पिता पुत्राची ती ठरली अखेरची मिठी; मोतीबाग तलावात बुडून पिता-पुत्राचा मृत्यू
जालना -जालना शहर आणि औद्योगिक वसाहत परिसराच्या मध्ये असलेल्या मोतीबाग तलावात आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पिता पुत्राचा बुडून मृत्यू झाला .माणिक बाबुराव निर्मळ हे आपल्या मुलांसह पोहोण्यासाठी गेले होते. दरम्यान मोठा मुलगा आकाश याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडत असताना वडील माणिक बाबुराव निर्मळ यांनी पाहिले आणि त्याला वाचवण्यासाठी ते गेले. दरम्यान आकाशने वडिलांच्या गळ्याला मिठी मारली आणि दोघेही पाण्यात बुडाले आणि दोघांचाही मृत्यू झाला आहे.
परभणी जिल्ह्यातील धर्मापुरी येथील रहिवासी असलेले माणिक बाबुराव निर्वळ( 38) हे आपल्या कुटुंबासह औद्योगिक परिसरात राहतात आणि तिथेच एका कंपनीमध्ये काम करतात. गेल्या बारा वर्षांपासून ते जालन्यात राहत आहेत. आज पाच वाजेच्या सुमारास माणिक निर्वळ हे आपली तीन मुलं आकाश रोहित आणि विकी यांच्यासह पाच वाजेच्या सुमारास मोतीबाग तलावात पोहण्यासाठी गेले होते मोठा मुलगा आकाश (14) हा पोहता -पोहता तलावाच्या मध्यभागी गेला आणि बुडू लागला हे पाहून त्याचे वडील माणिकराव हे त्याच्या मदतीला गेले आणि त्याच वेळी आकाशने वडिलांना मिठी मारली. यामध्ये हे दोघेही पाण्यात बुडून मृत्यू पावले. आकाशाचे दोन्ही लहान भाऊ रोहित आणि विकी तलावाच्या काठावर कमी पाणी असल्यामुळे तिथे पोहत असताना हा सर्व प्रकार ते पहात होते . त्यांनी आरडाओरड करून मदतही मागितली मात्र एवढ्या खोल पाण्यात जाण्याचे धाडस कोणी केले नाही.
दरम्यान काही क्षणातच पोलीस मित्र अमोल कटारे किशोर नाटकर यांनी घटनास्थळी पोहोचून पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांना तसेच रुग्णवाहिकेला देखील बोलावण्यासाठी मदत केली. काही वेळातच चंदंनजिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रघुनाथ नाचण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदीप सावळे, शिवाजी पोहार, विजय साळवे, रवी देशमुख, प्रभाकर वाघ, मनसुख वेताळ हे आणि जालना नगरपालिकेचे अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले.
दरम्यान काठावर असलेल्या दोन्ही मुलांनी त्यांचे वडील बुडत असलेले ठिकाण सांगितल्यामुळे हे मृतदेह बाहेर काढण्यात लवकर यश आले आहे. याप्रकरणी चंदंनजिरा पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करून मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
*बातमी अशी; जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास!*
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
*दिलीप पोहनेरकर* ९४२२२१९१७२
http://www.edtvjalna.com