जालना -इयत्ता दहावी मध्ये पास झाल्यानंतर त्याची टक्केवारी किती आहे? हे न पाहता इयत्ता अकरावीसाठी पालकांचा ग्रामीण भागाकडे जास्त ओढा आहे. विशेष करून शहरी भागात राहणाऱ्या पालकांनाही आता आपल्या पाल्यासाठी ग्रामीण भागातील विद्यालयातच प्रवेश पाहिजे !कदाचित अकरावीला घेतला नसेल तरी आता बारावी साठी मात्र शहरी भागातील महाविद्यालयातून प्रवेश निर्गम (tc)ची संख्या वाढली आहे. याचे कारण असे की ग्रामीण भागामध्ये प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थ्याला कॉपी करून चांगले गुण मिळतील आणि टक्केवारी वाढेल या संभ्रमात सध्या पालक आहेत, आणि म्हणूनच शहरातील महाविद्यालय वसपडत आहेत आणि ग्रामीण भागातील महाविद्यालयांची केवळ नावापुरत्या प्रवेशांची यादी वाढत आहे. याच यादीवर संबंधित संस्थेचे आर्थिक गणित देखील अवलंबून असल्यामुळे संस्था देखील अशा विद्यार्थ्यांना पायघड्या टाकत आहे.
शहरी भागातील महाविद्यालयांमध्ये थोडेफार का होईना संबंधित विषयांचे वर्ग घेतल्या जातात, किमान एखादा विद्यार्थी स्वयंस्पुर्तने अभ्यास करत असेल तर त्याला प्रात्यक्षिक किंवा ग्रंथालयातून आवश्यक असणारी पुस्तके उपलब्ध होतात ,परंतु ग्रामीण भागामध्ये या दोन्ही गोष्टींचा वाणवा आहे. त्यामुळे केवळ विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि उत्तीर्ण होण्याची टक्केवारी वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात कॉपी केल्या जाते. शासनाच्या धोरणानुसार गेल्या दोन वर्षांपासून कॉपीमुक्तीचे अभियान सुरू आहे. हे अभियान 100% जरी यशस्वी होत नसले तरी मागील वर्षी 50 टक्के तरी या कॉपीला आळा बसलेला आहे. कदाचित पुढच्या वर्षी ही टक्केवारी आणखी वाढू शकते. अशा परिस्थितीमध्ये जर शहरी भागातील विद्यार्थ्याला ग्रामीण भागातील महाविद्यालयात प्रवेश दिला तर अशा विद्यार्थ्याला ना महाविद्यालयातून मार्गदर्शन मिळेल ना कॉफी मधून, त्यामुळे जी टक्केवारी जे गुण मिळायचे होते ते देखील मिळणार नाहीत आणि विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकते.
जिल्ह्यातील महाविद्यालयांच्या “शाळा”जालना जिल्ह्यामध्ये एकूण 234 महाविद्यालयांच्या माध्यमातून सन 2024 -25 ला 34 हजार 59 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली .या परीक्षेमध्ये कला, वाणिज्य, विज्ञान आणि किमान कौशल्यावर आधारित(mcvc) अभ्यासक्रमाचा समावेश आहे. या आकडेवारीनुसार विद्यार्थ्यांच्या तुलनेत सर्वात जास्त महाविद्यालय हे घनसांवगी तालुक्यात आहेत ,इथे 16 महाविद्यालयांच्या माध्यमातून 1489 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली म्हणजेच एका महाविद्यालयात सरासरी फक्त 93 विद्यार्थी होते. आता याच्या उलट सर्वात जास्त महाविद्यालय हे भोकरदन तालुक्यात आहेत 67 महाविद्यालयातून 11064 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. म्हणजे एका महाविद्यालयात सरासरी 165 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. जिल्ह्यामध्ये सर्वात कमी महाविद्यालय हे परतुर आणि मंठा तालुक्यात प्रत्येकी 13 आहेत. जालना तालुक्यात 45 महाविद्यालयातून 6,692 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती ही सरासरी 148 एवढी आहे बदनापूर तालुक्यातून 30 महाविद्यालयाच्या माध्यमातून 3676 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली ज्याची सरासरी 122 एवढी होते. अंबड तालुक्यात 23 महाविद्यालयांच्या माध्यमातून 3328 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली ज्याची सरासरी 144 आहे. परतुर तालुक्यात 13 महाविद्यालयांच्या माध्यमातून 2660 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली ज्याची सरासरी 204 विद्यार्थी आहे ,ही जिल्ह्यामधील सर्वात जास्त सरासरी आहे मंठा तालुक्यात 13 महाविद्यालयातून 1973 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली ज्याची सरासरी 151 येते. जालना जिल्ह्याची जर सरासरी काढली तर 234 महाविद्यालयातून प्रत्येकी 145 विद्यार्थी एवढी सरासरी येते .या 145 विद्यार्थ्यांमध्ये चारही शाखांचे अभ्यासक्रम समाविष्ट आहेत त्यामुळे विचार करायला लावणारी गोष्ट आहे की 145 विद्यार्थ्यांमध्ये महाविद्यालयाला सर्व अभ्यासक्रमांचे प्राध्यापक कसे काय परवडतात आणि हे प्राध्यापक विद्यार्थ्यांना काय शिकवणार? त्यामुळे पालकांनो बारावीला कॉपी करता येईल या उद्देशाने आपल्या पाल्यासाठी घेतलेला प्रवेश हा आपल्याच पायावर दगड पाडून घेण्यासारखे आहे. टक्केवारी कमी आली तरी हरकत नाही परंतु जी आली ती खरी असेल. घनसावंगी तालुक्यातील एका महाविद्यालयात सरासरी 93 विद्यार्थी ही आकडेवारी त्या महाविद्यालयाची गुणवत्ता काय असेल हे सांगून जाते. त्यामध्येही काही महाविद्यालयात दीडशे विद्यार्थी असतील तर काही मध्ये विद्यार्थी नसतील परंतु आकडेवारी असेल.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172