानाचे हायटेक बनले आहे. इथे संवाद प्रत्यक्ष न होता तंत्रज्ञानावर आधारित भावनांनी होतो…इथे ‘इमोजी’ उदंड आहेत,पण मनातील भावनेचा ओलावा हरवत चालला एवढे मात्र नक्कीच!.. माणूस माणसाच्या जसा तंत्रज्ञानाने जवळ आला तसा ‘ मनाने ‘ एकाकी अन दूर होत असल्याचे दिसून येते. सण उत्सव साजरा करताना मनामनातील असे विचारांचे दीप पेटवूया! .. वास्तव परिस्थिती,जीवघेणी स्पर्धा, आकस,ईर्षा आणि द्वेष यासह नकारात्मक सूर नेहमीच दिसून येतो. समाजकारण,राजकारण,
अध्यात्म,धार्मिक वातावरण ढवळून निघत आहे. अशावेळी संत ज्ञानदेवांचा
‘ दुरितांचे तिमिर जावो ! ‘ हा विचार मनामनात ठेवता आला पाहिजे. जीवन हे क्षणभंगुर आहे,असे अध्यात्म सांगते तेव्हा वर्तमानात जगता आले पाहिजे. साहित्यातून येणारा ‘ झाले गेले विसरून जावे,पुढे पुढे चालावे,
जीवनगाणे गातच राहावे ‘ या गीताच्या ओळी प्रेरणा देतात. जीवन सुंदरच आहे,परंतु मनामनातील क्लिमिषे दूर सारत ते सहजपणे जगता आले पाहिजे. दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टीकडे दूर्लक्ष करीत सकारात्मक विचार करता आला पाहिजे,तेव्हा हे जीवन सुंदर आहे !.. अशी अनुभूती केवळ साहित्यातूनच घेता येते,म्हणून दिवाळी अंकातील साहित्याने ऊर्जा मिळते…
एक शतक एक दशकापेक्षा अधिक काळापासून ज्या माध्यमातून आयुष्याचा सूर सापडायला लागला तो महत्वाचा घटक म्हणजे मराठी दिवाळी अंक होय…
कवी,लेखक, कथाकार,चित्रकार, नाटककार, व्यंगचित्रकार,कादंबरीकार, यासह साहित्यिकांना नावलौकिक मिळवून देणारा हा दुवा…मराठी दिवाळी अंकाची परंपरा एक शतक एक दशकाहून अधिक पुढे आली आहे.ब्रिटीशांनी भारतात जेव्हा मुद्रणकला आणली तेव्हापासून लिखित साहित्य पुढे आले.बंगालमध्ये दुर्गा उत्सवाची परंपरा आहे.या दरम्यान विशेष अंक काढण्याची परंपरा आहे.बंगालमधील या परंपरेने तत्कालीन ‘ मनोरंजन ‘ मासिक चालविणारे काशिनाथ माजगावकर यांचे लक्ष वेधले. येथूनच मराठी दिवाळी अंकाची परंपरा सुरुवात झाली.
दिवाळी अंकाची ११४ वर्षाची परंपरा आजही सुरु आहे. काळानुसार टप्पे,प्रकार,साहित्य आणि अंकाचे छपाई तंत्रज्ञान बदलत गेले. ऐंशीच्या दशकानंतर संगणक आले आणि दिवाळी अंकाचा चेहरा बदलला.कृष्ण धवल ते हायटेक फोरकलर,मल्टीकलर असा प्रवास आहे. दिवाळी अंकात ‘ मौज ‘ अंकाचा सिंहाचा वाटा आहे.नव्वद वर्षाच्या पुढे वाटचाल करीत आहे.साने गुरुजींनी सुरु केलेल्या ‘ साधना ‘ दिवाळी अंकाने महाराष्ट्रात वैचारिक वाचनसंस्कृती रुजविली आहे. आजही ‘ साधना’ परंपरा टिकून आहे,हे विशेष. दिवाळी अंकाचे शेकडो विषय असताना, विनोदी साहित्यावरील विशेष दिवाळी अंक ‘ आवाज ‘ ची परंपरा आजही आहेच. मराठीत आजच्या घडीला पाचशेहून अधिक दिवाळी अंक निघतात.
आज साहित्य, कला,संस्कृती,वैद्यकीय, विनोदी,महिला विषयक,राशी भविष्य, आरोग्य,क्रीडा,संगीत,
चित्रपट, कृषीसह अनेक विषयानुसार दिवाळी अंक निघतात.तीनएक वर्षापासून
दिवाळी अंकाची दिशा बदलली आहे. आजच्या घडीला डिजिटल प्लॅटफॉर्म हा नवा बदल दिवाळी अंकात दिसून येत आहे. दिवाळी अंकाचे नवे रूप धारण केले आहे.जालन्यातून पहिल्यांदाच डिजीटल प्लॅटफॉर्मवरील दिवाळी अंक काढण्याचे काम मेधा दिलीप पोहनेरकर करीत आहे,हे विशेष.यंदाचा चौथा डिजिटल दिवाळी आपल्या हाती,देताना आम्हांला आनंद होत आहे !…
यंदाच्या डिजिटल दिवाळी अंकाचे विशेष असे, की वंदनीय साने गुरुजी यांची शतकोत्तर रौप्य महोत्सव जयंती वर्ष आहे. मूल्यसंस्काराचे बीजारोपण करणारा ‘ श्यामची आई ‘ या ग्रंथातील नव्हेतर साने गुरुजींच्या संपूर्ण साहित्यातील आंतरभारतीचा,राष्ट्र सेवादलाचा विचार अपरिहार्य ठरतो. यावर विशेष लेख आहे. तसेच
पुणे येथील प्रसिद्ध साहित्यिक राजीव तांबे यांची एक कथा आणि समर्पक अशी चित्रे दिवाळी अंकात आहेत. ज्येष्ठ साहित्यिक अरुण देशपांडे यांचेही साहित्य आहे.डिजिटल दिवाळी अंकात विलेपार्ले येथील साहित्यिक लता गुठे,अकोला येथील अमिता घाटोळे, मूर्तीजापूर येथील सेवकराम लहाने, लातूर येथील डाॅ.सुशील सातपुते, धाराशिव येथील योगेश कुलकर्णी, आश्रूबा कोठावळे यांच्यासह जालन्यातील लेखक, कवी,विविध क्षेत्रातील मान्यवरांचे साहित्य लेखनाने डिजिटल दिवाळी अंकाच्या वैभवात अधिक भर पडली आहे.
