Jalna Districtराज्य

सुरक्षारक्षकाला चकमा देऊन पं. जसराज यांच्यापर्यंत पोहोचले आणि माझं आयुष्य तरलं- अंकिता जोशी

जालना-” स्वर मार्तंड पंडित जसराज यांच्या राग वीहाग ने मला भुरळ घातली आणि तो शिकण्याचा छंद शांत बसू देत नव्हता. त्यामुळे एका कार्यक्रमात सुरक्षारक्षकाला चकमा देऊन त्याच्या दोन्ही पायातून पं. जसराज यांच्यापर्यंत पोहोचले आणि माझ आयुष्य तरलं” अशा भावना प्रकट केल्या आहेत स्वर मार्तंड पंडित जसराज यांच्या शिष्या आणि 1999 पासून पं. जसराज यांच्या कडे गुरुकुल पद्धतीने शास्त्रीय संगीत आणि शालेय शिक्षण पूर्ण करणाऱ्या अंकिता जोशी यांनी.

मूळच्या मराठवाड्यातील नांदेड येथील रहिवासी असलेल्या अंकिता जोशी यांनी पं. जसराज यांच्या घरी राहून आपलं आयुष्य सार्थकी लावून घेतलं आहे. पं. जसराज यांच्या परिवाराने अंकिता जोशी यांच्यावर केलेलं प्रेम आणि त्यामधून त्यांची झालेली जडणघडण या सर्व बाबतीत त्यांनी आपले मनोगत इलेक्ट्रॉनिक डिजिटल टीव्ही(Edtv) च्या विशेष मुलाखतीमध्ये व्यक्त केलं.

कलाश्री संगीत मंडळ पुणे आणि संस्कृती मंच जालना यांच्या वतीने”स्वर भास्कर पंडित भीमसेन जोशी संगीत महोत्सव 2022″ हा महोत्सव दिनांक 19 आणि 20 असे दोन दिवस जालन्यात होत आहे. त्यानिमित्त शास्त्रीय गायन सेवा सादर करण्यासाठी त्या जालन्यात आल्या आहेत.

आयुष्याच्या जडण-घडण विषयी बोलतांना त्यांनी सांगितले “पंडित जसराज यांच्यापर्यंत मला पोहचता येत नव्हते, शेवटी सवाई गंधर्व यांच्या कार्यक्रमात सुरक्षारक्षकाला चकमा देऊन त्यांच्या दोन्ही पायातुन घुसले आणि गुरुजी पर्यंत पोहोचले. त्यावेळी ही चिमुरडी पाहून गुरुजींनी देखील उत्सुकतेने माझी चौकशी केली ,आणि मला आशीर्वाद देऊन पुढील शिक्षणाची परवानगीही दिली. का कोणास ठाऊक मला हि असंच वाटत होतं की, असे गुरु जर मला मिळाले तर माझा आयुष्य तरून जाईल आणि ते आज पूर्णपणे तरलं अशी माझी खात्री आहे. खरतर हीच वर्षे जडणघडणीचे असतात आणि पंडित जसराज यांच्या कडेच माझी जडणघडण झाली. संगीत शिक्षणासोबतच शालेय शिक्षण देखील त्यांच्याकडे पूर्ण केलं आणि त्यांच्या परिवाराने मला त्यांची मुलगीच समजून वाढवलं.

सद्य परिस्थिती मध्ये तरुण पिढीचा शास्त्रीय संगीताकडे कल कमी आहे? हा प्रश्न मात्र त्यांनी फेटाळून लावला. आणि त्याचे समर्थन करताना त्या म्हणाल्या “आवड कमी नाही, त्याची माध्यमे बदलली आहेत .काळानुरूप पूर्वी घरोघरी आणि नाट्य मंदिरांमध्ये संगीताच्या मैफिली असायच्या आता त्याची जागा युट्युब इंस्टाग्राम अशा वेगवेगळ्या माध्यमांनी घेतली आहे. सध्याच्या काळामध्ये जाहीर कार्यक्रमांना तरुण पिढी मोठ्या प्रमाणे उपस्थित राहत आहे. त्यामुळे शास्त्रीय संगीताकडे तरुण पिढीचा कल हा योग्य प्रमाणात आहे. त्याच सोबत फक्त संगीत क्षेत्रातच नव्हे तर कोणत्याही क्षेत्रातील कला जपण्यासाठी त्या परिवारातील लहान मुलं ही महत्त्वाची ठरतात. त्यामुळे पालकांनी मुलांचा बघून त्यांच्या कलेचे संवर्धन करावं जेणेकरून या कला पुढे इतरांपर्यंत पोहोचतील.”

अशी अपेक्षाही शास्त्रीय संगीत गायिका अंकिता जोशी यांनी व्यक्त केले आहे.
*दिलीप पोहनेरकर*
www. edtvjalna. com
-9422219172

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.