तीन जिल्ह्यांच्या अवैध गर्भपात आणि गर्भलिंग निदानाचे केंद्रबिंदू जालना; वाचा डॉक्टर आणि हॉस्पिटलची यादी

जालना- जालना जिल्ह्यातील तालुका असलेल्या भोकरदन शहरात दिनांक सात जुलै 2024 रोजी अवैध गर्भलिंग निदान आणि अवैध गर्भपाताचे प्रकरण उघडकीस आले होते. या प्रकरणातील मुख्य आरोपी डॉक्टर दिलीपसिंह राजपूत आणि इतर 15 जणांवर गुन्हेही दाखल झाले होते. त्यापैकी काही जणांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना जामीन दिला आहे .परंतु मुख्य आरोपी डॉक्टर दिलीपसिंग राजपूत अजूनही कारागृहातच आहे. दरम्यान या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेने लावून धरल्यानंतर या प्रकरणाचे तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक योगेश उबाळे यांनी या 15 आरोपी व्यतिरिक्त आणखी तेरा आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता या सर्वांचा अवैध गर्भपात आणि गर्भलिंग निदानाशी संबंध असल्याचे निष्पन्न झाले आहे. विशेष म्हणजे जालना, छत्रपती संभाजी नगर, आणि बुलढाणा जिल्ह्यातून महिला गर्भपात आणि गर्भलिंग निदानासाठी जालन्यात येत होत्या. पोलिसांनी निष्पन्न केलेल्या 13 जणांपैकी 10 डॉक्टर आहेत, दोन परिचारिका आहेत, आणि एक घरमालक आहे.
दरम्यान नवीन निष्पन्न झालेल्या दहा डॉक्टरांमध्ये राजेंद्र कुमार सावंत यांचे कोणतेही हॉस्पिटल नाही परंतु हे छत्रपती संभाजी नगर ,सिल्लोड आणि भोकरदन येथे येऊन गर्भलिंग निदान करत होते . डॉक्टर मोहिनी विजय सोळंकी सोळंके हॉस्पिटल बुलढाणा, डॉक्टर विजय प्रभाकर सोळंकी सोळंकी हॉस्पिटल बुलढाणा हे पती-पत्नी, डॉक्टर सुलक्षणा अग्रवाल अग्रवाल हॉस्पिटल चिखली जिल्हा बुलढाणा, डॉक्टर संगीता देशमुख देऊळगाव घाट जिल्हा बुलढाणा ,डॉक्टर प्रमिला सोळंकी रवी दीप हॉस्पिटल बुलढाणा, डॉक्टर दीपिका थत्ते थत्ते हॉस्पिटल जालना, डॉक्टर सुनिता सावंत सावंत हॉस्पिटल भोकरदन, डॉक्टर रवी वाघ रवी दीप हॉस्पिटल भोकरदन आणि छत्रपती संभाजी नगर येथील साकळक हॉस्पिटल येथील डॉक्टर असे हे दहा डॉक्टर निष्पन्न झाले आहेत. दोन परिचारिकांमध्ये मीरा सिस्टर थत्ते हॉस्पिटल जालना, जायदा बेगम साकळक हॉस्पिटल छत्रपती संभाजी नगर आणि तेराव्या आरोपीमध्ये भोकरदन येथील ज्या घरात हे सर्व कुकर्म चालायचे त्या घराचे घरमालक सुधाकर हिवाळे भोकरदन .अशा या 13 जणांचा समावेश आहे. एका गर्भलिंग निदानासाठी 17000 आणि गर्भपातासाठी 17000 असे एकूण एका महिलेकडून 32 हजार रुपये घेतल्या जायचे त्यापैकी एजंट स्वतःकडे चार हजार रुपये ठेवायचा आणि उर्वरित संबंधित डॉक्टरांना मिळायचे. स्थानिक गुन्हे शाखेकडे आत्तापर्यंत सुमारे 80 तक्रारी आल्या आहेत. पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी करत आहेत.
अधिक माहिती वाचा …
डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.या बातम्या आपण फेसबुक,इन्स्टाग्राम,व्हाट्सएप चॅनलवर देखील पाहू शकता.
-दिलीप पोहनेरकर-9422219172