वाचक,रसिकांना edtv ( इलेक्ट्रॉनिक डिजीटल) चा ‘ अंकूर ‘ डिजिटल चौथा दिवाळी अंक पसंत पडेल,अशा अपेक्षेसह दीपोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा…..
######################
खालील व्हिडिओमध्ये आहे आपल्यासाठी लाडू आणि अनुक्रमणिका
हे देवी शारदे
देवी शारदे, हे देवी शारदे
आम्ही करतो तुला वंदन
गातो तुझ्याचसाठी कवन
देवी शारदे, हे देवी शारदे… ॥धृ॥
त्याग करुनी खोट्याचा
मिळू दे मार्ग मोक्षाचा
आनंदाने भरावे हे गगन
करतेस तू दुःखाचे हरण… ॥१॥
छेडिता तार तू वीणेचा
सूर उमटतो सौख्याचा
चराचराचे नंदनवन
व्हावे दुःखाचे दमन… ॥२॥
अंधःकार दूर व्हावा
प्रकाशाचा पूर यावा
उजळावे सृष्टीचे भवन
स्वीकार तू आमचे नमन… ॥३॥
प्रत्येकाला हक्क जगण्याचा
स्वतःचे पोट भरण्याचा
अन्यायाचे व्हावे पतन
आम्ही आलो तुला शरण… ॥४॥
दुनिया
मौजमजेवाली दुनिया जागते रात्रभर
उगवे सूर्य कधी कुणा नसते खबर
ज्याची त्याची आता निराळी दुनिया
जैसी दृष्टी,विचार तैसी वेगळी दुनिया
करीती पूजा मनोभावे धन तिजोरीची
किंमत शून्य झाली आता मन तिजोरीची
रस्ते सारे वाहनांनी ओसंडुनी वाहती
चालणारे मुठीत जीव धरूनी चालती
मोबाईलचे मेसेज ,समक्ष भेटणे नाही
सहवास ना एकमेकांशी बोलणे नाही
तणाव जगण्यातले कमी होत नाही
उभारी देणारे कुणीसे बोलत नाही
काय सांगावे कुणा, कितीदा सांगावे
“स्व”कोषातून कुणी बाहेर येत नाही
———————————————— आधार
कितीही लपवा आसवे जगापासुनी थेंबांच्या ओझ्याने जडावतेच पापणी ।।
हुंदके कोंडीता आतल्या आत जरी
वेदना टोचतात ,कळा येतात उरी ।।
जन परके हे सारे, नसे कधी आपले
येती ना कधी पुसण्या आसवे आपले ।।
असह्य होतो कधी अशा दुःखाचा भार
अशा वेळी द्यावा आपण आधार ।।
असे मोलाचा कुणाचा हात आधाराचा
या बळावर करता येतो सामना संकटांचा
———————————————–
फक्त मराठी गझलेसाठी
संपवण्याचा डाव आखला जातो
यासाठी इतिहास बदलला जातो
इंद्रधनू म्हातारे झाले आहे
आता नुसता रंग शिकवला जातो..
धर्म आपला करण्यासाठी मोठा
माणुसकीचा गळा घोटला जातो..
अंधाराला गुरू मानले जाते
इतक्यासाठी सूर्य लपवला जातो..
व्यवस्थेतले प्यादे बनलो आपण
पण कर्माचा खेळ खेळला जातो?
तुम्ही भले रंगांची धरणे बांधा आपआपला रंग वळवला जातो..
ध चा म तर आजही नव्याने होतो
हुकुमाखातर शब्द बदलला जातो..
पोटरी पर्यंत केशसंभार असलेल्या माझ्या
एकुलत्या एक बायकोने
ब्युटी पार्लर मध्ये जाऊन
वितभरच वेणी ठेवली
तिचा हा भयानक अवतार पाहून
मी बायकोला म्हणालो आता माझी सटकली,
घरात ढीगभर साड्या असताना
बायकोने सेल मध्ये जाऊन
कपाट भर साड्या आणल्या
माझ्याकडे साड्याचे बिल देत म्हणाली
मी काहीच खरेदी नाही केली
तेव्हा मी बायकोस म्हणालो आता माझी सटकली
महिला मंडळाच्या सर्व मैत्रिणी घरी येताच
बायको म्हणाली आता तुम्ही घरात थांबू नका
मी बोलावल्या वरच तुम्ही घरात या अशी आज्ञा केली
तिचा आदेश ऐकत मी घराबाहेर पडलो
बायकोला म्हणालो आता माझी सटकली
बायकोच्या माहेरचे अचानकच घरी टपकले
हे पहाताच बायकोने मला लगेच काम सांगितले
मी काम करत होतो ती सटाक्या मारत होती
मी रागात आलो काम करत करत
बायकोस म्हणालो आता माझी सटकली
मला लाखभर पगार मिळाल्यावर
मी मला फक्त १००रुपये बिडी काडी साठी ठेवले
अन् बायकोला उरलेले९९९०० रुपये दिले
तेव्हा तिने मजजवळचे १०० रुपये पण मागितले
मी रागा रागाने १०० रुपये अंगावर फेकत
बायकोला म्हणालो आता माझी सटकली
आता माझी खरचंच सटकली
*आई*
निसर्गाचे दान (काव्य प्रकार : -अभंग)
निसर्गाचे दान । झाडे खरोखर ।
लावा दारोदार । सर्वजण ॥ १ ॥
प्राणवायू लाभे | झाडामुळे सदा ।
सर्वांनी एकदा । झाडे लावा ॥२ ॥
झाडे लावू खूप ।करू संगोपन ।
करूया जतन । निरंतर ॥ ३ ॥
शुद्ध हवा मिळे ।आनंदी जीवन ।
सुख समाधान । सदा लाभे ॥४ ॥
मिळाली सावली | फळे फुले खुप ।
निर्सगाचे रूप । मनोहर ॥ ५ ॥
वृक्ष तोड केली । हवा झाली कमी ।
जीवनाची हमी । कोण देई ? ॥६ ॥
काळाची गरज । वृक्ष एक लाव ।
अनमोल जीव । मानवाचा ॥ ७ ॥
आयुष्य..!
