जालना- मौजे नागेवाडी ता. जि.जालना येथे कृषी विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी जालना डॉ. विजय राठोड यांच्या उपस्थितीत सुरेश एखंडे यांच्या मोसंबी बागेमध्ये जी. आय. नोंदणीकरिता कार्यशाळा घेऊन शुभारंभ करण्यात आला.
भौगोलिक मानांकन हा एक सामुदायिक हक्क आहे.त्यामध्ये भौगोलिक चिन्हांकन एक प्रकारचे मानांकन नोंद आहे जी भौगोलिक क्षेत्राशी निगडित आहे. नैसर्गिक रित्या व मानवी प्रयत्नातून उत्पादित होणाऱ्या कृषिमालाची ओळख, त्याद्वारे त्याची खास गुणवत्ता, गुणवत्तेमधील सातत्य व त्यांच्या मार्फत विशेष गुणधर्म यांचे जतन करण्यासाठी व त्याची विक्री करण्यासाठी हे चिन्हांकन उपयुक्त आहे.
जेव्हा एखादा शेतकरी समूह एखाद्या पिकाची लागवड करतो किंवा एखादा पदार्थ उत्पादित करतो तेव्हा त्याला तेथील भौगोलिक परिस्थितीनुसार म्हणजे हवामान माती आणि पाणी यांचा त्या उत्पादनावर परिणाम होऊन काही गुणधर्म वैशिष्ट्ये मिळालेली असतात. त्यामुळे त्या पिकाची किंवा उत्पादनाची विशेष गुणवत्ता निर्माण होते. या वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनाची बौद्धिक संपत्ती म्हणून भौगोलिक प्रदर्शने नोंदणी व संरक्षण अधिनियम 1999 या कायद्याखाली नोंदणी करून त्याला संरक्षण देणे हा भौगोलिक चिन्हांकन नोंदणीचा मुख्य हेतू आहे. त्यासोबतच अशा भौगोलिक चिन्हांकन प्राप्त मालास निर्यातीसाठी अधिक संधी उपलब्ध होतात.अशा नोंदणी केल्याने कृषी मालास राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर ब्रँड होण्यास मदत होते.
व्यापारी चिन्हाला बाजारपेठेत जे महत्व असते तेच महत्त्व कृषिमालाच्या भौगोलिकतेला असते ,त्यामुळे असे नोंदणी केलेल्या उत्पादनाच्या उत्पादकाला जास्तीचे अधिक उत्पन्न मिळवून त्याच्या उन्नतीस हातभार लागतो. जालना जिल्ह्यात निजाम काळापासून वैशिष्ट्यपूर्ण अशी मोसंबी पिक घेतले जाते जिची चव, आम्लता, टीएसएस या गोष्टीमुळे जालन्याच्या मोसंबीला 2014 मध्ये कृषि विभाग, कृषि संशोधन केंद्रे, व फळे व मोसंबी उत्पादक बागायतदार संघ यांच्या प्रयत्नातून जी. आय. मानांकन मिळाले.
जिल्ह्याला मोसंबी करिता जी. आय. मानांकन मिळाले तरीसुद्धा त्यामध्ये संबंधित सर्व उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी करणे आवश्यक असते. संबंधित शेतकऱ्यांनी नोंदणी अर्ज कृषी विभागाकडे सादर करून ते अर्ज चेन्नई येथे पाठवले जातात व त्या शेतकऱ्यांना जी आय मानांकन उत्पादनाचे प्रमाणपत्र दिले जाते. अशा नोंदणीकरिता व निर्यातीकरिता हॉर्टीनेट प्रणालीवर अर्ज देण्यासाठी ही कार्यशाळा घेण्यात आली.या ठिकाणी जिल्हाधिकारी डॉ.राठोड यांनी शेतकऱ्यांना जीआय नोंदणी व हॉर्टीनेट वरील नोंदणी करावी व आपली मोसंबी निर्यात करण्यासाठी प्रयत्न करावे यासाठी आवाहन केले, व त्याचे महत्त्व आणि फायदे समजावून सांगितले.
फळ संशोधन केंद्र बदनापूर येथील तज्ञ मार्गदर्शक श्री पाटील यांनी मोसंबी चे गुणवत्तापूर्ण व शाश्वत उत्पादन कसे घ्यावे या बाबतीत मार्गदर्शन केले.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालना भीमराव रणदिवे यांनी सुद्धा मार्गदर्शन करून नोंदणी करिता शेतकऱ्यांना आवाहन केले. तंत्र अधिकारी श्रीमती प्रिया नवणे यांनी जीआय नोंदणी बाबतची कार्यपद्धती सर्व उपस्थितांना समजावून सांगितली. पणन विभागाचे अधिकारी श्री कापरे यांनी जी आय मानांकित उत्पादन घेण्याकरिता , विक्री व्यवस्था व परराज्यात पाठविण्या करता असलेल्या विविध अनुदानित योजना बाबत मार्गदर्शन केले. तसेच फळे व मोसंबी उत्पादक बागायतदार संघ जालनाचे सचिव श्री लड्डा यांनी नोंदणी चे महत्व व फायदे समजाऊन सांगितले.
यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी जालना श्रीमती शीतल चव्हाण, तालुका कृषी अधिकारी जालना संतोष गाडे, तालुका कृषी अधिकारी बदनापुर , व्ही एस ठक्के, मंडळ कृषी अधिकारी जालना गोविंद पौळ, मंडळ कृषी अधिकारी गोलापांगरी, अजय सुखदेवे, मंडळ कृषी अधिकारी बदनापूर , बनसोडे, कृषी पर्यवेक्षक , सतीश कमाने, कृषी सहाय्यक श्रीमती वैशाली वाघ, तसेच कृषी विभागातील इतर कर्मचारी, आणि मौजे नागेवाडी येथील मोसंबी उत्पादक शेतकरी सुरेश एखंडे, विजय पारे, व इतर शेतकरी आदी उपस्थित होते.
एम.डी. पोहनेरकर
8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
www.edtvjalna.com