मतदान करून घरी परतणाऱ्या सेवानिवृत्त बँक अधिकाऱ्याचा खून
अंबड- तालुक्यातील शिराढोण येथील मूळचे रहिवासी असलेले मच्छिंद्र गंगाधर सपकाळ यांचा काल दिनांक 20 रोजी रात्री सात ते अकरा वाजेच्या दरम्यान आडनामध्ये धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. याप्रकरणी मयताच्या मुलगा गणेश मच्छिंद्र सपकाळ यांनी दिलेल्या तक्रारीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सु स्वभावी आणि कोणाशीही वैर नसलेलं व्यक्तिमत्व म्हणून ते गावात परिचित असल्याचेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे हा खून नेमका कशासाठी झाला याचा तपास करण्याचे आव्हान पोलीस यंत्रणेसमोर आहे.
मयत मच्छिंद्र गंगाधर सपकाळ हे एका सहकारी बँकेमध्ये रोखपाल म्हणून काम करत होते आणि आता ते सेवानिवृत्त झालेले आहेत. अंबड पासून सुमारे दहा किलोमीटरवर त्यांचे मूळ गाव शिराढोण हे आहे आणि राहण्यासाठी ते आपल्या परिवारासह अंबड येथील नूतन वसाहत भागात राहतात. नेहमीप्रमाणेच ते अंबड ते शिराढोण हे दुचाकीवरून प्रवास करतात. काल सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास त्यांनी शिराढोण येथे मतदान केले आणि अंबड शहराकडे निघाले होते. परंतु ते घरी पोहोचलेच नाहीत. त्यामुळे सर्वत्र शोधाशोध सुरू झाल्यानंतर मुख्य रस्ता सोडून नेहमीच्या शेतातील रस्त्याने ते अंबडला येत होते त्या रस्त्यामध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला. लाकडाच्या दांड्याने आणि धारदार शस्त्राने चेहरा विद्रूप करण्यात आला होता. याप्रकरणी अंबड पोलिसांनी मृतदेहाची उत्तरिय तपासणी करून अंत्यविधीसाठी मृतदेह नातेवाईकांच्या हवाली केला आहे .दरम्यान घटनास्थळी श्वान पथकाला प्राचारण करण्यात आले होते. परंतु घटनास्थळावरून दोन्ही बाजूला सुमारे एक ते दीड किलोमीटर त्यांचा मार्ग बंद झाला .त्यामुळे कदाचित हल्लेखोर हे दुचाकीवरून आले असावेत आणि झाडाखाली दबा धरून बसल्यानंतर शिराढोण कडून येणाऱ्या मच्छिंद्र सपकाळ यांच्यावर वार केले असावेत असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
घटनास्थळाची अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अंबडचे उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे, पोलीस निरीक्षक सतीश जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांची टीम, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गुरले, पोलीस उपनिरीक्षक भगवान नरोडे यांच्यासह पोलिस अंमलदार संजय क्षीरसागर, भरत कचरे, विनोद भानुसे आदी घटनास्थळावर होते.
सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.या बातम्या आपण फेसबुक,इन्स्टाग्राम,व्हाट्सएप चॅनलवर देखील पाहू शकता.
-दिलीप पोहनेरकर-9422219172