आयुष्य माझं तुझं
नक्की नक्की गुजगूज
मन त्यात हळुवार
चेहऱ्यावर सुख तेज
जन्म मायबाप ऋन
ईश शुभ आशीर्वाद
जोड याला आपलीच
नित्य स्नेहाचा संवाद
आहे वय सोय सारी
तोवरच मजा भारी
तेव्हा करू कर्तव्यही
भारी उंचची उभारी
तूला मलाग जपणे
घरदार हा संसार
खूप चांगले आपले
देणे घेणेग संस्कार
तूला मला नको कधी
रूप सौंदर्याचा गर्व
वृत्ती हा परोपकार
धर्म मानू हाच सर्व
हास्य ठेवू तूझी माझी
गोडं नितळ प्रतिमा
नित्य जागू सत्य शाही
लोकशाही ही गरिमा
दोस्त माझा खास (बाल कविता )
दोस्त माझा खास, भू भू चं पिल्लू
नाव त्याच ठेवलं, आम्ही लाडाने टिल्लू
टिल्लू बोबडे बोल, माझ्या सारखेच बोलतो
गळ्यात घुंगरपट्टा, घालून ऐटीत फिरतो
रोज सोबत आम्ही, दूध काला खातो
खेळ खेळून आम्ही, खूप व्यायाम करतो
मला म्हणतो झोप, राखण मी करतो
एवढसा जीव पण, इमानदारीने वागतो.
आई (काव्यप्रकार अभंग )
रूप तुझे आई । जगण्याचा मार्ग । पायी तुझ्या स्वर्ग । मज वाटे ॥१ ॥ तुझं सम नसे । निस्वार्थ निर्मळ ॥ जगण्यात बळ ।आशीर्वाद ॥२ ॥ वासल्याचा झरा । स्नेहमयी माया ॥ गंगा काशी पाया । तीर्थरूपे ॥३ ॥ आई तुझी सेवा । जन्मोजन्मी दास ॥ जीवन विकास ।कृपा छत्र ॥४॥ मायबाप गुरु ।सेवा भाव धरु । अखंडित स्मरू ।उपकार ॥५॥ काटा रुते बाळा । नाव येई ओठी
ती भेटते रोज हिरव्यागार रानात
गर्द काळोखात ती वेचत राहते… काजव्यांची उलघाल
तिला उद्दिपित करतो काळोखाचा घमघमाट ती चालत राहते… निशब्द होऊन
तिला उमगत नाही त्याची भाषा पण छळत राहते देह बोली आतल्या आत
हातातला हात अधिक घट्ट होताच ती थांबते… मोगर्याचा सुगंध घुटमळतो त्याच्या श्वासांच्या लयीत अन्… शुभ्र चांदण्यात तो वाचू लागतो अथांग प्रेमगीत… तिच्या टपोऱ्या डोळ्यांत
वही…..
बाप मव्हा फडा
माय मही दूल्डी.
घरादारासाठी उभी,
उभ्या येळाची काडी.
काडी काडी ईणती
सुपं,दूल्डी,दूहिरी.
बाप जाई खेड्यावर,
घरी आणण्या भाकरी..
दूल्डीची काडी जशी
जशी वळंब्यात ईट.
डोळे भरुन पाहता,
व्हई तीला दिठ..
येड्या बाभळीवानी माय
माय काळी गबाळी.
लाल कुकाचं लिपण,
हात हात कपाळी..
तोंडावर सदा मायिच्या
हासु सुरेख.
माय बहिणाईच्या वहीतली,
खास वळ येक..
!! आजोबा !!
अनुभवाचा फळा मायेचा लळा आजोबा
संस्काराची शाळा नात्यांचा मळा आजोबा
पुराणातील कथा संताची गाथा आजोबा
अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांची व्यथा आजोबा
कसं जगणं असावं याचं सुत्र आजोबा
नातवांचा असतो पहिला मित्र आजोबा
सत्य असत्य सांगणारा मार्ग आजोबा
सदा मिळो सहवास वाटे स्वर्ग आजोबा
नाही भार कुटुंबांचा असा आधार आजोबा
नात्याला पूर्णत्व देई असा आकार आजोबा
आठवणींचा प्रवास सहवास आजोबा
सर्वांच्या कल्याणाचा ध्यास आजोबा
नातवाला सारं गाव फिरवतो आजोबा
त्याचे सगळेच हट्ट पुरवितो आजोबा
घराची असते अदृश्य शक्ति आजोबा
जीवनमूल्ये जोपासणारी सक्ती आजोबा
संस्कार पेरणारा खरा शेतकरी आजोबा
संंस्कृृती रक्षक असा वारकरी आजोबा
थकलेल्या पावलांना घ्या उमजून आजोबा
आयुष्यभर घेत असतो समजून आजोबा
कुटुंबाची साथ सदैव मायेचा हात आजोबा
ध्यानी मनी असावे सेवेतून प्रभात आजोबा
*दिवाळी*
आली दिवाळी दिवाळी
आनंदाला रे उधाण
मोठ्या माणसाने मान
लहान्याला द्यावं ज्ञान l1l
आली दिवाळी दिवाळी
अंधकाराचा तो नाश
कारा कष्टही जोमान
होऊ नकाच हताशा l2l
आली दिवाळी दिवाळी
बहिण भावाला ओवाळी
रक्ता प्रेमाच्या नात्यात
राहो सदा अशीच गोडी l3l
आली दिवाळी दिवाळी
वर्षाचा रे सण मोठा
झटकून टाकू भेदभाव
नाही आनंदाला तोटा l4l
आली दिवाळी दिवाळी
दीप लावू या ज्ञानाचे
जाळू अहंकारी तेल
मोती होतील घामाचे l5l
आली दिवाळी दिवाळी
तोरण लावू या समतेचे
काम, क्रोध, मत्सर टाकून
सजवू ताट फराळाचे l6l
अंबाबाई
उदय उदय ग अंबाबाई
तुझ्या शक्तीत सामर्थ्य लई ||ध्रु||
केली महिषासुराचा वध पूरा
तुझ्या शक्तीचा वापर खरा
उदय उदय गं अंबाबाई
तुझ्या शक्तीत सामर्थ्य लई ||१||
तीन देवाची शक्ती तू माता
भक्तांच्या सुखाची खरी गाथा
उदय उदय ग अंबाबाई
तुझ्या शक्तीत सामर्थ्य लई ||२||
नवरात्रीत तुझे रूप पाहता
अबला होई बलवान माता
उदय उदय ग अंबाबाई
तुझ्या शक्तीत सामर्थ्य लई ||३||
जगा सांगे श्रीरामे दास
जिजाऊ,अहिल्या,सावित्री,रमाई
परिवर्तनवादी दुर्गांचा श्वास
उदय उदय ग अंबाबाई
तुझ्या शक्तीत सामर्थ्य लई ||४||
######################
खरा तो एकचि धर्म,जगाला प्रेम अर्पावे..!वंदनीय साने गुरुजी यांचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्ष प्रारंभ होत आहे. गुरुजी वयाच्या पंचविशीपासून ते अखेरपर्यंत सतत लिहीत होते. गुरुजींच्या वैचारिक साहित्यात स्नेहभाव,सेवा धर्म यासह जीवनात जे जे उदात्त दिसेल त्यासमोर नम्रपणे नतमस्तक होण्याची जीवनमूल्ये आहेत. आजचे समाजवास्तव पाहता गुरुजींचा विचार हा अपरिहार्य ठरतो. आंतरभारतीची विचारधारा मांडत गुरुजींनी विश्वात्मक साहित्याचा वेध घेण्याची दूरदृष्टी दिलेली आहे.जागतिकीकरण आणि आभासी जगाचे तंत्रज्ञान इतके युवापिढीवर आक्रमण करायला धावत आहे,की ज्यामुळे
संवेदनशीलता,संयमपणा,सहनशीलता हरवत चालली आहे. आजच्या युवापिढीचे मन,मेंदू आणि मनगट बळकट करायचे असेल तर थेट पुस्तकांशी संवाद घडविणे महत्वाचे आहे. शेतकरी,कष्टकरी,कामगार,महिला आणि बालकुमारांच्या सक्षम आयुष्यासाठी साने गुरुजींच्या विचारांची शिदोरीच पोषक ठरते….
==========
एकंदरीत भवतालची स्थिती- परिस्थिती पाहता आशावादी वाटेल,असे चित्र दिसून येत नाही. उदासिनता,स्पर्धात्मक वृत्ती,आकस,दुजाभाव,पैसा- संपत्तीसाठी जीवघेणी स्पर्धा, जात- धर्म, प्रांत आणि भाषावादाने निरसता निर्माण केल्याचेच वातावरण दिसून येते. जीवनाला नी जगण्याला निर्मळ,उदार अंतःकरणाने कुणीच समजून घेत नाही. माणूस म्हणून माणसाला का ओळखले जात नाही,या प्रश्नाचे उत्तर कुणी शोधावे.? समूहा समूहात वाद- आकस,द्वेष आणि संतापाची भावना उफाळून येते तेव्हा महापुरुषांच्या विचारांची अपरिहार्यता ठरते,एवढे मात्र नक्की..
स्वातंत्र्ययुध्द,शिक्षण,समाजकार्य अशा अनेकविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे शिक्षक, संपादक, अनुवादक, स्वातंत्र्यसेनानी, समाजसुधारक आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणजे पांडुरंग सदाशिव साने अर्थात साने गुरुजी… जेमतेम आयुष्याची पन्नाशी पार केलेला एक ध्येयवेडा शिक्षक, मातृभूमीच्या सेवेसाठी नोकरीचा राजीनामा देऊन स्वातंत्र्यसमरात आयुष्य झोकून देणारा एक सेनानी…
समाजातील अस्पृश्यता नष्ट व्हावी,एकता निर्माण व्हावी,कष्टकरी- श्रमिक यासह शेतकरी वर्गाचे दैन्य दूर व्हावे, लहान मुले- स्त्रिया, युवक,दीन-दलित यांना स्वत्वाची जाणीव निर्माण व्हावी यासाठी साने गुरुजींनी आयुष्य समर्पित केले. स्वातंत्र्यसमर,दलितांना पंढरपूर येथील मंदिर प्रवेशासाठी आमरण उपोषण करणारे साने गुरुजी, शेतकरी कामगार वर्गासाठी लढा देणारे साने गुरुजी, युवकांसाठी कृती कार्यक्रम देणारे साने गुरुजी अशा विविधतेत ‘मातृहदय’ जपून ठेवणारे साने गुरुजीचे विचार आजच्या वर्तमानात अपरिहार्य ठरतात. जाती- धर्म विषमते विरुध्द साने गुरुजी लढले होते. भारतीय स्वातंत्र्यासाठी एकीकडे लढा सुरु असताना दुसरीकडे पंढरपूर येथील मंदीर प्रवेशासाठी साने गुरुजींनी आमरण उपोषण केले होते. साने गुरुजींची सामाजिक समतेची विचारधारा असल्याने तेव्हा १९४७ च्या मे महिन्यात पंढरपूर मंदीर हरिजनांसाठी खुले झाले नाहीतर मी आमरण उपोषणास बसणार असे ठामपणे मंदीर समितीला सांगणारे आणि मंदीर प्रवेश खुला करणारे ‘खरे समतेचे पुजारी साने गुरुजी’ होते. माणसातील माणूस जागा करण्यासाठी साने गुरुजींनी चंद्रभागेच्या पात्रात जमलेल्या विशाल जनसमुदायाला विषमते विरुध्द लढण्याचा
नवा विचार दिला होता. स्वातंत्र्यपूर्व काळात १९३७ दरम्यान जळगाव जिल्ह्य़ातील अंमळनेर येथील म्युनिसिपालटीने शेतकऱ्यांना आपला शेतमाल बाजारात विकायचा असेल तर अन्यायकारक टोल आकारला जात असे. आर्थिक तूट भरून काढण्याचा अजब फतवा मिरवित लाकडी चाके असलेल्या बैलगाड्यांना टोल आकारला जात असे. अशा जाचक निर्णयाविरोधात साने गुरुजींनी तेव्हा १६ मे १९३८ रोजी शेतकऱ्यांना एकत्रित करीत मोठे आंदोलन उभारले होते. मिलमधील कामगार मालक संघर्ष असो,की शेतकरी शेतमजूर असो यांच्या प्रश्नांसाठी ‘ आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान ‘ ही विचारधारा कृतीतून दाखवून देणारे नेतृत्व साने गुरुजींचे होते. जेमतेम पन्नास वर्षाचे आयुष्य लाभलेल्या साने गुरुजींनी विनोबा भावे,मधु लिमये यांच्या सारख्या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाचा विचारही प्रमाण मानला होता. अशा विचारातून तुरुंगात असतानाही अजरामर, उत्तमोत्तम साहित्य निर्मिती साने गुरुजींनी केली. श्यामची आई, श्यामची पत्रे, सुधास पत्रे, पत्री, गोड निबंध, सोनसाखळी व इतर कथा,सती,भारतीय संस्कृती अशी अनेक पुस्तके,कथा- कादंबरी,वैचारिक,गीते,
चरित्र लेखन,अनुवादित साहित्य लेखनाचे विविध प्रकार साने गुरुजी हाताळले. साने गुरुजींचा ‘ खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे ‘ हा विचार आणि ‘ बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो ‘ अशा विचारांची आजच्या वर्तमानात अपरिहार्यता ठरते. साने गुरुजींची शंभरपेक्षा अधिक ग्रंथसंपदा आहे. कोकणातील पालगड, खान्देशातील अंमळनेर,नाशिक वर्धा ,पंढरपूर,मुंबई
अशी भ्रमंती करीत तर कधी तुरुंगवास भोगत गुरुजींचा प्रवास अखंडपणे समाजातील आर्थिक, सामजिक धार्मिक,राजकीय विषमता अन्याय विरुध्द एल्गार पुकारत असा चाललेला होता.आजच्या युवापिढीला साने गुरुजींचे मूल्यसंस्कार विचार किती महत्वाचे वाटतात यासाठी गुरुजींनी लिहिलेल्या ‘ श्यामची पत्रे’ या ग्रंथात
प्रिय वसंतास, पत्र लिहिताना साने गुरुजी लिहितात, ‘ वसंता,मी देवाची एकच प्रार्थना करीत असतो,की या देशातील तरुणांस सदबुध्दी दे.अखंड भारताचे सारे उपासक होवोत. क्षुद्र भेद नष्ट होवोत. तरुण लोक अनुदार व संकुचित न होवोत. असे पत्र तेव्हा गुरुजींनी लिहिले. आजच्या काळात हे विचार युवकांसाठी सुसंगत नव्हेतर प्रेरक ठरतात. आजची युवापिढी, त्याचे आचारविचार,जीवन शैली, जीवन शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, व्यसनांचा वाढता प्रभाव
यासह अनेक बाबतीत युवकांच्या डोळ्यात प्रकाश टाकणारे गुरुजींचे मूल्यसंस्कार विचार अपरिहार्य ठरतात,एवढे मात्र नक्कीच..
*वर्ड-ओ-वर्ड*
*निर्णय*
शेवटचा पेपर संपताच केदार घाई-घाईने परीक्षा हॉलबाहेर पडतात एक दीर्घ श्वास सोडला. सारेच पेपर त्याला अवघड गेले होते. अपेक्षित मार्क पडणारच नव्हते, ते तर दूरच पण एक-दोन विषयात आपण नापास होऊन ही भीती त्याच्या मनाला कोरू लागली होती.
आता आई-बाबांना काय उत्तर द्यायचे याच विवंचनेतच तो हॉल बाहेर स्तब्ध उभा राहिला होता.ज्यांना सर्वच पेपर चांगले गेले ते हिंदळतच हॉल बाहेर आले होते. केदारचे मात्र उलटे होते. आपण आता नापास होणार मित्र मंडळी सगळे सोयरे शेजारीपाजारी आपल्याला हसतील. त्यातच बाबांनी साऱ्या गावात, ऑफिसमध्ये त्याच्या मित्रांना सांगून ठेवले की, माझा केदार परीक्षेत नंबर वन येईल. आणि मी जर नापास झालो तर केवढा हा अपमान! आपलाच नव्हे तर त्याबरोबर आई-बाबांचा सुद्धा.
केदारच्या मनात विचाराच्या असंख्य मुंग्या वळवळ करत बाहेर पडू लागल्या होत्या. केदार भीतीने पार गांमरून गेला होता. काय करावे त्याला सुचत नव्हते. केदार हॉल मधून बाहेर पडतात त्याने शेताच्या वाटेने धुमठोकली त्याला पाहताच,तहानलेल्या गाईने हंबरडा फोडला. विहिरीतून चार- दोन बादल्या पाणी शेंदून त्याने गाई पुढे ठेवताच मोठ्या मायेने ती त्याच्या हात चाटू लागली.पण आज केदारचे कशातच लक्ष लागेना. तो गोठ्याबाहेर पडतात विहिरीच्या काठावर चिंचेच्या झाडाखाली भविष्याची चिंता घेऊन बसला. त्याचे डोळे पाणावले. अपयशाने तो पार खचून गेला होतात. आत्मविश्वासच गमावून बसला होता. मुळासकट उन्मळून पडलेल्या वृक्षासारखी त्याची गत झाली होती.
