दिवाळी अंकराज्य

गाण्याचं शिक्षण घेताना …दिनेश संन्याशी

      सध्या वाढत्या रिॲलिटी शो मुळे नृत्य आणि गाणे शिकण्यात दिवसागणिक वाढ होत आहे. परिणामी या कलांच्या शिक्षणाकडे पालकवर्ग बऱ्यापैकी गांभीर्याने लक्ष देत आहे. आपल्या पाल्यातील सुप्तगुणांचा विकास व्हावा, ही आंतरिक इच्छा सर्वांचीच असते. मग या कलांचं शिक्षण घेण्यासाठी पालक शोध सुरू करतात. (सर्व कलांच्या शिक्षणाबाबत लिहिणं इथे शक्य नाही. म्हणून फक्त गाण्याच्या शिक्षणाबाबत इथे बोलणार आहे.)
गाण्याच्या बाबतीत पूर्णपणे अनभिज्ञ असणारे पालक आपल्या आकलनानुसार मिळेल त्याला विचारत असतात …गाणं कसं शिकतात? कोण शिकवतं? किती दिवसांचा कोर्स असतो? कुणाकडे क्लास लावावा? हे आणि असे अनेक प्रश्न प्रामाणिकपणे विचारत असतात.


सर्वसामान्य माणसाला गाणं शिकणं म्हणजे एखादं सिनेगीत किंवा भजन गाता येणं, थोडक्यात फक्त छान गाता किंवा वाजवता यावं, त्याचा आनंद त्याला आयुष्यभर घेता यावा इतकीच त्याची प्रामाणिक अपेक्षा असते. आणि तेवढीच प्राथमिक अपेक्षा ही योग्य शिक्षणासाठी असावी. प्राथमिक अवस्थेत यापेक्षा जास्त अपेक्षा करणे ही गाण्याचे उत्तम सुप्तगुण असलेल्या विद्यार्थ्यांच्या विकासाला हानिकारक ठरू शकते. कारण गाण्याचं शिक्षण कसं घ्यावं हे पालकांना माहीत नसतं. त्यामुळे गाणं शिकण्याआधीच शिकवणाऱ्याकडून खूप अपेक्षा ठेवल्या जातात. ते इतर विषयांबरोबर गाण्याच्या शिक्षणाची तुलना करत असतात किंवा करू शकतात. त्यांच्या या अपेक्षा चुकीच्या नसतात. पण त्या पूर्णपणे बरोबर असतात, असेही नाही.


