Advertisment
Jalna Districtजालना जिल्हा

वंदनीय साने गुरुजी यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षानिमित्त बालकुमारांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन

जालना : वंदनीय साने गुरुजी यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षानिमित्त अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था पुणे शाखा जालना आणि मानस फाऊंडेशन जालना यांच्या संयुक्त सहकार्याने बालदिनापासून बालकुमारांसाठी वाचन संवाद, बालकुमार साहित्य संमेलन, निबंध – चित्रकला स्पर्धा,पुरस्कार यासह मानसिक आरोग्य समुपदेशन जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत, बालदिनी मुलांना पुस्तके भेट देऊन कार्यक्रमाचा प्रारंभ मानसोपचारतज्ज्ञ डॉ.प्रकाश आंबेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला,

‘करील मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभूशी तयाचे ‘ अशी शिकवण देणारे साने गुरुजी यांचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्ष सुरु आहे. गुरुजींचे मूल्यसंस्कार विचार शालेय विद्यार्थ्याना समजावे यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी बालकुमार साहित्य संस्था पुणे शाखा जालना आणि मानस फाऊंडेशन आयोजित कार्यक्रमाचा प्रारंभ बालदिनापासून करण्यात आला आहे. जिल्हा क्रीडा संकुल येथील मैदानावर पार पडलेल्या कार्यक्रमाचे उदघाटन मानस फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ.प्रकाश आंबेकर यांच्या हस्ते करण्यात आले होते.
कार्यक्रमास मराठी बालकुमार साहित्य संस्था जालना शाखेचे कोषाध्यक्ष संतोष लिंगायत, मुख्याध्यापक ईश्वर वाघ,मानस फाऊंडेशनचे सतीश खरटमल, कवी- कथाकार डाॅ.प्रभाकर शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती.


बालकुमारांसाठी निबंध व चित्रकला स्पर्धेचे आयोजन शाळांमधून करण्यात येणार आहे. डिसेंबर महिन्यात मराठवाडा विभागीय पातळीवर स्व.दत्तात्रय हेलसकर स्मृती विद्यार्थी कथाकथन स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. जिल्ह्यातील बालकुमारांच्या लेखनीला अधिक प्रेरणा मिळावी यासाठी ‘ बालकुमार साहित्य संमेलन ‘ आयोजन करण्यात येणार आहे. साने गुरुजी शतकोत्तर रौप्य महोत्सव जयंती वर्षानिमित्त विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांचे ‘ शिक्षकांसाठी साने गुरुजी ‘ या शिक्षकासाठीच विशेष व्याख्यानाचे आयोजन मानस फाऊंडेशन आणि मराठी बालकुमार साहित्य संस्थेतर्फे करण्यात येणार आहे. किशोरवयीन मुलांमधील मानसिक समस्याविषयक निराकरण व मानसिक आरोग्य जनजागृतीपर समुपदेशन शिबिराचे आयोजन शाळांमधून करण्यात येणार आहे. शालेय विद्यार्थ्याना प्रेरक गीतातून आत्मविश्वास जागृत व्हावा,प्रेरणा मिळावी यासाठी संगीत संयोजक गजानन गोंदीकर निर्मित ‘ माझ्या आनंद लोकात ‘ या गीत- संगीतमय कार्यक्रमाची निर्मित करण्यात आली असून बालकुमार गायक,वादक यांचा कलाविष्कार सादर करण्यात येणार आहे. शैक्षणिक, सामाजिक यासह साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीचा स्व.दत्तात्रय हेलसकर स्मृती राज्यस्तरीय पुरस्कार, शोध पत्रकारितेसाठी स्व. गणेशराव जळगावकर स्मृती पुरस्कार तसेच बालसाहित्यासाठीचा स्व.शिरीष देशमुख स्मृती राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार यंदाच्या वर्षापासून सुरु करण्यात येणार असल्याचे डॉ. सुहास सदाव्रते यांनी सांगितले.
========
सध्याची परिस्थिती पाहता किशोरवयीन मुलांमधील बदलाने पालकवर्गात चिंता असते. मुलांचे जसे शारीरिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी प्रयत्न होतात,तसे मानसिक आरोग्य सक्षम होण्यासाठी मानस फाऊंडेशनने विशेष कृती कार्यक्रम हाती घेतला आहे.
-डाॅ.प्रकाश आंबेकर
मानसोपचारतज्ज्ञ तथा अध्यक्ष मानस फाऊंडेशन
==========