केदारला दहावीनंतर संगीत अकादमी ऍडमिशन घ्यायचे होते. ‘गायन’ हा त्याचा आवडीचा छंद होता. सुरेल आवाज निसर्गाने त्याला बहाल केलेला होता. अनेक ठिकाणी गायन स्पर्धेत त्याने भाग घेऊन बक्षिसे मिळवले होते.संगीत अकॅडमीत ऍडमिशन घेण्याचा विचारही त्यांने आई-बाबांना बोलवून दाखवला पण त्यांनी त्या साफ नकार दर्शवला होता.
त्यांना वाटत होते की, माझ्या केदारने इंजिनियर व्हावे, इंजिनीयर लोकांना कुठेही संधी उपलब्ध होतात. चीकार पैसा हाती खेळतो. त्याच्या वडिलांचे स्वप्न ते केदारवर लादत होते. केदारला स्वतःच्या भविष्याचा विचार, निर्णय घेता येत नव्हता. आपल्या भविष्याचा निर्णय दुसऱ्याने घेणे म्हणजे गुलामगिरीच होय. केदारच्या मनाविरुद्ध घडले हे सारे.
केदारने जेव्हा संगीत अकादमीत ऍडमिशन घेण्याचा विचार बोलून दाखवला, तेव्हा त्याचे आई बाबा ही त्याला विरोधक बनले. एवढेच नव्हे तर ‘अरे तू आत्ताच पोरगं तुला यातलं काय कळतं? आणि संगीतानं काय तुझं पोट भरणार आहे. गाऊन गाऊन घसा फुटला तरी तुला या खेड्यात कोण भाव देईल?’ त्याला समजून न घेता त्यांनी त्याला डिवचने सुरू केले होते.
त्याच्या वडिलांची इच्छा होती की केदारने इंजिनियर व्हावे. प्रस्थापित इंजिनिअरकडे पुण्याला एकदा त्याचे वडील कामानिमित्त गेले होते. त्यांचा बंगला, गाडीमोटार, राजवैभव पाहून त्यांनी त्याच्याजवळ विषयी काढला. की हे सारे कसे मिळवले? इंजिनिअर लोकांपुढे हे सारे गौण आहे. असे उत्तर त्यांना त्यांच्याकडून मिळाले.
इंजिनीयर लोकांची नोकरी म्हणजे घरी लक्ष्मीच पाणी भरते. असाच विचार त्यांच्या मनाला स्पर्शून गेला होता. माझ्या केदारला मी इंजिनियरच बनवेल. याच इच्छेने ते पेटून उठले होते.
केदार इंजिनियर झाला म्हणजे गाडी मोटार, बंगला, राज वैभव आपल्या पायाशी लोळण घेईल याचे ते दिव्य स्वप्न पाहू लागले होते. आपले स्वप्न ते त्या कोमल मनावर केदारवर लादू लागले होते. ‘त्यांच्या इच्छांच्या डोहळ्यांना अपेक्षाचे बांध लागले होते’. आणि हेच बाण केदारच्या कोवळ्या मनावर स्वार झाले होते.
केदारला मुळीच इंजिनिअर व्हायची इच्छा नव्हती. त्याला संगीत अकादमीत नाव कमवायचे होते. पण त्याचे स्वप्न स्वप्नातील स्वप्न होऊन गेले होते. सारे मनाविरुद्ध घडल्यामुळे त्यांच्या मनातील स्वप्नांचा चक्काचूर होऊन गेला होता. आपण आयुष्यात अपयशी ठरलो असेच त्याला वाटत होते.
आता परीक्षेत नापास झालो तर बाबा जगणारच नाही, आई तर वेडीच होईल. असेच त्याला वाटू लागताच, त्याच्या मनाच्या गहण भूमीत असंख्य टिटव्या केकाटू लागल्या होत्या.
आपले काय होणार याच विवंचनेत असताना आत्महत्येचा विचार काळ्या भुजंगासारखा फणा उगारून त्याच्या मनावर स्वार झाला. आणि जीवन संपवण्याचा निर्णय त्यांने क्षणार्धात घेतला. अनेक आठवणीचा पाझर त्याच्या काळजाला चिरु लागताच, त्याचे डोळे पाणावले.
त्या रानात कोणीही नव्हते. रान सारे सुनसान होते. गोठ्यातली गाय तेवढी अधून मधून हंबरत होती. ‘जणू काय ती केदारला आपला निर्णय बदल’ अशी सांगत होती.
पण ह्या साऱ्यांकडे लक्ष न देता केदार भंगलेले स्वप्न घेऊन विहिरीच्या काठावर उभा राहिला. विहिरीच्या पाण्यातच त्याला त्याचे प्रतिबिंब थरथरतांना दिसले. त्यात अनेक छब्या लाठावर तरंगताना दिसू लागल्या.
पुढचे पाऊल उचलणार तोच गावाच्या रस्त्याने त्याचा मित्र अशितोष धावत येताना दिसला.
त्या पाठोपाठ त्याचे बाबाही दिसले. तो थोडा मागे हटला. आशुतोष का आला असावा असा विचार करत उभा असतानाच आशुतोष दम रोखत म्हणाला, ‘अरे केदार अभिनंदन! तुझे संगीत अकादमीत गायक म्हणून निवड झाली.’
आशुतोषच्या हातातून पत्र हिसडून घेताच केदारला हसू आले. पण लगेचच तो शहरला थोडा उशीर झाला असता तर. हा केदार संपला असता. ही कल्पनासमोर येतात त्याने अशुतोषच्या गळ्यात मिठी मारली आणि ढसाढसा रडला.
बाबांनी त्याला जवळ घे डोक्यावरून हात फिरवला आणि चटकन त्यांचा निर्णय सांगून टाकला. ‘तू संगीतात नाव कमव’ बाबांचे ते शब्द त्याच्या मनावर श्रावण सरी सारखे बरसून गेले. अन झटकन मनावर स्वार झालेल्या आत्महत्येचे भूत उतरले.
