सेलू येथून हरवलेली महिला तीन दिवसांपासून स्त्री रुग्णालयात होती ठाण मांडून नवजात बालकाच्या शोधत
जालना- शहरातील गांधीचमन परिसरात असलेल्या जिल्हा स्त्री रुग्णालयातून काल दि.७ ला सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास एका नवजात अर्भकाची चोरी झाली होती. जालना तालुक्यातील पारेगाव येथील रुकसाना अहमद शेख यांनी सहा तारखेला एका बाळाला जन्म दिला होता ,आणि सात तारखेला सकाळी नऊ वाजेच्या सुमारास रुकसाना शेख यांचे नातेवाईक या बाळाला कोवळ्या उन्हात घेऊन बसला होत्या. याच वेळी दुसऱ्या एका महिलेने या नातेवाईकांचा विश्वास संपादन केला आणि या बाळाला पळवून नेले.
या प्रकरणाचा कदीम जालना पोलिस आणि स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी काल दिवसभर कसून तपास केला. कदीम जालना पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक महेश टाक हे शहर, बस स्थानक, या भागांमध्ये तपास करत होते तर स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी रेल्वे स्थानकाच्या माध्यमातून तपास सुरू केला होता .या तपासामध्ये स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. आज सकाळी साडेचार वाजता या नवजात अर्भकासह एका महिलेला सेलू येथील गायत्री नगर भागात असलेल्या जाफर शेख यांच्या घरातून ताब्यात घेतले आहे.
*असा आहे घटनाक्रम*
बाळाला पळवून नेणाऱ्या महिलेला गेल्या पाच वर्षांपासून मूलबाळ होत नव्हते आणि नुकताच ७ महिन्याचा गर्भपातही झाला आहे. त्यामुळे ही महिला सेलू येथिल रुग्णालयातून निघून आली होती. त्या संदर्भात सेलू पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार तिच्या पतीने दिली आहे. गेल्या तीन दिवसांपासून जालना येथील स्त्री रुग्णालयांमध्ये या महिलेने ठाण मांडून सर्व परिस्थितीचा अंदाजही घेतला होता. त्यानुसार काल दिनांक 7 रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास या महिलेने दूसर्या एका महिलेचा विश्वास संपादन केला. दोन्ही एकाच समाजाच्या असल्यामुळे तो संपादन करणे सोपे झाले. याचा फायदा घेऊन या महिलेने या नवजात अर्भकाला घेऊन पोबारा केला. या स्त्री रुग्णालयाच्या बाहेर गेटवर असलेल्या एका कपडा व्यावसायिकाकडून या बालकासाठी हात मोजे आणि पाय मोजे देखील घेतले. त्यानंतर एका रिक्षावाल्या सोबत स्टेशनवर जाण्यासाठी निघाली, मात्र त्याने चाळीस रुपये मागितल्यामुळे तीने नकार दिला आणि थोडी पुढे गेली, त्यानंतर दुसर्या एका रिक्षावाल्याने तिला स्टेशन वर आणून सोडले. तिथे 55 रुपये देऊन तिने तिकीट काढले. सकाळी साडेदहा वाजता असलेल्या डेमो ने परभणी कडे गेली. परभणीला उतरल्यावर मुख्य प्रवेशद्वारातून न येता मागच्या मागेच उतरून स्टेशनच्या बाहेर पडल्यापडल्या मुळे ती सीसीटीव्ही कॅमेरात आली नाही.परंतु परभणी पर्यंतचा तिचा प्रवास सीसीटीव्हीच्या माध्यमातून पाहिल्यानंतर स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी अंदाज व्यक्त केला होता. दरम्यान स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी या महिलेचा माग काढला असता ही महिला परभणी येथील सामान्य रुग्णालयात एका रिक्षाचालकाने नेऊन सोडल्याचे सांगितले. त्यानुसार पथकाने सामान्य रूग्णालयात चौकशी केली असता एक संशयित महिला सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास येऊन हॉस्पिटल परिसरात असलेल्या झाडाखाली बसली होती, आणि त्यावेळी तिने एका व्यक्ती सोबत मोबाईल वरून संभाषण करून त्याला बोलून घेतले होते त्याच वेळी ही महिला बालकाला कृत्रिम रीतीने दूध पाजण्याचा ही प्रयत्न करत असल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. त्यामुळे पोलिसांचा देखील अंदाज खरा ठरु लागला. तो दुसरा व्यक्ती आल्यानंतर दोघे मिळून या बालकाची रूग्णालयात नोंद करण्याचाही प्रयत्न करत होते मात्र तो अयशस्वी झाल्याने ते दोघेही तिथून निघून गेले. दरम्यान पोलिसांनी तोपर्यंत या महिलेच्या निवासस्थानाचा अंदाज लावला होता आणि मिळालेल्या माहितीनुसार सदरील महिलाही सेलू येथील गायत्री नगर परिसरात असलेल्या वस्तीत राहत असल्याचे कळले. या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस पुन्हा परभणी हुन सेलु कडे वळाले आणि सकाळी साडेचार वाजेच्या सुमारास सेलू येथील वस्तीतील जाफर शेख यांच्या घरी हजर झाले. यावेळी या महिलेकडे बालकाची चौकशी केली असता सुरूवातीला उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर बालकाला निरखून पाहिल्यावर त्याच्या तळपायावर जालना येथील स्त्री रुग्णालयाचा निळ्या शाईच्या शिक्क्याची पाहणी केली आणि त्यावेळी हे बालक जालना येथूनच पळवून नेल्याचे निष्पन्न झाले .त्यानंतर महिलेला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिने हे बालक पळवून आणले असल्याचे सांगितले आहे.
दरम्यान आज सकाळी या बालकाला त्याची आई रुकसाना अहमद शेख यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे.
स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकामध्ये पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग, पोलीस उपनिरीक्षक दुर्गेश राजपूत, सचिन चौधरी, सागर बाविस्कर, सुधीर वाघमारे ,रमेश पैठणे, चंद्रकला शडमल्लू, गोदावरी सरोदे, यांचा समावेश होता.
अत्यंत कमी वेळेत स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी हा तपास केल्यामुळे पोलीस अधीक्षक विनायक देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांनी स्थानिक गुन्हा शाखेच्या या पथकाचे कौतुक केले आहे.
*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna