15 कोटींच्या इमारतीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला ताबा; आता पालकमंत्र्यांसाठी खुर्ची सोडण्याची गरज नाही

जालना- गेल्या नऊ वर्षांपासून सुरू असलेले “नियोजन भवन “म्हणजेच जिल्हाधिकारी कार्यालयाची नूतन इमारत अखेर पूर्णत्वास गेली आहे . काल दिनांक 15 जानेवारीपासून जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी या इमारतीचा ताबा घेतला आहे आणि आज दिनांक 16 रोजी मानव विकास मिशनची पहिली बैठक या इमारतीच्या सभागृहात पार पडली.
दरम्यान आत्तापर्यंत ही इमारत पूर्ण होण्यासाठी 2016 मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी मंजूर देऊन पाया रोवला, त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ.रवींद्र बिनवडे यांनी या इमारतीचा पाया पूर्ण केला. परंतु त्यानंतर आलेल्या कोविड काळामुळे या इमारतीचे काम थांबले होते. त्याला पुन्हा नव्या जोमाने सुरू करण्याची ताकद तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिली आणि ही इमारत पूर्ण करण्याची जबाबदारी विद्यमान जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी घेतली आणि ती पूर्णत्वास नेली त्यामुळे आज या भव्य दिव्य इमारतीमध्ये स्थलांतर करण्याचा मान डॉ.पांचाळ याना मिळाला आहे. 26 जानेवारी रोजी होणारा गणराज्य दिनाचा ध्वजारोहण समारंभ देखील या नवीन इमारतीसमोर होणार आहे. हनुमानाच्या शेपटी सारखा या इमारतीचा खर्च वाढत गेला आणि मूळ खर्च जो 2016 मध्ये साडेसहा कोटींचा होता तो इमारत पूर्णत्वास जाईपर्यंत 15 कोटी पर्यंत पोहोचला आहे.
नवीन इमारतीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी गेल्यानंतर तुम्हाला तुमचा इतिहास आठवणार आहे. कारण जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाच्या बाहेरच भव्य अशा स्वरूपाची इतिहास लिहिलेली कोरीव अक्षरे लावण्यात आली आहेत. निजामाच्या जुलमी राजवटीमधून मराठवाड्याला मुक्त करण्यासाठी ज्या स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली अशा स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृतीला या चित्रांच्या माध्यमातून उजाळा देण्यात आला आहे. सर्व सोयींनी युक्त अशी ही इमारत आहे. या इमारतीमध्ये आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कामासाठी बाहेरगावावरून आलेल्या स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे जुन्या इमारतीमध्ये जिल्हाधिकारी आणि लोकप्रतिनिधी म्हणजेच पालकमंत्री किंवा इतर मंत्री आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना आपली खुर्ची सोडावी लागत होती. परंतु आता पालकमंत्री आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना आपली खुर्ची सोडण्याची गरज नाही कारण पालकमंत्र्यांसाठी स्वतंत्र दालन आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र बसण्याची व्यवस्था येथे करण्यात आली आहे .यासंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी.
अधिक माहिती वाचा …
डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, इकिंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.या बातम्या आपण फेसबुक,इन्स्टाग्राम,व्हाट्सएप चॅनलवर देखील पाहू शकता.
-दिलीप पोहनेरकर-9422219172