त्यांने विहिरीत डोकावून पाहिले, तर त्याची छबी आता त्याच्याबरोबर हसताना डोलत होती. गोठ्यात दावणाला हिसडे देत हंबरणारी गाय सुद्धा शांतपणे रवंत करीत बसून होती.
क्षणभर त्याने साऱ्या माळरानावर नजर फिरवली अन तो घराचा रस्ता चालू लागला.
संगीतकार व्हायचा निर्णय घेऊनच..!
“सुखी व आनंदी व्हायचय?”
महोदय, खरंच या पॄथवितलावरील प्रत्येक मनुष्य जीवात्म्याला सुखी जीवन जगावेसे वाटते. परंतु समाजात वावरताना जो, तो आपापली दु:खे, लहान, मोठी संकटे इतरांना सांगत सुटतात. अशामुळे होते काय कि तो सांगणारा दु:खी असतोच, त्याचबरोबर ऐकणारयालाही दु:खी करतो.. बरे अशी दु:खे, संकटे सांगून त्यावर मात करण्यासाठी काही उपाय शोधतात काय? तर उत्तर नाही असेच मिळते, ऐकणारा केवळ ऐकून घेतो व सांगणारा दु:खाला कवटाळून बसतो. असे बरेच लोक आहेत जे साधे आजारपण आहे, जे लहान प्रापंचिक संकट आहे हे विस्ताराने सांगून स्वताला कवटाळून घेतात. अशी सारखी कवटाळलेली दु’:खे, संकटे एकदिवस रूद्र धारण करतेच, हे मानसशास्त्र आहे. यावर उपाय महणजे स्वतःच मानसिकता बदलणे, थोडे कठीण वाटते, पण जो स्वतः मानसिक परिवर्तन करेल तोच सद्या आहे त्यापेक्षा सुखी व आनंदी होईल, म्हणूनच म्हणतात की ‘ तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार’, किंवा तुझे आहे तुजपाशी. प्रथमतः मनातील नकारात्मक विचार काढून टाका व सकारात्मक विचार सरणीचा अवलंब करावा. याकरिता आपण एक उदाहरण पाहू, एक काचेचा ग्लास अर्धा पाण्याने भरलेला आहे तर तो दोघांना दाखवून प्रश्न करायचा की, या ग्लास मध्ये काय दिसते? दोघांची दोन ऊत्तर मिळतील. एक सांगेन अर्धा ग्लास रिकामा आहे, दुसरा सांगेन अर्धा ग्लास भरलेला आहे. महणजे पहिला नकारात्मक विचार करणारा, तर दुसरा सकारात्मक दृष्टीकोन असलेला आहे हे समजावे. म्हणून प्रत्येक घटनेकडे सकारात्मक दृष्टीकोन ठेवून पाहिल्यास आपणास सुख व आनंद दोन्ही मिळते. सर्वोच्च नियतीने, परमेश्वराने जे आपल्या पदरात टाकले आहे, त्याबद्दल परमेश्वराचे आभार मानले पाहिजे. कारण ही त्याची देण असून आहे तया परिस्थिती मदधे समाधान मानायचा प्रयत्न करावा. याचा अर्थ असा नाही की ‘ ठेवीले अनंते तैसेची रहावे. याचा अर्थ आपण आपल्या सोई पमाणे घेतो. म्हणून आहे तया परिस्थिती मदधे समाधान मानावे. पण पुढील प्रगतीसाठी कर्म करीत रहावे. समाजात वावरताना आजकाल जो, तो आपल्यापेक्षा मोठयांशी तुलना करताना दिसतात, आपण तयांचेसमोर काहीच नाही व परमेश्वराने मला ते दिले नाही म्हणून फार दु:खी होतात. याउलट जे आपल्याकडे आहे, त्यापेक्षा जे त्यांचेकडे नाही, किंवा कमी आहे, त्याचेशी तुलना केली तर मग आपले आपल्यालाच भरपूर समाधान व मानसिक आनंद मिळेल. अशी विचारसरणी नेहमी ठेवल्यास, मनाचा मोठेपणा व व्यापक विचार सरणी ठेवल्यास प्रत्येक दिवस सुखाचा व आनंददायी जाईल यात शंका नाही.
*आनंदाची दीपावली*
आनंद… त्यासाठी सगळा आटापिटा.आपले माणसाचे मूळ स्वरूप ते. मला वाटते तो आनंद ओळखण्याचा अनुभवण्याचा क्षण म्हणजे दिवाळी.
बाकी इतर दिवसासारखाच हा दिवस पण आपण हे चार दिवस सगळं विसरतो.. आनंदोत्सव करण्यासाठी. ही तेजाची रांग प्रज्वलित करणं म्हणजे खरी दिवाळी. बद्ध, असंबद्ध,मख्ख चेहऱ्याने नाही हा आनंद घेता येणार. मेरे साई के होतो मे जादुका पानी.. दीपावली.. ती ही दिवाळी. शुभ,चांगले, उत्तम, असे जेजे त्याने उजळवणे स्वतःला,कुटुंबाला व समाजाला. दिवाळी सण तेंव्हाच होऊ शकतो. आनंदाने उधाण येईल असे स्वतःला. तमातून तेजाकडे जाण्यापूर्वी गंभीरतेतून हसऱ्या चेहऱ्याकडे आपली वाटचाल व्हायला हवी.
साधुसंत त्यामुळेच म्हणतात आम्हा घरी नित्य दिवाळी. कारण ते आनंदस्वरूप असतात.
स्वतः ओढवून घेतलेला ढोंगीपणा थोडा दूर केला तर खरी फुलबाजी फुलतील. घरावर प्रामाणिक तेचा आकाशकंदील सर्वाना प्रकाश देऊन सांगेल ही या घराची प्रामाणिक पणाने मिळवलेली संपदा आहे. सर्वांच्या नजरा ह्याच शुभेच्छा बनतील. प्रत्येकाने प्रत्येकाशी वागणे बोलणे हेच शब्दांचीच रत्ने होतील.