आजच्या पिढीला मूल्यसंस्कार विचार देण्यासाठी साने गुरुजींचे साहित्य अपरिहार्य ठरते. मुलांच्या कलाकौशल्याला वाव मिळावा,यासाठी दरवर्षी हेलस साने गुरुजी कथामाला आणि मानस फाऊंडेशन यांच्यातर्फे मराठवाडा विभागीय पातळीवर विद्यार्थी कथाकथन स्पर्धाचे आयोजन करण्यात येते.
-कल्पना दत्तात्रय हेलसकर
अध्यक्षा, हेलस साने गुरुजी कथामाला.
======


बालमित्रांनो, मन समृद्ध ठेवा.. जग जिंकता येईल!- डॉ.प्रकाश आंबेकर

जालना : आजचे तंत्रज्ञान आणि डिजिटल युगात मन समृद्ध ठेवायचे असेल तर व्यायामासह पुस्तके वाचली पाहिजे. मनाची हिंमत ठेवण्यासाठी चांगले आचार विचार आणि सवयी मुलांनी जपल्या पाहिजे. बालमित्रांनो, मन समृद्ध ठेवा..तुम्हाला जग जिंकता येईल, असा सल्ला प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ तथा मानस हॉस्पीटलचे प्रमुख डाॅ.प्रकाश आंबेकर यांनी विद्यार्थ्यांना बालदिनी आयोजित कार्यक्रमात दिला..

शहरातील जिल्हा क्रीडा संकुलात अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था पुणे शाखा जालना आणि मानस फाऊंडेशन यांच्यातर्फे बालदिन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. संस्कार प्रबोधिनी विद्यालयातर्फे शिवकालीन युद्ध कला प्रशिक्षण शिबिरातील सहभागी बालकुमारांचा बालदिनी गुलाबपुष्प आणि पुस्तक देवून सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात बोलताना मानसोपचारतज्ज्ञ डॉ.प्रकाश आंबेकर म्हणाले, की मुलांनी पुस्तके वाचून आपल्या शिवकालीन शौर्य आणि पराक्रमाचा इतिहास समजून घेतला पाहिजे. मुलांनी नेहमी चांगले विचार, चांगली सवय आणि चांगले वागणे जाणीवपूर्वक ठेवले पाहिजे. मुलांनी अभ्यास तर करावा परंतु कुठले ना कुठले छंद आणि कलाही जोपासली पाहिजे. जीवनात जर यशाचे शिखर गाठायचे असेल तर मन समृद्ध करा आणि कला,सामर्थ्य अन तंत्रज्ञानाची कास धरावी तेव्हाच जग जिंकता येईल, असा सल्लाही डाॅ.आंबेकर यांनी दिला. कार्यक्रमात मराठी बालकुमार साहित्य संस्था जालना शाखेचे अध्यक्ष डाॅ.सुहास सदाव्रते यांनी बालकुमार साहित्य संस्था आणि मानस फाऊंडेशन यांच्यावतीने घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाचा प्रारंभ करण्याची भूमिका विशद केली. कार्यक्रमात बालकुमारांना विचारवंत यदुनाथ थत्ते यांचे साने गुरुजी हे पुस्तक, बाल साहित्यिक माधव राजगुरु यांचे ‘ मराठी शुध्दलेखन ‘ ,कवयित्री आरती सदाव्रते यांचे ‘ मनांगण ‘ , कवी डाॅ.प्रभाकर शेळके यांचा बालकथासंग्रह, दिव्यांग कवी आकाश देशमुख यांचा ‘ श्वास कविता ध्यास कविता ‘ हा कवितासंग्रह अशी पुस्तके आणि गुलाबपुष्प देवून बालकुमारांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमात शिवकालीन युद्ध कला शिबिराचे प्रशिक्षक शरद पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमास शिवकालीन युद्ध कला प्रशिक्षण शिबिरातील सहभागी शिबिरार्थी, पालकांची उपस्थिती होती.
=/===

सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.या बातम्या आपण फेसबुक,इन्स्टाग्राम,व्हाट्सएप चॅनलवर देखील पाहू शकता.
-दिलीप पोहनेरकर-9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button