आता इथे प्रश्न निर्माण होतो की, अपेक्षा कोणत्या असाव्यात? त्या कळल्या तर!!! अर्थातच कुणाहीकडे आपला पाल्य शिकत असल्यास तो योग्य दिशेने शिकतो आहे का याची शाश्वती मिळू शकते. पण त्यासाठी पालकांनी थोडं संगीत शिक्षण समजून घेणं गरजेचं ठरेल. कारण गाणं शिकणं म्हणजे ‘स्वर साधना’. देवाला प्रसन्न करण्यासाठी किती वेळ किंवा दिवस तपश्चर्या करावी लागेल याचा निश्चित कालावधी कुणी सांगू शकणार नाही. तसेच स्वरसाधनेचे वास्तव आहे. स्वर कधी लागेल याचा निश्चित कालावधी सांगता येणं कुणालाही शक्य नाही. आणि त्यासाठी शास्त्रीय संगीताचा अभ्यास करावाच लागणार. त्यामुळे अभिजात भारतीय शास्त्रीय संगीत कसं शिकलं-शिकवलं जातं हे जाणून घेणं अत्यावश्यक आहे.
शास्त्रीय संगीतच का? लोकसंगीत/सुगम संगीत इत्यादी का नको? असा प्रश्न मनात येणं साहजिक आहेच. कोणतंच संगीत कमी किंवा जास्त लेखण्याचा प्रश्नच नाही आणि तसा मानसही नाही. पण प्रश्न जेव्हा आवाज तयार करण्याबाबतचा असेल तेव्हा आणि स्वर, ताल, लयीचा सूक्ष्म अभ्यास करायचा असेल तेव्हा शास्त्रीय गायनाचा अभ्यास आवश्यक आहे, असे मानणाऱ्यातला मी आहे. एक संगीत शिक्षक म्हणून हा अनेक वेळा आलेला अनुभव आहे की, दैनंदिन योग्य सरावाने चांगला आवाज तयार होऊ शकतो. लय आणि तालाची समज येऊ शकते आणि गायनाच्या प्राथमिक शिक्षणात आवाज आणि समज तयार होणं एवढीच अपेक्षा असावी. ज्याला ‘बेसिक’ असे म्हटले जाते.
थोडक्यात संगीताचा प्रवास जाणून घेऊ म्हणजे याचा अंदाज येईल की इतर सर्व विषयांच्या अभ्यासाबाबत जे सर्वांना माहीत आहे, तसं गाण्याच्या बाबतीत आहे की नाही. तसा हा आवडीचा विषय आहे. इंग्रज भारतात येण्याअगोदर भारतात अनेक राजे होते. आणि त्यांच्याकडे स्वतःच्या मनोरंजनासाठी स्वतःचा गायक असायचा. जो फक्त राजाच्या इच्छेनुसार गायचा. तेही फक्त राजदरबारात. म्हणजे एक प्रकारे ही कला बंदिस्त होती, असं म्हणता येईल. त्यानंतर इंग्रजांनी त्यांच्या कंपनीत ही राज्ये सामावून घेतल्यानंतर राजगायकांना सांभाळणे राजांना शक्य नव्हते. तेव्हा सर्व दरबारी गायक हे खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांसमोर आले आणि तेथून ही कला गुलामीतून मुक्त झाली, असे म्हणतात. तेव्हाचे कलाकार सहजासहजी ही कला मुक्तहस्ताने कुणाला देत नव्हते. खूपच संकुचितपणा त्या वेळी होता. ‘कट्यार काळजात घुसली’ हा सिनेमा पाहिलात तर आपल्या लक्षात येईल. त्याला घराणेशाही असं म्हणायचे. कुणाला आपल्याजवळचं शिकवलं तर तो आपल्याला शिरजोर होईल, अशी मानसिकता असावी म्हणून खूप त्रास सहन करून गाणं शिकणं व्हायचं. पण त्यातूनदेखील चागले संस्कार, जीवनशिक्षण मिळायचं. ज्याला अदब, तहज़ीब असं म्हणतात. ते असेल तेव्हाच गाणं शिकवायचे.
कलाकारांना उपजीविकेसाठी गाणं शिकवावं लागलं. पण सागरासमान असलेल्या या कलेला अभ्यासक्रमात बांधणे गरजेचे होते. जेणेकरून शिकवणं आणि कलेचे संक्रमण, प्रचार, प्रसार सातत्याने सुरू राहील. कालानुरूप हा बदल करून घेणे आवश्यक होते. त्यानुसार स्व. पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी सन १९०१मध्ये अखिल भारतीय गंधर्व मंडळाची स्थापना केली. त्यामध्ये सात परीक्षांनी विशारद व त्या पुढील दोन परीक्षांनी अलंकार होण्यापर्यंतचा अभ्यासक्रम तयार केला. त्यास प्रचारात आणण्यासाठी प्रचंड कष्ट घेतले आणि या परीक्षांना प्रसिद्धीस आणले. आजही त्यानुसार खासगी शिकवणीमार्फत या परीक्षांची तयारी करून घेतली जाते. हळूहळू शाळा, विद्यालये आणि महाविद्यालयांतदेखील संगीत शिक्षण सुरू झालेले आज दिसते.
पण एवढे होऊनदेखील गाण्याची पदवी ज्या पद्धतीने मिळते तेवढं गाणं येतं का? खरं पाहिलं तर ते समाधानकारक चित्र नाही. आजच्या जगात जगताना प्रमाणपत्र, पदवी मिळणं हे अत्यावश्यक आहे. पण त्यासोबत किमान तेवढी कला आत्मसात होणं अपेक्षित आहे. यासाठी गुरुकुलात ज्या पद्धतीने गाणं शिकवलं जायचं ते आता कसं करून घेता येईल? शिक्षणपद्धती बदलली आहे आणि आजचा संगीत शिकणारा विद्यार्थी हा आठवड्यातून दोनदा क्लास करतो. त्यात पालकांना तो लगेच टीव्हीवर दिसावा अशी अपेक्षा असते. यात त्याचा सांगीतिक विकास साधायचा असेल तर आपल्या पाल्यातील सुप्त गुण ओळखून एका वेळी अनेक अपेक्षा न करता किमान एका कलेच्या क्षेत्रात त्याचा उत्तम विकास करून घ्यावा. म्हणजे त्याला साधनेसाठी वेळ मिळेल.
आजच्या काळात गाणं शिकण्याचे अनेक फायदेही आहेत. त्या दृष्टीने कला शिकल्या किंवा शिकवल्या जाव्यात. कलेच्या साधनेने मानसिक शांतता मिळते, मुलांची चंचलता कमी होते. एका ठिकाणी बसण्याची क्षमता वाढते. एकाग्रता, ग्रहणशक्ती, कल्पनाशक्ती, स्मरणशक्ती या इतर शिक्षणासाठीदेखील अत्यावश्यक असलेल्या आंतरिक गुणांची वाढ होते. शिवाय उत्स्फूर्तता आणि आनंद मिळतो तो वेगळाच. ज्याचा विद्यार्थ्यांना खूप फायदा होऊ शकतो. त्यांना आयुष्यभरात एक जरी कला अवगत करता आली तरी त्यांचे आयुष्य खऱ्या अर्थाने पूर्णत्वास जाईल.
चांगलं गाणं येण्यासाठी वेळ लागेलच. ते लवकर येण्यासाठी पालक आणि विद्यार्थी दोघांनी आग्रह करू नये. ज्या मुलांमध्ये कलेचे सुप्त गुण लहानपणीच दिसून येतात त्यांना तेव्हाच योग्य मार्गदर्शन मिळवून देणे आवश्यक असते. आणि अशा योग्य वेळेत, संस्कारक्षम वयात विद्यार्थी मिळाला तर एक चांगला प्रामाणिक गुरू त्याला उत्तम कलाकार नक्कीच बनवेल यात शंका नाही. या कलेला गुरुमुखी विद्या म्हणतात. तसेच मार्गदर्शन मिळाले तर उत्तम विद्यार्थी, रसिक नक्कीच तयार होतील यात वाद नाही.

               दिनेश संन्यासी( संगीत शिक्षक ,9511687940)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.