सण ही केवळ चार दिवसाची ओपचरिकता नाही तर संधी आहे . जगणं समृद्ध करण्याची. काही रक्ताची काही रक्तपेक्षाही घट्ट नाती निर्माण करण्याची. हातात हात घेऊन भिऊ नकोस म्हणून समर्थ साद देण्याची.
सहजपणा खूप मावळत चाललाय. एखादा चित्रपट संपला तशी दिवाळी संपू नये. वर्षभर पुरतील एवढ्या आठवणीचा फराळ या दिवाळीत बनवू या.
चला या दिवाळीला थोडं हसू या . थोडं जवळ बसूया आणि जरा मिळून सगळे हसू या. कितीतरी वर्षापासून हा दिवाळी सण साजरा होतोय दिवाळी म्हणजे आनंदाचा उत्सव . सगळ्या अर्थाने अध्यात्मिक ,सामाजिक ,कौटुंबिक या सगळ्या अर्थाने आनंद उपभोगण्याचा हा सण . या तीन-चार दिवसात वर्षभराच्या त्रासातून ,दुःखातून दूर येऊन एक समाधान पावणारा हा क्षण . चला जरा बसूया आपण सगळे मिळून थोडसं दिवाळीला या दिवाळीला. असं काही करता येईल का, की जे चार दिवसाचं हसणं आपल्याला वर्षभर पुरेल. अशा काही आठवणी आपल्याला आपल्याला आप्तेष्टांच्या सहवासात मिळवता येतील का? ती खरी दिवाळी असं मला वाटतं. मला वाटतं सुख म्हणजे नक्की काय असतं तर तर दुःख विसरायचा क्षण म्हणजे सुख. सुख पाहता जवा पाडे । असं संत म्हणतात दिवाळीत असं काही करता येईल का! आनंदाची फुलबाजी उडवता येतील का घरोघरी. हास्याचा कल्लोळ अनुभवता येईल का, हसण्या मधून एक सहजता येते , सहजतेतून अनौपचारिक निर्माण होते व त्यातून प्रेम पाझरतं व नात्यांची एक सुंदर वीण निर्माण होते . दिवाळीमध्ये असे काही अनमोल क्षण टिपता येतील का? टिपता येतील का जे पुढच्या दिवाळीपर्यंत पुढच्या दीपावली पर्यंत पर्यंत आपला आनंद टिकून टिकवून ठेवतील खरंतर आनंदासाठी फारसं काही लागत नाही लागत नाही . लागतं लागतं ते केवळ एक स्वच्छ मन . अशी नात्यांची नात्यांची सुंदर सुंदर तोरण बांधता येतील का घराघरावर प्रत्येकाच्या .मोबाईल वरील वरील फ्रेंड प्रत्यक्षात समोर येतील का व हातात हात घेऊन खळखळून हसतील बोलतील तेव्हा येणारी मिठास कायम अमृताची गोडी देईल ज्यानेआनंदाचे झरे पाझरतील . चुकले माझे म्हणून करूया मोकळे स्वतःला. अगदी मोकळ्या मनाने मोकळ्या मनाने हातात हात घेऊन डोळ्यातून वाहता येईल काय ? एकमेकांना स्वच्छ सुंदर होण्यासाठी मनातील द्वेष राग असूया यांना जाळून टाकता येईल काय रावण दहनासारखे . अंगावरील साचलेला संशयाचा मळ स्वतःलाच दुर्गंधी देत आहे. त्यामुळे सतत नैराश्य दिसते चेहऱ्यावर. प्रांजळ पणाचे उटणे लावून काढता येतील का ही पुट चढलेली अंगावर व मनावरची. जिभेची चवच गेलीय जणू खाऊन खाऊन. ज्यांना खायलाच मिळत नाही त्यांना काही देता येईल का, ती मूल खाताना पहा कशी आपल्या जिभेला गोडी येई अमृताची. फटाक्याच्या धूर श्रीमंतीचा धूर दाखवत आहे. आपण एकटेच कधी सुखी असू शकत नाहीत. कधी दिन दुबल्याच्या चेहऱ्यावर हसू आणता येईल काय.
हसणं म्हणजे केवळ आनंद देण घेणं.
ज्यांना काही कळतच नाही असा अंधार घरोघरी मातलाय जो तो स्वतः चे घर सोडून जग सुधारायला निघालाय. आपल्या घराला घरपण देता येईल का या दिवाळीला. तुळशीवृंदावन व देवघरातील वात शांत रसात तेवेल काय . देवघरातील देवांनाही समाधान वाटेल असे काही करता येईल का या दिवाळीला. आयुष्यभर आई बाप मुले नातेवाईक मोठी झाली की कधी स्पर्श ही करत नाहीत. एकमेकांना कधी . स्पर्शातून नाती व्यक्त होतील काय . आई मुलांना व्हॉट्सअपवर घरात शुभेच्छा देते व मुलगा आईला. केवढा हा अंधार.
हातात हात घेऊन अंतःकरणातील दिवे स्वयंप्रकाशित करू या. चौकटीच्या मध्येच पण चौकटीतून बाहेर येऊ या. सहज विनाकारण स्माईल देऊ या, दिवाळीची आठवण म्हणून ओळख म्हणून. तेच भेटकार्ड देऊ प्रत्येकाला या वर्षी. जो हसला त्याच्याच घरी खरी दीपावली असे समजू या. संत तरुण सागर महाराज म्हणाले होते,
हसना पुण्य है । हसाना परमपुण्य है ।
दिवाळीच्या या पुण्यपर्वात सामील होऊ या. बघा तर खर चार दिवसांची दिवाळी पण लख्ख उजळून टाकील सगळ्यांना आतून बाहेरून. आपल्या चेहऱ्यावरून म्हणलं पाहिजे जगाने
” चला चला दिवाळी आली ” असं काही करता येईल का, होता येईल का ?
सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.या बातम्या आपण फेसबुक,इन्स्टाग्राम,व्हाट्सएप चॅनलवर देखील पाहू शकता. -दिलीप पोहनेरकर-9422219172