कोविडचा फटका; भावी डॉक्टरांच्या अभ्यासक्रमासाठी उसने मृतदेह !; किती लागणार दरवर्षी मृतदेह पहा?

जालना- कोविडच्या 2021 ते 2023 या कालखंडामध्ये मृतदेहांचे ढीगच्या ढीग लागलेले होते. अंत्यविधीसाठी देखील प्रतीक्षा करावी लागत होती . त्याच कोविडमुळे भावी डॉक्टरांना अभ्यासासाठी उसने मृतदेह आणण्याची वेळ आली आहे. एवढेच नव्हे तर डॉक्टर होणाऱ्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रमाच मानवी शरीराच्या हातापासून सुरू होतो त्यामुळे जर पूर्ण मृतदेह नाही मिळाला तर एका हातापासून अभ्यासक्रमाला सुरुवात करण्याची वेळ आली आहे. सामान्य वेळी एखाद्या माणसाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा अंत्यविधी आपण बारा तासाच्या आसपास करतो. परंतु डॉक्टर होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मात्र एक मृतदेह वर्षभर अभ्यासक्रमासाठी वापरला जातो आणि हा मृतदेह दहा विद्यार्थ्यांमध्ये असतो. एकीकडे कोविडमुळे घटलेले मृतदेह आणि दुसरीकडे चालू वर्षापासून वैद्यकीय महाविद्यालयांची वाढलेली संख्या या विरोधाभासामुळे आता अशी महाविद्यालये पोलीस प्रशासनाशी संपर्क साधून बेवारस मृतदेह मिळविण्यासाठी आणि सामान्य नागरिकांना देहदान करण्यासाठी जनजागृती करण्याच्या तयारीत आहेत.
जालना जिल्ह्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय दिनांक एक नोव्हेंबर 2024 पासून सुरू झाले आहे. शंभर विद्यार्थी प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमाला आहेत. या अभ्यासक्रमाची सुरुवातच चार विषयांमध्ये सुरू होते त्यापैकी पहिली शरीर रचना, शरीर क्रिया, जीव रसायनशास्त्र, आणि चौथे जन औषधी वैद्यक शास्त्र. त्यामुळे पहिल्याच वर्षी पहिल्याच अभ्यासक्रमाला शरीर रचना हा विषय असल्यामुळे मानवी शरीराची रचना आणि त्याची क्रिया जाणून घेण्यासाठी मृतदेहाची आवश्यकता असते. दहा विद्यार्थ्यांमध्ये एक मृतदेह दिला जातो. विशेष म्हणजे या मृतदेहावर अशी काही प्रक्रिया केली जाते की तो मृतदेह पूर्ण वर्षभर हे विद्यार्थी वेगवेगळे प्रयोग आणि अभ्यास करण्यासाठी वापरतात. असे मृतदेह ठेवण्यासाठी विशिष्ट पद्धत आहे आणि कायदेशीर बाबी देखील तपासून पाहाव्या लागतात. त्यासाठी शासनाच्या वतीने नुकतीच तीन सदस्यांची एक समिती येऊन गेली आहे आणि त्यांनी त्यांचा अहवाल शासनाला सादर केला आहे. या अहवालामध्ये मृतदेहाचे श्रविच्छेदन ,परिवहन ,जतन आणि निरलेखन म्हणजेच विल्हेवाट या पाच बाबींचा समावेश असतो .या बाबींची पूर्तता केल्यानंतर विद्यार्थ्यांना मृतदेह उपलब्ध करून दिली जातात. तूर्तास जालना येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात या बाबींची पूर्तता करण्याची प्रक्रिया सुरू असल्यामुळे सध्या छत्रपती संभाजी नगर आणि परभणी येथून मृतदेह आणून अभ्यासक्रम सुरू आहे. परंतु लवकरच इथे मृतदेह ठेवण्याची परवानगी मिळाल्यानंतर जालना महाविद्यालयाला देखील दरवर्षी दहा मृतदेहांची व्यवस्था करावी लागणार आहे आणि अद्याप पर्यंत देह दानासाठी नागरिक म्हणावे तसे जागृत झाले नाहीत .त्यामुळे अनेक वेळा बेवारस मृतदेहांची विल्हेवाट पोलीस लावतात ती विल्हेवाट न लावता तो मृतदेह विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाला मिळविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
एकूणच मागील महिनाभरापासून जालना शहरात सुरू झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबद्दल अधिष्ठाता डॉ. सुधीर चौधरी यांनी आढावा सांगताना सांगितले की अधिष्ठाताच्या नावावर 26 एकर जागा शासनाने केली आहे आणि केंद्र शासनाची उप कंपनी असलेल्या ब्रिज अँड रूप यांना व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्त केले आहे. त्यानुसार निविदा जाहीर करण्यात आली आहे आणि अहमदाबाद येथील यशानंद कन्स्ट्रक्शन कंपनीला हे काम मिळाले आहे. 403 कोटी 89 लाख रुपयांची ही निविदा आहे तीन महिन्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. त्यासोबत विद्यार्थ्यांसाठी लागणाऱ्या मृतदेहाबद्दल शरीर रचना शास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. प्रतिमा कुलकर्णी यांनी देखील सविस्तर माहिती दिली आहे.
सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.या बातम्या आपण फेसबुक,इन्स्टाग्राम,व्हाट्सएप चॅनलवर देखील पाहू शकता.
-दिलीप पोहनेरकर-9422219172