Advertisment
Jalna Districtजालना जिल्हा

जिल्हाधिकाऱ्यांवर नामुष्की आणलेल्या ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकाला जि.प.ने दिले”पदोन्नतीचे बक्षीस”

जालना- मंठा तालुक्यातील पांगरी खुर्द येथील एका शेतकऱ्याने ग्रामपंचायतच्या मनमानी कारभाराची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने वारंवार सुनावण्याही झाल्या. परंतु वेळेच्या आत जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय दिला नाही त्यामुळे या शेतकऱ्याला न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागला आणि न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांना 101 रुपये दंड ठोठावला. या ग्रामपंचायतच्या सरपंच आणि ग्रामसेवकाच्या मनमानी कारभारामुळे जिल्हाधिकाऱ्यांवर नामुष्की ओढवली होती. अशा परिस्थितीत जिल्हा परिषदेने या ग्रामसेवकाची चौकशी करणे, गावातील विकास कामांची चौकशी करणे अपेक्षित असताना या ग्रामसेवकाला ग्राम विस्तार अधिकारी म्हणून पदोन्नती दिली आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना ज्या ग्रामसेवकांमुळे नामुष्कीला सामोरे जावे लागले त्या ग्रामसेवकाला हे प्रकरण चालू असताना सहा महिन्यापूर्वी पदोन्नती देऊन जिल्हा परिषदेने एक प्रकारे जिल्हा अधिकाऱ्यांच्या जखमेवर मीठच चोळले आहे.

पांगरी खुर्द येथील शेतकरी नारायण काळे यांनी ग्रामपंचायतीने ग्रामसभा आणि मासिक सभा घेतल्या नसल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. या तक्रारीचा निकाल लागला नाही म्हणून त्यांनी न्यायालयात धाव घेतली आणि ग्रामपंचायत ने जे अहवाल न्यायालयात सादर केले त्या अहवालामध्ये सदस्यांच्या खोट्यासह वापरल्याचा आरोपही नारायण काळे यांनी केला होता. तसेच ज्या ग्रामसभा घेतल्या आहेत त्या अंगणवाडी सेविका आणि शाळेच्या मुख्याध्यापकांनी घेतल्या आहेत असे देखील न्यायालयाचे निदर्शनास आणून दिलं होतं . दरम्यान दिनांक 24 जानेवारी 2023 रोजी न्यायालयात ग्रामपंचायतीने सादर केलेल्या अजेंड्यावर शामराव पुना राठोड यांची स्वाक्षरी आहे .परंतु ही स्वाक्षरी बनावट आहे आणि मी केलेली नाही, ती कोणी केली माहित नाही असा खुलासा शामराव पुना राठोड यांनी केला आहे. तसेच या अजेंडावर केवळ सरपंचाची सही आहे. ग्रामसेवकाची सही नाही  या अजेंड्याला अधिकृत आवश्यक असलेला गोल शिक्का देखील ग्रामपंचायत च्या वतीने ठसवण्यात आला आहे. त्यामुळे हा अजेंडाच न्यायालयात खोटा सादर केल्या की काय? अशी शंकाही उत्पन्न होत आहे . या सर्व प्रकाराची चौकशी करण्यासाठी ग्राम विस्तार अधिकारी बी.बी. चव्हाण हे आज दिनांक सात रोजी पांगरी खुर्द येथील ग्रामपंचायत कार्यालयात चौकशीसाठी आले होते. या चौकशी दरम्यान ग्रामसेवकाने देखील काळे यांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने दप्तर उपलब्ध नसल्याचे लेखी उत्तर विस्ताराधिकाऱ्याला दिले आहे. त्यामुळे काळे यांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य असल्याचे सध्या तरी दिसून येत आहे .ज्यावेळी विद्यमान ग्रामसेवकाने दप्तर हाती घेतले ते दप्तर घेतानाचा अहवाल लवकरच गट विकास अधिकाऱ्यांना(BDO) सादर केल्या जाणार आहे आणि त्यानंतर पुन्हा या ग्रामपंचायतीच्या चौकशीचे गुऱ्हाळ सुरू होणार आहे तूर्तास तरी  ज्या ग्रामसेवकाच्या कार्यकाळात हा सगळा गोंधळ झाला त्या ग्रामसेवकाला जिल्हा परिषदेने विस्तार अधिकारी या पदावर पदोन्नती देऊन बक्षीस दिले आहे. गटविकास अधिकारी आता या ग्राम विस्तार अधिकाऱ्यावर काय कारवाई करतात? ते लवकरच पाहायला मिळणार आहे. ग्रामपंचायतच्या निवडणुकांना अवघे सहा महिने बाकी असतानाच जिल्हा परिषद हे प्रकरण कशा पद्धतीने हाताळते याकडे आता गावकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे.

सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.या बातम्या आपण फेसबुक,इन्स्टाग्राम,व्हाट्सएप चॅनलवर देखील पाहू शकता.
-दिलीप पोहनेरकर-9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button