जालना जिल्हाराज्य

“त्या” ग्रामसेवकावर झाला गुन्हा दाखल; edtv च्या बातमीचा परिणाम; आता पोलिसांचा कस

जालना -जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची बनावट सही करून देशी दारूच्या दुकानासाठी ना हरकत प्रमाणपत्र देणाऱ्या विलास साहेबराव साळवे या ग्रामसेवकाविरुद्ध कदीम जालना पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

अंबड पंचायत समिती मध्ये कार्यरत असलेल्या विलास साहेबराव साळवे या ग्रामसेवकाला दिनांक 31 जानेवारी 2018 रोजी कार्यालयीन कामानिमित्त जालना येथे तात्पुरत्या स्वरूपात आदेशित केले होते. त्यावेळपासून ते जालना जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागात कार्यरत होते. दरम्यान जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथे श्रीमती निशा संजय जयस्वाल व त्यांचे भागीदार असलेल्या परिवारातील सदस्यांसाठी मंजूर असलेली cl3 अनुज्ञप्ति क्रमांक 22, सदर बाजार भिंगार, तालुका जिल्हा अहमदनगरच्या टेंभुर्णी येथे गट क्रमांक 198 मिळकत 2656 येथे स्थलांतरित करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क कडे विहित अर्ज केला होता.

या स्थलांतरासाठी संबंधित ग्रामपंचायतीचा ठराव आवश्यक असतो आणि या ठरावाच्या आधारे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेल्या ना हरकत प्रमानपत्रा नंतरच राज्य उत्पादन शुल्क पुढील कारवाई करते. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क कडे ना हरकत प्रमाणपत्र गेल्यानंतर त्यांनी जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना या प्रमाणपत्र विषयी सत्यता पडताळून पाहण्याची विनंती केली. त्यानुसार टेंभुर्णी ग्रामपंचायत ने दिनांक 2 फेब्रुवारी 2019 नुसार ग्रामसभा घेऊन 21 मे 2019 नुसार ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. हे प्रमाणपत्र सत्य आहे. परंतु जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिलेले प्रमाणपत्र सत्य नसल्याचे कळविले आहे.त्या नंतर जालना जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे यांची बनावट सही केल्याचा प्रताप उघडकीस आला आणि दिनांक27 सप्टेंबर रोजी जालना जिल्हा परिषदेने राज्य उत्पादन शुल्क ला पत्र देऊन कळविले, की “जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सहीने ना हरकत प्रमाणपत्र निर्गमित करण्यात आलेले नाही” त्यानंतर या सर्व प्रकरणाची चौकशी झाली, आणि ग्रामसेवक विलास साळवे याला निलंबित करण्यात आले.
एवढ्या मोठ्या अधिकार्‍याची बनावट सही केल्याप्रकरणी श्री. सवडे यांच्यानंतर बदलून आलेल्या मनूज जिंदाल या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी लगेचच साळवे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, असे आदेश सहाय्यक गटविकास अधिकारी पंचायत विभाग, अनिल बाबुराव शिरसाट यांना दिले. तीन महिने उलटूनही या प्रकरणात गुन्हा दाखल होत नव्हता, त्यामुळे या प्रकरणाचा पाठपुरावा गेल्या आठ दिवसांपासून edtv न्युज च्या प्रतिनिधीने केला आणि सर्व प्रकरणाची माहिती घेऊन दिनांक 30 डिसेंबर रोजी बातमी प्रकाशित केली. या बातमीची दखल घेऊन सहाय्यक गटविकास अधिकारी अनिल बाबुराव शिरसाट यांनी रात्री उशिरा कदीम जालना पोलिस ठाण्यात विलास साहेबराव साळवे, राहणार अंबड. या ग्रामसेवकाविरुद्ध भादवि कलम 420, 465, 468, 471, अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
* आता पोलिसांचा कस* गुन्हा दाखल करण्यास झालेल्या विलंबाबद्दल फिर्यादी अनिल शिरसाट यांनी पोलिस गुन्हा दाखल करून घेत नाहीत असा आरोप काल केला होता. परंतु आता गुन्हा दाखल झाल्यामुळे या प्रकरणात कोणत्या अधिकाऱ्यांनी कोणती टिपणी टाकली हे त्या संचिकेत उघड होणार आहे .त्यामुळे काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील आता पोलीस ठाण्याच्या पायऱ्या झिजवाव्या लागतील. त्याच सोबत नुकतेच औरंगाबाद परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी जालना जिल्ह्याच्या पोलीस यंत्रणेची तपासणी केली होती. त्यानुसार एखाद्या गुन्ह्याचा तपास हा दोन महिन्यात पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पोलिसांना पुढील दोन महिन्यांमध्ये या प्रकरणाचा तपास करून आरोपपत्र न्यायालयात सादर करावे लागणार आहे.
*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.