रावसाहेब तुम्ही श्रीकृष्ण !अर्जुनाचा रथ विधानसभेत पाठवा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
जालना- “रावसाहेब दानवे तुम्ही श्रीकृष्ण आहात, भक्तांकडे पाहत नाहीत परंतु आता या अर्जुनाचा रथ विधानसभेत पाठवा” असे आवाहन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रावसाहेब दानवे यांना केले आहे . जालना विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार अर्जुन खोतकर यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते सोमवारी रात्री बोलत होते. जालना शहरातील आझाद मैदान हे अनेक दिग्गजांच्या सभेचे आणि जय पराजयाची साक्ष देणारे मैदान आहे. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून या मैदानावर अशी राजकीय सभा झालीच नाही आणि आज जी झाली ती सुमारे पंधरा वर्षांपूर्वी झालेल्या माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी, हिंदु हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या सभांची आठवण करून देणारी ठरली. जनतेने खचाखच हे मैदान भरलेले दिसले. निवडणुका जवळ आल्या की अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्या मधून विस्तव आडवा जात नाही परंतु मतदानाच्या काही दिवस अगोदर यांच्यामध्ये पुन्हा दिल जमाई होते आणि दोघेही गळाभेटी घेऊन एकाच व्यासपीठावर एक दुसऱ्याचे गुणगान गायला लागतात .हीच परिस्थिती यावेळी देखील पाहायला मिळाली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घनसावंगी विधानसभा मतदारसंघात देखील सभा पार पडली या विधानसभेचे शिवसेनेचे उमेदवार हिकमत उढाण यांच्यासाठी या प्रचार सभेचे आयोजन केले होते. भाजपामधून बंडखोरी केलेले सतीश घाटगे आणि विद्यमान आमदार राजेश टोपे या दोघांसोबत हिकमत उढाण यांचा सामना होणार आहे.
सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.या बातम्या आपण फेसबुक,इन्स्टाग्राम,व्हाट्सएप चॅनलवर देखील पाहू शकता.
-दिलीप पोहनेरकर-9422219172