Advertisment
Jalna Districtजालना जिल्हाराज्य

विशेष बातमी;राजकीय रागलोभ आणि सत्तांतराच्या कचाट्यात सापडलेला जालन्याचा ड्रायपोर्ट मार्च अखेर होणार सुरू!

जालना- जालना जिल्ह्यालाच नव्हे तर मराठवाड्याला विकासाकडे घेऊन जाणारे महत्त्वकांक्षी प्रकल्प जालन्यात सन 2018 मध्ये आणले होते. तत्कालीन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जालना शहरात रसायन तंत्रज्ञान संस्था म्हणजेच( इंडियन केमिकल कॉलेज,ICT), ड्राय पोर्ट थोडक्यात रेल्वेची मालवाहतूकJNPT, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट), आणि रेल्वेची पीट लाईन, म्हणजेच लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या ज्या ठिकाणाहून सुटतात त्या ठिकाणी करण्यात येणारी देखभाल दुरुस्ती. त्यापैकीच ड्रायपोर्ट हा एक प्रकल्प. 2018 मध्ये या प्रकल्पाची घोषणा झाल्यानंतर कामही जलद गतीने सुरू झाले होते परंतु… त्यानंतर ते रखडले.  हे काम पुन्हा जलद गतीने सुरू करावे म्हणून जालन्यातील काही उद्योजक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लातूर येथील कार्यक्रमात जाऊन भेटले आणि त्यानंतर सुरू झाले ते राग -लोभ, त्यामुळे कांही दिवस हे काम रखडले आणि त्याकडे लक्ष दिले गेले नाही. त्यानंतर आल्या निवडणुका यामध्ये झाले सत्तांतर त्यामुळे पुन्हा हा प्रकल्प रखडला होता. या प्रकल्पाचा महत्त्वाचा भाग हा केंद्र सरकारकडे आहे. केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून खासदारांनी या कामावर लक्ष देणे अपेक्षित होते. परंतु 2024 मध्ये निवडून आलेले काँग्रेसचे खासदार डॉ. कल्याण काळे यांना मात्र या प्रकरणात लक्ष घालायला अद्याप वेळच मिळाला नाही. त्यामुळे देखील हा प्रकल्प रखडला.

शेवटी आता पूर्वी काम करणाऱ्या दोन कंपन्या मिळून तिसरी एक कंपनी स्थापन झाली आहे आणि प्रत्यक्ष काम करणाऱ्या या तिसऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी गुरुवार दिनांक 16 रोजी बैठक घेऊन सर्व बाबींचा आढावा घेतला आहे. या बैठकीला नॅशनल हायवे लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेड चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश गौर ,विभागीय अधिकारी रवींद्र गुप्ता, सल्लागार अभिजीत विश्वास, प्रकल्प अधिकारी विकास मलिक, सहाय्यक शिरीष तले, जालनाच्या तहसीलदार श्रीमती छाया पवार, तालुका भूमी निरीक्षक यांची उपस्थिती होती. यावेळी मार्च अखेरपर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे ध्येय ठरविण्यात आले आहे.

एकूण 425 एकर मध्ये हे ड्रायपोर्ट उभे राहणार आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यामध्ये सध्या 65 एकर मध्ये काम सुरू आहे .हे काम मार्च अखेर पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष मालवाहू रेल्वे गाड्या सुरू होतील आणि त्यानंतर दुसऱ्या टप्प्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. आजच्या परिस्थितीमध्ये इथे रेल्वे विभागाकडे असणारे काम 90% पूर्णत्वास गेलेले आहे. उर्वरित दहा टक्के काम हे या कंपनीने रेल्वे प्रशासनाला विद्युत पुरवठा पुरवल्यानंतर दहा ते पंधरा दिवसात हे काम पूर्ण होऊ शकते. त्यामुळे आता  नॅशनल हायवे लॉजिस्टिक मॅनेजमेंट कंपनी समोर रेल्वेला वीजपुरवठा करणे, मालवाहू गाड्यांसाठी शेड उभारणे ,बुकिंग साठी कार्यालय ,वाहनतळ, ही महत्त्वाची कामे तीन महिन्यात पूर्ण करण्याचे आव्हान आहे. या ड्रायपोर्टमुळे शेतकरी उद्योजक व्यावसायिक या सर्वांनाच याचा फायदा होणार आहे कारण परदेशात जर माल,पाठवायचा असेल तर एकदा या ड्रायपोर्टवर तपासणी केली आणि पॅकेजिंग केली की परत कुठेही वेगळा खर्च किंवा या मालाची तपासणी पॅकेजिंग करण्याची गरज नाही. पुढची सर्व प्रक्रिया या कंपनीच्या वतीने केल्या जाणार आहे त्यामुळे इथून माल बुक केला की आपली जबाबदारी संपली आणि कंपनीची सुरू झाली. याचा फायदा दळणवळण वाढीस होणार आहे. समृद्धी महामार्गापासून चार किलोमीटर अंतरावर आणि जालना- छत्रपती संभाजीनगर पासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर दिनेगाव रेल्वे स्टेशनच्या बाजूला हा ड्रायपोर्ट उभारल्या जात आहे. त्यामुळे ज्या मालवाहू गाड्या आहेत त्या जर संभाजीनगर होऊन आल्या तर जालन्यापर्यंत येण्याची गरज नाही. त्या दिनेगाव कडूनच ड्रायफूट मध्ये वळविल्या जातील. तसेच नांदेड परभणी कडून आलेल्या रेल्वे गाड्या देखील थेट ड्रायपोर्ट मध्ये जाऊन उभ्या राहतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

अधिक माहिती वाचा …
डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.या बातम्या आपण फेसबुक,इन्स्टाग्राम,व्हाट्सएप चॅनलवर देखील पाहू शकता.
-दिलीप पोहनेरकर-9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button